वेध माझा ऑनलाइन - ‘स्वच्छ सर्वेक्षण -२०२२’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०२२’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम १२ पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन शहरांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्हयातील पाचगणी शहराने उत्तम कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई शहराला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण २३ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
No comments:
Post a Comment