वेध माझा ऑनलाइन । - शरद पवार म्हणाले होते भुजबळ व धनंजय मुंडे यांना उमेदवारी देऊन मी चूक केली तर दुसरीकडे म्हणाले होते की, अजितदादा आमचे नेते आहेत या दोन्ही भिन्न विधानाचा अर्थ काय घ्यायचा... या प्रश्नांवर हसत हसत छगन भुजबळ म्हणाले की... तुम्हीच पत्रकारांनी याचा अर्थ सांगा...अजितदादाच राष्ट्रवादीचे नेते आहेत अधिकाधिक आमदार त्यांच्याच बाजूला आहेत तरी तुम्ही जो अर्थ काढत आहात तेच मलाही म्हणायचं आहे...म्हणून तुम्हीच सांगा त्यांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा ?असे भुजबळ म्हणताच त्याठिकाणी एकच हशा पिकला ...दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी समाजाला 54 टक्के आरक्षण दिले, आम्ही ते कदापि विसरणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय तोडगा निघणे गरजेचे आहे. यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन तोडगा काढावा, असेही मत यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, शरद पवारांपासून आम्ही दूर आहोत, असे वाटत नाही. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला, हे खरे आहे. निवडणूक आयोगाकडे वेगवेगळे म्हणणे सादर झाले असले, तरी ती कायदेशीर बाब आहे. त्याबाबत काही बोलणे योग्य होणार नाही. शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असताना मंडल आयोग लागू झाला. तो आयोग तत्कालिन पंतप्रधान स्व.व्ही.पी. सिंग यांनी स्वीकारला. त्यामुळे ओबीसींना 54 टक्के आरक्षण मिळाले. जेष्ठ नेते पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याने समाजाला न्याय मिळाला, ही गोष्ट विसरता येणार नाही. त्या अर्थाने शरद पवार नेते आहेत. आम्ही त्यांच्यापासून दुरावलेलो नाही. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला आहे इतकंच. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावांमध्ये निर्माण झालेले दुषित वातावरण चुकीचे आहे. समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडणारी फूट योग्य नसून आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची एकत्रित बैठक होणे गरजेचे आहे. सर्वांच्या मतानुसार योग्य मार्गाने जायचे ठरले पाहिजे.
ओबीसींमध्ये पावणे चारशे जाती आहेत. यापूर्वी 250 जाती होत्या. त्यात हळूहळू वाढ होत आहे. आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसीच्या जाती वाढत आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षण देणे किती व्यवहार्य आहे, हे तपासण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या सर्व नेत्यांचे तेच मत आहे. त्यामुळे स्वतंत्र विचारांची गरज आहे. मराठा समाज मोठा असून राहिलेल्या 17 टक्क्यात आरक्षण दिल्यास कोणाच्याच वाट्याला काही उरेल, असे वाटत नाही. त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्या मार्गाने जायचे, हे ठरवले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment