काल काले येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. अविनाश मोहितेंनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय इतर घोटाळे केले ते वेगळेच त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं?... असा घणाघात डॉ अतुलबाबा यांनी काले येथील सभेत केला.
तसेच त्यांनी खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचाही यावेळी उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत डॉ अतुलबाबांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे यावेळी आवाहन केले.
ते म्हणाले...यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पुढे सांगितले की...,
२०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.
कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले.
ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment