Wednesday, September 4, 2024

जयदीप आपटे सापडला ,आता कुटुंबिय झाले गायब ; घराला पुन्हा टाळे

वेध माझा ऑनलाइन।
जयदीप आपटे यांच्या घराला पुन्हा टाळे लावलं आहे. त्यामुळे जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता कुटुंब गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. जयदीप आपटेला अटक झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळाली होती. यानंतर पहाटे चारच्या सुमारास आपटे कुटुंब घराला टाळा लावून पुन्हा गायब झाले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे यांचे कुटुंब सध्या सिंधुदुर्ग येथे असल्याचे बोललं जात आहे. त्याचे कुटुंबिय न्यायालयीन लढाई लढण्यासाठी वकिलांशी चर्चा करत आहे. आज जयदीप आपटे याला सिंधुदुर्ग न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी ते सिंधुदुर्ग येथे गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


11 दिवस फरार...
शिल्पकार जयदीप आपटे हा पुतळा कोसळल्यापासून 11 दिवस फरार होता. यामुळे पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेला बेड्या ठोकल्या आहेत. जयदीप आपटे हा तोंडावर रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणच्या घरी आला होता. त्याचवेळी घराबाहेर उभे असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी जयदीपला बेड्या ठोकल्या. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली.

जाहीरात नेमकी सरकारची की अजित पवारांची? राष्ट्रवादीची ‘ती’ जाहीरात वादात

वेध माझा ऑनलाइन
अजित पवार यांच्या गटाकडून लाडकी बहीण योजनेची करण्यात आलेली जाहीरात सध्या वादात आहे. या जाहिरातीत १५०० रूपये अजित पवार देत आहेत आणि योजनासुद्धा अजित पवार यांची असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच सरकार १५०० रूपये देत नाहीत तर ते अजित पवार देतायतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर जाहिरातीत मुख्यमंत्री शब्द वगळून अजितदादांचा उल्लेख लाडकी बहीण योजनेत कऱण्यात आला आहे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे वडील मुलीला विचारताय की नवा ड्रेस कुणी दिला? त्यावर मुलगी अजितदादांनी दिल्याचे सांगते तर पत्नीही एफडीची माहिती देताना अजित दादांनी १५०० रूपये दिल्याचे सांगते. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीत वाद सुरू झाला ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. असा टोला शरद पवार यांनी लावला. तर बहिणींच्या नावाने मतं मिळवण्यासाठी श्रेयवाद सुरू झाल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

शिल्पकार जयदीप आपटे सापडला ;

वेध माझा ऑनलाइन।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी चेतन पाटील यांना पोलिसांना अटक केली. तर, जयदीप आपटे हा फरार होता.

अशात जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.जयदीप आपटेला अटक केल्यानंतर आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

जयदीप आपटेला अटक
या प्रकरणी जयदीप आपटे यांच्या वकिलांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. जयदीप आपटे अंधारात भेटायला आला आणि त्याला पोलिसांनी पकडलं ही कथा खोटी आहे.या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात असून काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, असं जयदीप आपटे यांचे वकील गणेश सोवणे यांनी म्हटलंय.तसेच, या प्रकरणात जे काही आरोप झाले ते कसे निराधार आहे हे तपास यंत्रणेला सांगणं आणि न्यायालयाला सामोरे जाणे हे आम्ही ठरवलेलं आहे. मालवणला गेल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल. तेव्हा तिथे हजर होऊ आणि जो युक्तिवाद करायचा आहे तो केला जाईल, असंही वकील गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी जयदीपच्या शोधासाठी सात वेगवेगळी पथक तैनात केली होती. जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. जयदीप इतके दिवस फरार होता. तो सापडत नसल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली होती. आता जयदीप सापडल्यामुळे या प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच म्हणजेच 26 ऑगस्टरोजी महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे. (

रुग्णवाहिकेची सोय नसल्याने चिमुकल्या मुलांचे मृतदेह घेऊन 15 किलोमीटरची पायपीट ; क़ाय आहे घटना ?

वेध माझा ऑनलाइन।
एकीकडे राज्यातील सरकार विकासाच्या मोठया गप्पा मारत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात नागरिकांची मुलभूत गरज असलेली आरोग्य यंत्रणा औषधालाही अस्तित्त्वात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गडचिरोलीत  रुग्णवाहिकेची सोय नसल्याने आई-वडिलांना  आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह घेऊन 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. याप्रकरणात ग्रामीण भागातील लोकांचा औषधोपचारापेक्षा अंधश्रद्धा आणि जुन्या रुढींवर असलेला विश्वास कारणीभूत असला तरी आरोग्य यंत्रणेची अनुपलब्धताही तितकीच कारणीभूत आहे. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगावात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?
आजोळी आलेल्या दोनभावंडांना ताप आला. अशिक्षित आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने ४ सप्टेंबरला घडली आहे. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. 

दोन दिवसांपूर्वी ' आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला- आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर  दोन्ही भावंडांचे कलेवर घेऊन भाबड्या आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले.
रुग्णवाहिका मागवली पण नातेवाईकांनी ऐकलं नाही; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
या घटनेबाबत गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल,असे डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.




महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?...शरद पवारांनी सांगूनच टाकले ;

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात योग्य समन्वय पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरून तिन्ही पक्षाचे अद्याप एकमत झालेलं नाही. एकीकडे निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी अजूनही सावध भूमिका घेत मुख्यमंत्रीपदाबाबत थेट भाष्य केलेलं नाही. आता खुद्द शरद पवारांना याबाबत विचारलं असता पवारांनी मुरब्बीपणे या प्रश्नाचे उत्तर दिले.


शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार म्हणाले, आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही. सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दीष्ट हे स्थिर सरकार देण्याला असेल, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री कोण ते ठरवलं जाईल असं उत्तर शरद पवारांनी दिले. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिवरायांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे कोसळला असा तर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला होता, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, वाऱ्याच्या वेगामुळे किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं कारण मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक सांगत आहेत. पण अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत.मुंबईत इंडिया गेटच्याजवळ, समुद्रकिनारी जो पुतळा आहे तो कित्येक वर्षांपासून उभा आहे, त्याला काही झालेलं नाही. त्यामुळे मालवणमध्ये जो पुतळा कोसळला,त्याबाबत जी कारण सांगितली जात आहेत, ती योग्य आहेत असं दिसंत नाही, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पुतळ्याचं काम ज्यांनी काम केलं त्यांचा या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता, तेवढं मोठं काम त्यांनी केलेलं नाही असं दिसतंय. हे असताना त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यानं अपघात घडेल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, असं शरद पवार म्हणाले.

हसन मुश्रिफ म्हणाले; समरजीत आता तुझी खैर नाही ;

वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात मोठी राजकीय कुस्ती पाहायला मिळत आहे. समरजितराजे घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेत अजित पवार गटात असलेल्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ याना आव्हान दिले. यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी हे आव्हान स्वीकारत शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर नाही अशी गर्जना केली आहे. त्यामुळे कागलमध्ये यंदाच्या विधानसभेला काटे कि टक्कर पाहायला मिळेल.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेब माझे दैवत आहे. मी अजूनही त्यांचा आदर करतो. मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले आहेत? हे मला माहित नाही. शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. राजा विरोधात प्रजा अशी निवडणूक आहे आणि प्रजा कायमच जिंकत असते. जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? पण तरीही मी एवढच म्हणेन कि शरद पवार साहेब, तुमच्याशी माझं वैर नाही, परंतु समरजित तुझी खैर नाही… 

 संकट काळात आमची साथ सोडुन गेले ; पवारांचा मुश्रिफ यांच्यावर हल्लाबोल ;
दरम्यान, कागल येथील जाहीर सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. तुमच्या तालुक्यातील एका व्यक्तीला मी सगळं काही दिले, मंत्री केलं मात्र संकटाच्या काळात आमची साथ सोडून ते भलतीकडे गेले. त्यांच्यावर ईडी काही चौकशी सुरू झाल्यानंतर ते अस्वस्थ झाले . ज्यांनी त्रास दिला त्यांच्याच सोबत जाऊन ते बसले. खरं तर संकटातून पळून जाणे आणि लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम करा आणि धडा शिकवा असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार घणाघात केला.

गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखानी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार;

वेध माझा ऑनलाइन।
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली असून सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  

सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवल आहे, याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता, गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. तसेच,राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केलं जातंय, असेही त्यांनी म्हटलं.