Monday, December 30, 2024

अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण :

वेध माझा ऑनलाइन।
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार होता. जवळपास 20 ते 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे.

वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही, असं वाल्मिक कराडने म्हटलंय.
तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ‘वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत.

या प्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय.

Sunday, December 29, 2024

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज सरेंडर होणार?

वेध माझा ऑनलाइन
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, ते आज (30 डिसेंबर) कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्या प्रकरणी आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण आता थेट सीआयडीकडे गेले असून सीआयडीकडून तपास केला जातोय.अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.

सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे एनसीपीचे काम करत आहेत. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.अशात त्यांचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आले आहे.

Saturday, December 28, 2024

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी ; मर्डर करणाऱ्या आरोपींचीच हत्या! काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तीन आरोपींचा खून झाला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. 

बीड मधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडाशाहीचा प्रश्न सारखा समोर येत आहे. आणि यामुळेच पोलिस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह देखील उपलब्ध केले जात आहे. सरपंच संतोष देसाई यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी बीडमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.  अंजली दमनिया या  ठिय्या आंदोलन करणार आहेत. आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आहे असे माहिती त्यांनी दिलेली आहे.

बीड मधील सर्वपक्षीय मोर्चा बद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, “सध्या तेथे राजकीय नाटक सुरू झालेले आहे. दीपक क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच आहेत. ते आपापल्या क्षेत्रातील काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हास्यास्पद आहे. आम्ही हातभर माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मीक कराडला अटक केली जात नाही. तोपर्यंत  आंदोलन करणार आहे.”

यापुढे अंजली दमानिया यांनी सांगितले की, “आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. परंतु मला एक अत्यंत धक्कादायक बातमी सांगायची आहे. ती म्हणजे काल रात्री जवळपासच्या 11. 30 आसपास मला फोन आला आणि त्यात सांगण्यात आले की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. हे ऐकून मी ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन करून त्याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील परंतु मला यात कितीपत सत्यता आहे हे ठाऊक नाही. परंतु जर असं झालं असेल तर हे अत्यंत भयानक आहे.”

Friday, December 27, 2024

सैदापुरात फ़ायरिंग ; चिमुकली जखमी ; एकास अटक;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नजीक असणाऱ्या सैदापूरातील एका कॉलनीत किरकोळ कारणावरून फायरिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे

या घटनेत एक चिमुकली जखमी झाली आहे असे समजते दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असता त्यांनी एकास अटक केली आहे तर चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असेही कळते

घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही

कराडच्या डीवायएसपी पथकाकडून कराड-मलकापुरातील कॅफेंवर छापे, चालक-मालकांवर गुन्हे दाखल ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी कराड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका सुरू केला. चार स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या छाप्यात सापडली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाई करण्यात आली आहे.

कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून या कॅफेंमधे प्रेमीयुगूले तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक यापुर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसां मार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, साक्षात्कार पाटील, यांच्यासह संतोष सपाटे, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, महिला पोलीस कांचन हिरवे, ज्योती काटू, वैशाली यादव, धनश्री माने या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली चार पथके तयार करून ती कॅफेच्या परिसरात अचानक पाठवण्यात आली. एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले अश्लिल उद्योगास प्रोत्साहन देण्याचे प्रकार उघडकीस आले.पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांनी कॅफे चालक मालकांसह तिथे असलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार कॅफेत आढळलेल्या जोडप्यांवर मुंबई कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून कॅफे चालक मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.यापुढेही गैरप्रकार चालणारे कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवावी असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी केले आहे.

कराड- तासवडे येथे 10 लाखाचा गुटका जप्त ;पोलिसांची कारवाई

वेध माझा ऑनलाइन।
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी टेंपोसह दहा लाख ३० हजार रुपयांचा गुटखा पकडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

विकास वसंत जाधव (वय ३५, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की महामार्गावर शनिवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निपाणी (कर्नाटक) येथून टेंपो गुटखा घेऊन जाणार आहे, असे तळबीड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करून टेंपो ताब्यात घेतला.त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेंपोसह १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तळबीड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विकास वसंत जाधवला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.


३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ;

वेध माझा ऑनलाईन ।
कोयना भागात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.

सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना व हेळवाक वनपरिक्षेत्रात २८ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जेवणावळी करण्यासाठी वनक्षेत्रात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी वन क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण, मद्यपान करणे, वणवा लावणे, शिकार करणे, गोंधळ करणे आदी अनुचित प्रकार करणाऱ्या संबंधितांवर तत्काळ वन्यजीव व वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वनक्षेत्राकडे येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट लावून वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून जंगल क्षेत्रात रात्रगस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटक व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.