Sunday, March 8, 2026

पुण्यात दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन ; या पुलाला अजितदादांचे नाव देणार ;

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेला दुमजली उड्डाणपूल हा शहरातील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जात आहे. या पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष मागणी मांडली. त्यांच्या मते या प्रकल्पाची संकल्पना आणि त्यासाठीचा पाठपुरावा अजित पवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केला होता. 
मोहोळ यांनी सांगितले की, या पुलाच्या उभारणीमागे अजित पवार यांची दूरदृष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा अनेकांची आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शवले. त्यांनी स्पष्ट केले की, पुलाच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचे नाव देण्यास ते सहमत आहेत.


इराण भारताला कोणती मदत करणार ? घेतला मोठा निर्णय; काय आहे बातमी-?

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता अनेक देशांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर इराणने काही दिवसांपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली होती. चीन वगळता इतर देशांच्या तेलवाहू जहाजांना या मार्गातून जाण्यास बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला होता. या घोषणेमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती.
मात्र आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने आपला निर्णय बदलत होर्मुज सामुद्रधुनीचा वापर काही देशांसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार अमेरिका, इस्त्रायल, युरोपियन देश आणि त्यांचे सहयोगी राष्ट्र यांच्यासाठीच हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे भारतासारख्या देशांना या मार्गाने तेलाची वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील संभाव्य इंधन टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

१ एप्रिल पासून कोणते नियम होणार लागू? ; अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता ; राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पात्रतेचे निकष कडक करत नवीन नियम जाहीर केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होणार असून अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेशन कार्ड योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने पात्रतेचे नियम अधिक कठोर केले आहेत. ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या संकल्पनेला प्रभावी बनवण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. सरकारने उत्पन्न आणि मालमत्तेच्या आधारे लाभार्थ्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांनुसार शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते रेशन योजनेसाठी अपात्र ठरतील. ग्रामीण भागात ही मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन जसे की कार किंवा ट्रॅक्टर आहे, अशा कुटुंबांनाही आता स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय १०० चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर असलेल्या कुटुंबांनाही या यादीतून वगळले जाईल.
नवीन नियमांबरोबरच प्रशासकीय प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार पडताळणी करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तीचे रेशन कार्ड तात्काळ बंद केले जाऊ शकते.
याशिवाय घरात एसी  किंवा जनरेटरसारख्या सुविधा असलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असल्यास त्या संपूर्ण कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कोणी आपली खरी आर्थिक स्थिती लपवून लाभ घेत असल्याचे तपासात आढळले, तर त्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावानुसार वसुली केली जाईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. 
या नव्या छाननी मोहिमेमुळे देशभरातील सुमारे ७० लाख अपात्र रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्यक्षात गरिबी रेषेखालील आणि गरजू कुटुंबांना धान्याचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील कोणता आरोपी आता येणार जेलबाहेर ?

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आरोपी जयराम चाटे याला न्यायालयाने मर्यादित स्वरूपात दिलासा दिला असून काही तासांसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

धार्मिक विधीसाठी न्यायालयाची मुभा :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे हा आरोपी म्हणून अटकेत आहे आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध अनेक महिन्यांपासून घेतला जात असला तरी अद्याप तो सापडलेला नाही. 
दरम्यान जयराम चाटे याने आपल्या दिवंगत भावाच्या धार्मिक विधीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गावात उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्याला मर्यादित कालावधीसाठी बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. १३ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तो पोलिस बंदोबस्तात या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार आहे.
या निर्णयाबाबत सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीला बाहेर सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद केला होता. मात्र आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्व अटींचे पालन करण्याची तयारी दर्शवली. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लागणारा खर्चही भरण्याची जबाबदारी स्वीकारली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय दिला. त्यामुळे जवळपास १४ महिन्यांनंतर जयराम चाटे काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. मात्र त्याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गावी नेले जाईल आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यापासून कोणताही आरोपी इतक्या कालावधीनंतर बाहेर आला नव्हता, त्यामुळे ही घटना या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले/ सध्या वाढलेले तेलाचे दर लवकरच कमी होतील...

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र या परिस्थितीतही तेलाच्या दरांबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या वाढलेले तेलाचे दर लवकरच कमी होतील आणि बाजारात पुन्हा स्थिरता येऊ शकते. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकन लष्कराने इराणी नौदलावर लक्ष्य साधत मोठी कारवाई केली असून काही युद्धनौका बुडवल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईला ट्रम्प यांनी केवळ मर्यादित पाऊल असल्याचे सांगितले. त्याच वेळी अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल  तेहरान परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सौदी अरेबिया येथील तेल रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या संघर्षात दुबई  विमानतळालाही लक्ष्य करण्यात आले असून इराणकडून तेथेही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या युद्धाचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात जाणवत आहे.
या घडामोडींमध्ये ट्रम्प यांनी तेलाच्या किमतींबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच तेलाच्या दरांमध्ये वाढ होईल असा अंदाज होता आणि तो खरा ठरला. मात्र ज्या वेगाने दर वाढले आहेत, त्याच वेगाने ते खाली येण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे भविष्यात तेल बाजारात मोठा बदल दिसू शकतो, असे त्यांनी सूचित केले
यावेळी त्यांनी हमास हल्ल्याचाही उल्लेख केला आणि ७ ऑक्टोबर २०२३ ची घटना विसरू नये असे म्हटले. ट्रम्प यांच्या मते इराणी राजवटीविरोधातील कारवाई केवळ अमेरिकेसाठी किंवा इस्रायल साठी नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर प्रचंड वाढले असून त्याचा परिणाम जगभरातील महागाईवर होत आहे. अनेक देशांना इंधन आणि गॅसच्या टंचाईसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे

Friday, February 27, 2026

कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत विरोधी नेते वाटेगावकर व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी ; नगरसेवक शिकलगार आणि वाटेगावकर एकमेकांना भिडले;

वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी कराड पालिकेची अर्थसंकल्पीय सभा कराडच्या प्रीतिसंगम येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी पार पडली यावेळी सत्ताधारी व विरोधक (भाजप)  नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली वाटेगावकर व अल्ताफ शिकलगार यांच्यात यावेळी
जोरदार शाब्दिक चकमक झाली 
दरम्यान 314 कोटींचा हा अर्थसंकल्प यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला
दरम्यान या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही वाटेगावकर या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले

दरम्यान या अर्थसंकल्पाला विरोधीपक्ष नेते विजय वाटेगावकर यांनी भर सभेत "बोगस'  म्हटले याचा धागा पकडत नगरसेवक अल्ताफ शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली
यावेळी शिकलगार मधेच उठून बोलले की
एकीकडे आम्ही सहकार्य करू असे म्हणायचे आणि दुसरीकडे चुका दाखवायच्या आणि अर्थसंकल्प बोगस असल्याचे बोलायचे आम्हाला मूर्ख समजायच चाललंय का?  

यावर उत्तर देताना वाटेगावकर म्हणाले
आम्हाला जनतेने सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायलाच पालिकेत निवडून पाठवले आहे आम्ही तुम्हा सत्ताधार्यांना प्रश्न नाही विचारायचा... तर मग कोणाला विचारायचा? असे म्हणत हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस असल्याचा पुनरुच्चार पुन्हा 2 ते 3 वेळ यावेळी केला यावरून सत्ताधारी व वाटेगावकर यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली 

या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी नेते  वाटेगावकर म्हणाले...
हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस वाटते त्यामुळे  आम्ही सुचवलेले बदल त्यात झाले पाहिजेत... तसेच आमच्या पार्टी च्या इतर नगरसेवकांनी सांगितलेल्या सूचनांनुसार त्यामधून बदलदेखील केले गेले पाहिजेत... आणि आम्हाला ते दाखवुनच हे बजेट पुढे पाठवले जावे असे आम्ही सत्ताधार्यांना सांगितले आहे... 
या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही ते या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले
लोकहितासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ शहरातील लोकांचे नुकसान होऊ देणार नाही
असेही त्यांनी स्पष्ट केले
या सभेबाबत मी वारंवार माहिती मागत होतो पण आम्हाला या सभेबाबत  माहिती दिली नाही तर फक्त सभेपुर्वीची नोटीसच दिली गेली आम्हीदेखील नगरसेवक आहोत त्यामुळे आम्हालाही याबाबत कल्पना देणे, विश्वासात घेणे गरजेचे होते असेही वाटेगावकर यावेळी म्हणाले
दरम्यान भाजपच्या शिवाजी पवार अजय पावसकर व दिग्विजय डूबल या तिघांनी देखील सत्ताधार्यांना प्रश्न विचारले आणि पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काही सूचना देखील केल्या तसेच शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या बाचाबाचीवेळी  वाटेगावकर यांच्या बाजूने भाजपचे हेच तिघे खंबीरपणे बोलताना दिसले 

तर शिकलगार यांच्या बाजूने सत्ताधारी नगरसेवक उभे राहिलेले दिसले 
दरम्यान शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या या वादावादीची सध्या  जोरदार चर्चा सुरू आहे

Thursday, February 26, 2026

कराड दक्षिणमधील १३५ भजनी मंडळांना ३३.७५ लाखांचे अनुदान मंजूर : आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे विशेष प्रयत्न;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्याज्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम लवकरच भजनी मंडळांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते. भाजपा-महायुती सरकारने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. याअंतर्गत भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली होती. 

त्यानुसार कराड दक्षिणमधील जास्तीत जास्त भजनी मंडळांना या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष मोहिम राबवित भजनी मंडळांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लाभार्थी भजनी मंडळांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या अनुदानामुळे भजनी मंडळांना आवश्यक साहित्य खरेदीस मोठी मदत होणार असून, ग्रामीण भागातील सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक बळकट होण्यास हातभार लागणार आहे. या निर्णयाबद्दल कराड दक्षिणमधील सर्व भजनी मंडळांच्यावतीने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.