Thursday, September 14, 2023

आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कडक कारवाई करणार ; ग्रुप ऍडमिन व सोशल मीडिया वापरणाऱ्यांना पोलिसांचा आदेश ;

वेध माझा ऑनलाईन।  सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेली तीन दिवस बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पोलिसांकडून सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा व त्यातील सर्व तालुका पोलीस ठाण्याला महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या वतीने सोशल मीडिया वापरर्ते आणि Whatsapp ग्रुप ऍडमिनना प्रसिध्दी पत्रक काढून सूचक इशारा देण्यात आलेला आहे. सोशल मीडियाचा कोणीही अफवा व चुकीच्या गोष्टी पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या प्रकारानंतर कराड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीआरपीसी कलम 149 प्रमाणे कराडच्या पोलिसांकडून नोटीस काढण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशा अन्वये संपूर्ण सातारा जिल्हयामध्ये कलम 144 प्रमाणे जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 व 37 प्रमाणे सोशल मिडीया द्वारे जातीवाचक मॅसेज, पोस्ट अथवा एखादा संदेश व्हायरल करून दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल अशी परिस्थीती निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करणा-या विरूध्द मनाई हुकुम लागु केलेला आहे सदरचे नोटीस आपल्या ग्रुप मधील अॅडमीन व इतर सर्व सदस्य यांना व्हॉटस अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलीग्राम व इतर सोशल मिडीया अॅप द्वारे सॉफ्ट कॉपी द्वारे बजावली आहे व आपणांस लागू आहे. सदरची नोटीसाचे उल्लंघन झाल्यास आपले विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरचे नोटीस आपले विरूध्द मा. न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असे कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. टी. पाटील यांनी म्हंटले आहे

No comments:

Post a Comment