Thursday, September 14, 2023

गणेश मंडळांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ; काय आहे तो निर्णय ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी महाराष्ट्रासह भारतच नव्हे तर जगभरातील भक्तगण उत्सुक झाले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाचं आगमन होतं. विदेशात स्थायिक झालेल्या मराठी समुदायाकडूनही गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. घरगुती गणपतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. याच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत ट्विटर हँडलवर या निर्णयासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यातील शेकडो गणेश मंडळांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अवघ्या पाच दिवसांत गणरायाचं आगमन होत असताना गणेश मंडळांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे निर्णय?
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या पोस्टनुसार आता राज्यातील गणेश मंडळांना एकाच वेळी पाच वर्षांसाठीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या गणेश मंडळांना आगामी पाच वर्षांसाठी गणेशोत्सवाचं अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करणं सोपं होणार आहे.

लाभ घेण्यासाठी अट!
दरम्यान, पाच वर्षांसाठी एकाच वेळी परवानगी घेण्याच्या निर्णयाचा लाभ सरसकट सर्व गणेश मंडळांना मिळणार नाहीये. राज्य सरकारने त्यासंदर्भात एक महत्त्वाची अट घातली आहे. गेल्या दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचं पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसणाऱ्या अशा उत्कृष्ट गणेश मंडळांनाच पाच वर्षांसाठीची परवानगी एकाच वेळी घेता येणार आहे. त्यामुळे अशा गणेश मंडळांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.




No comments:

Post a Comment