Tuesday, March 19, 2024

नागपुरात नितीन गडकरिंची जागा धोक्यात ? काय आहे कारण? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। काँग्रेसच्या सर्व गटांनी आपापसातले मतभेत विसरून सर्व गटांनी एकत्रित ताकतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार  यांच्या घरी नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक खास बैठक पार पडली. काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाचे गट तट विसरून नागपुरातून एकच नाव पक्षश्रेष्ठींकडे सूचवण्याचा निर्णय झाला आहे.

विदर्भात काँग्रेसची मोठी ताकद असूनही नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसची चांगलीच पिछेहाट होताना दिसतेय. पण आता विलास मुत्तेमवार, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी हे तीनही नेते एकत्रित आल्यामुळे भाजपच्या नितीन गडकरींसमोर मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 

विकास ठाकरेंच्या नावावर एकमत ? 
नागपूरचा उमेदवार कोण असेल याबद्दल काँग्रेस नेते सध्यातरी काही बोलायला तयार नाहीत. असं असलं तरी एकच नाव पक्ष नेतृत्वाकडे सूचवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर नागपुरातील सर्व दिग्गज काँग्रेस नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे अभिजीत वंजारी यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरु आहे

आता गट तट विसरून नागपूरची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवू असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गेली दोन लोकसभा निवडणूक काँग्रेस नागपुरातून पराभूत झाली आहे. मात्र अबकी बार नागपुरातून काँग्रेस खासदार असाच आमचा निर्धार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे. तर आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी सूचक प्रतिक्रिया आमदार विकास ठाकरे यांनी दिली आहे.

काँग्रेसची विदर्भात मोठी ताकद असतानाही त्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. नागपूरमधील काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंडही बघत नसल्याचं चित्र आहे. त्यामध्ये विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचं नाव घेतलं जातं. पण आता हे तिघेही एकत्रित आल्याने मात्र निवडणुकीमध्ये वेगळा परिणाम दिसू शकतो.

No comments:

Post a Comment