Monday, February 24, 2025

कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारेंनी ठराविक ठेकेदारांना टेंडर भरता येईल अशी प्रक्रिया राबवली ; अनूनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सचिन पाटील यांचा थेट आरोप ; म्हणाले...या भानगडीमागचे गौडबंगाल काय ? चौकशीची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
निविदा प्रक्रिया सर्व कंत्राटदारासाठी खुली असून त्यात स्पर्धा होणे आवश्यक आहे. स्पर्धा झाल्यास चांगली कामे होऊन त्यातून नगरपालिकेचा फायदा होतो. असे असताना
माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड नगरपालिकेला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सुमारे ५ कोटी रुपयांची झाडे लावण्याबाबतची इ नाविदा प्रक्रिया मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत आहे. ही निविदा 'लिमिटेड' केली आहे. त्यामुळे ठरावीक ठेकेदारांना निविदा भरता येत असून इतरांना डावलले जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी अनुनी भागीदार इनफा इन्फ्रास्ट्रक्चरचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

याबाबत नगरपालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

माजी वसुंधरा अभियानांतर्गत झाडे लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रकमेच्या एकूण ५ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा लिमिटेड करण्यात आल्या आहेत. याबाबत नगरपालिकेत माहिती विचारली असता सदर निविदा जाहीर झाल्याबद्दल ज्या कंत्राटदारास ई मेल आला आहे, तोच कंत्राटदार ही निविदा भरू शकतो. इतर कंत्राटदार ही निविदा भरू शकत नाहीत. ही निविदा सर्वांसाठी खुली ठेवलेली नाही. याबाबत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना भेटून सदरची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी अभियंता काकडे यांना या संदर्भात भेटण्यास सांगितले, तर काकडे यांनी या संदर्भात आम्ही आमच्या टेंडर क्लार्कला विचारून सांगतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत.
 
सदर निविदा लिमिटेड करणे हे आदर्श ई-निविदा नियमावलीची पायमल्ली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा होणार नाही. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आमची आनुनी इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गेली 17 वर्षे गव्हर्मेंट निविदा भरत असून विविध कामे करत आहे. नगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र आहे तरीसुद्धा आम्हाला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कामे करण्यासाठीची निविदा गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्येही सुरू करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही या निविदा भरल्या होत्या, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही निविदा प्रक्रिया त्यावेळी रद्द केली होती. त्यानंतर वर्षांनी पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र ती  ठराविक कंत्राटदारांसाठीच करून इतरांना त्यात डावलण्यात आले आहे. या मागचे गौडबंगाल काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे सचिन पाटील यावेळी म्हणाले 


Thursday, February 20, 2025

कराडमध्ये बंदिस्त गटर बांधण्यास प्राधान्य देणार; राजेंद्रसिंह यादव; शुक्रवार पेठेत सव्वा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ

वेध माझा ऑनलाइन
कराड शहरवासीयांना नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. गटर्सबाबात सतत येणाऱ्या तक्रारी पाहता यापुढील काळात शहरात बंदिस्त गटर बांधण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बंदिस्त गटर बांधण्यात येत असल्याची माहिती शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

येथील शुक्रवार पेठेत विविध ठिकाणी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राजेंद्रसिंह यादव बोलत होते.

ते म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून कराड फेज टूमधील‌ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून विविध प्रभागात रस्ते, गटर्स व इतर कामे सुरू आहेत. रस्ते करत असताना त्या भागातील गटर्स बंदिस्त करण्यात येत आहेत. हे गटर्स ड्रेनेज पाईपला जोडण्यात येते आहेत. या संकल्पनेमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

यावेळी माजी सभापती स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सुधीर एकांडे, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, प्रीतम यादव, ओमकार मुळे, दिनेश यादव, ऋतुराज मोरे, रुपेश कुंभार, नुरुल मुल्ला, राहुल खराडे, दिनेश यादव, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, प्रकाश पवार, शिवाजी माळी, अशोक पवार, विनायक चौकर, भैय्यासाहेब तवर, जयभारत, ओम व महारुद्र हनुमान मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या विकास कामांत आझाद चौक ते सात शहीद चौक रस्ता बीएमबीसी करणे 28 लाख 32 हजार, मोरे घर ते माने घर रस्ता डांबरीकरण करणे 16 लाख 28 हजार, रंगार वेस महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण 32 लाख 64 हजार, मारुती मंदिर ते जयभारत कमान रस्ता डांबरीकरण करणे 29 लाख 23 हजार, मडकी घर  ते गुरसाळे ज्वेलर्स रस्ता बीएमबीसी करणे 18 लाख 34 हजार आदी कामांचा समावेश आहे.

मोठं संकट धडकणार; आयमडीने दिला इशारा ; 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार ?काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाइन
पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वीजा आणि मेघगर्जनेची देखील शक्यता आहे, असंही आयएमडीनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पूर्वोत्तर भारतामधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार पुढील काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून, काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू शकतो.

स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर आढळला दुर्लभ डुम्सडे मासा ; पसरली घबराट ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन
अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो, त्यामुळे घबराट पसरली आहे.

धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, मुंडेंना 'या' दुर्मिळ आजाराचं निदान ;

वेध माझा ऑनलाइन
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्या दुर्मिळ आजाराचं नाव बेल्स पाल्सी असे आहे. बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर या आजाराचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमला अनुपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्याच्यावर मुंडे उपचार घेत आहेत.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप...

वेध माझा ऑनलाइन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप केले. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती, असं धनंजय मुंडे म्हणाले. अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता आहे. कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत ते आरोप फेटाळून लावले आहेत. तर अंजली दमानिया फक्त मिडीया ट्रायलसाठी आरोप करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. तर आम्ही खोटी कागदपत्र तयार केली असतील तर योग्य त्या मंचावर तक्रार करावी असं थेट आव्हान देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय. बदनामीबद्दल अंजली दमानिया यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली.

Wednesday, February 19, 2025

शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धां उत्साहात ;

वेध माझा ऑनलाइन
शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे नुकत्याच पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन श्री किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले 
सदर स्पर्धसाठी 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
    मुली--
1 ली ते 4 थी 
1 शरयू कदम
2 विभावरी कांबळे
3 मियारा मोरे व विभावरी गायकवाड 
5 वी ते 7 वी 
1 श्रद्धा इंगळे
2 अदिती आदमने
3 मानसी महाडिक व मिरा तोडकर.
8 वी ते 10वी 
1 देवांशी पाटील
2 आर्या देशमुख 
3 गायत्री कदम व अनन्या पाटील 
    
 मुले 
1 ली ते 4 थी 
1 विराज आरजूकडे
2 शौर्य पावसकर
3 गोयम मूथा व भार्गव पाटील
5 वी ते 7 वी 
1 कनक जोशी 
2 परम रसाळ 
3 शर्विल बानुगडे व चैत्र शहा 
8 वी ते 10वी 
1.राजवीरसिंह डूबल
2 अर्जुन जाधव
3 मनिष पाटील व पियूष   पाटील 
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री अतुल पाटील (ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच)यांच्या हस्ते पार पडला बक्षीस समारंभास श्री किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे आदी उपस्थित होते..

Monday, February 17, 2025

विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा ; कल्याण कुलकर्णी सरांचा विद्यार्थ्यांना सल्ला ;

वेध माझा ऑनलाइन।
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा ठरवली पाहिजे. मी कोण होणार? हे आत्ताच ठरवा. जर भविष्याचा वेध घेतला तरच जीवनात यश मिळू शकते. त्यासाठी आपल्या जीवनात मोबाईलचा वापर कमी करा,पुस्तकांशी मैत्री करा असे प्रतिपादन हौसाही विद्यालयाचे शिक्षक श्री कुलकर्णी यांनी केले 
ते दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या "सेंड ऑफ" कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते

ते म्हणाले ज्या शाळेने चांगले संस्कार, जीवन घडवण्याची प्रेरणा आपणास दिली त्या शाळेला कदापिही विसरू नका भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आई, वडील यांच्यानंतर शिक्षकांचे महत्त्व आहे, शिक्षक हा तुमचे जीवन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहा त्यामुळे आपण आपले खेळ संस्कृती, आपली नाती विसरत चाललो आहोत. त्यामुळे वाचाल तर वाचाल या संकल्पनेप्रमाणे पुस्तकांशी दोस्ती करा. असेही ते म्हणाले

कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड ;

वेध माझा ऑनलाईन 
कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी दिली. डॉ. मिश्रा यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाने कुलगुरु निवडीसाठी रितसर शोध समिती गठीत केली होती. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ॲन्ड बिलीरी सायन्सेसचे कुलगुरू डॉ. दीपक टेम्पे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य प्रा. ई. सुरेश कुमार आणि वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांचा समावेश होता. 

या शोध समितीने ३ नावे निश्चित करुन, ती कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सोपविली. त्यातून कुलपती डॉ. भोसले यांनी डॉ. नीलम मिश्रा यांच्या नावाची निवड करत, त्यांची कुलगुरुपदी फेरनियुक्ती केली. २८ जानेवारीला त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला 

लाडकी बहीण योजना ; महत्त्वाची अट टाकल्याने बहुतांश अर्ज बाद होणार ;काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.

विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी द्यावे लागणार आहेत. तसेच हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेटही महिलांना जमा करावे लागणार आहे. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहि‍णींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते. यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वत:हूनच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, असे अर्ज केले होते.
संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचाही लाभ घेत असलेल्या 2.3 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.
याशिवाय, सरकारच्या विविध योजनांमधून 1500 किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील तब्बल साडेसहा लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना, या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. नमो शेतकरी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना 1000 रुपये मिळतात. त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपयेच देण्यात येतील.
लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनच लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे मिळतील.



सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंना टोला ;

वेध माझा ऑनलाइन।
सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, असं वक्तव्य करत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नाव न घेता माजी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संबंध पूर्ण सातारा जिल्ह्याला सर्वश्रूत आहेत. सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणं किंवा टीका करण्याची एकही संधी दोघंही सोडत नाही. फलटणमधून रामराजेंच्या उमेदवाराचा विधानसभेला पराभव असून त्याचा संदर्भ घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर चांगलाच निशाणा साधला. ‘मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली २० वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेले आहे’, असं वक्तव्य जयकुमार गोरेंनी करत परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष घणाघात केला. पुढे ते असेही म्हणाले, अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली. सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना खोचक टोला लगावला आहे.

दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली,स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण

वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतील अनेक सामान्य माणसांचे पैसे अडकून पडलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आला होता. राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याच्यावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने कर्ज द्यायला भाग पाडले. ही कर्जे भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली. या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही. तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांसाठी स्वत:च्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वा दराने भाड्याने दिले. या सगळ्यामुळे बँक डबघाईला आली, असा आरोप झाला होता. या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आमदार राम कदम यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला, अन्यथा कारवाईला तयार राहा. न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत. या बँकेचा मी सुद्धा एक खातेदार असून त्यामुळे माझे सुद्धा पैसे याच बँकेत अडकले आहेत. माझ्यासह माझ्या कुटुंबातीलही काही जणांचे खाते याच बँकेत आहे. त्यांचेही पैसे बँकेत अडकले आहेत. या परिस्थितीत, मी या प्रकरणातील पीडित व्यक्ती आहे, याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणामध्ये, माझ्यासह प्रत्येक खातेदाराला त्यांनी बँकेत ठेवलेला पैसा परत मिळावा यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील असल्याचे राम कदम यांनी सांगितले.कोणतीही सत्यता पडताळून न पाहता माझ्याविरोधात काहीजणांनी विनाकारण बडबड सुरू केली आहे. यावर, आधारित बातम्या सुद्धा प्रसिद्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही आणि उलट फसलेल्या हजारो लोकांना मदत करण्याची माझी भूमिका नेहमी आहे आणि भविष्यातही राहील. तरीसुद्धा विनाकारण या घोटाळ्याशी माझे नाव जोडले गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही.  न्यू इंडिया सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरू करत आहे. तरी कृपया " असत्य "  बातम्या  आणि तशी वक्तव्य सुद्धा करताना वरील बाब लक्षात असू द्यावी. माझी सरकारकडे आग्रही मागणी आहे की  सर्व पीडितांना न्याय मिळावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक पेक्षा अति कडक कारवाई व्हावी, असे राम कदम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवी मुंबईच्या भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत काय म्हणाला...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन
नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.  माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या  माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भरत जाधव यांनी काय म्हटलंय?

मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे  त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे.  निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे.  जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.असे जाधव यांनी म्हटले आहे

Monday, February 10, 2025

आमदार श्रीकांत शिंदेंच्या डिनरला जाणार?;

वेध माझा ऑनलाइन 
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज (10 फेब्रुवारी) रात्री घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नवोदित आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदारांसह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार का?, अशी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 78 आमदार दिल्लीत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील घरी महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे. 

Saturday, February 8, 2025

रस्ता सुरक्षा मॅरेथॉन फलकाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्याचे कॉमन मॅन उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते व गुरूवर्य एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन आज रविवारी ९ रोजी करण्यात आले आहे. या मॅरेथॉनच्या फलकाचे अनावरण ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्योजक सचिन पाटील यांची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेची माहिती घेऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कराड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीतनाना पाटील मित्र परिवार व कराड आरटीओ विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन आज करण्यात आले. ही मॅरेथॉन निःशुल्क असून नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारअखेर सुमारे 3 हजार जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केल्याचे रणजित पाटील म्हणाले. 
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही दिल्या शुभेच्छा
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही मॅरेथॉन तयारीचा आढावा रणजीतनाना पाटील यांच्याकडून घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. भोसले यांनी केले. मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन कराडमध्ये करण्याचा प्रयत्न तसेच कराडला हेल्थ हब बनवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.