लोकांना महायुतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना महायुतीत राहायचं नसेल ते बाहेर पडतील, असे वक्तव्य भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. अतुल सावे यांनी शिंदे गटाच्या आमदाराला हा इशारा दिल्याचे समजते. भाजपकडे पाच वर्षे आहेत. आमच्याकडे 237 आमदार आहेत. त्यामुळे ज्यांना युतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना नाही राहायचं ते बाहेर पडतील. मी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही, असे अतुल सावे यांनी म्हटले. ते सोमवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.काही दिवसांपूर्वी तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबुराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. अतुल सावे यांनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करुन त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबुराव कदम यांनी दिला होता. तसेच मेघना बोर्डीकर यांनी पत्र लिहून निधी वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत काम रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी रोखठोक भूमिका घेत एकप्रकारे मेघना बोर्डीकर आणि आमदार बाबुराव कदम यांना थेट इशारा दिला आहे. मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही. आमच्याकडे 237 आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतोय, ज्याला युतीत राहायचंय त्यांनी राहावं, ज्यांना नाही राहायचं, त्यांनी बाहेर पडावं, असे अतुल सावे यांनी म्हटले. अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अतुल सावे यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या वादात आपल्या गटाच्या आमदारांची बाजू कशी उचलून धरणार, हेदेखील पाहणे औत्स्युकाचे ठरेल.गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांन निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुनही अतुल सावे यांनी दिला नाही. हा निधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला. त्यामुळे अतुल सावे जिल्ह्यात दौऱ्यावर येतील तेव्हा विरोध करुन आंदोलन करेन, असा इशारा शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी दिला होता. तर मेघना बोर्डीकर यांनी अतुल सावे यांना पत्र लिहीत मंजूर केलेली काम रद्द करण्याची मागणी केली होती.
No comments:
Post a Comment