Wednesday, September 30, 2026

अतुल भोसले यांनी टाकला पत्ता! उंडाळकरांच्या उमेदवारीवर महायुतीचा शिक्का? प्रक्रिया गटातून अतुल भोसले यांचा अर्ज; सोसायटी गटातून उदयदादा पाटील-उंडाळकर महायुतीचे ‘फिक्स’ उमेदवार!

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या राजकीय डावपेचांना आता वेग आला आहे. प्रक्रिया गटातून आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतानाच सोसायटी गटातून ॲड. उदयदादा पाटील-उंडाळकर हे महायुतीचे ‘फिक्स’ उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा राजकीय संदेश गेला आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अतुल भोसले यांनी महायुतीच्या एकत्रित लढतीची भूमिका स्पष्ट केली. “प्रक्रिया गटातून मी माझा अर्ज भरला आहे. ॲड. उदयदादा पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज भरला आहे. जिल्ह्यात महायुती म्हणून आम्ही सगळे या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही महायुती म्हणून लढत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

...तर माझा अर्ज राहील...’
विशेष म्हणजे, महायुतीच्या जागावाटपासाठी “थोडं पुढं-मागं व्हावं लागलं तर माझीही तयारी आहे,” अशी भूमिका अतुल भोसले यांनी घेतली. महायुतीच्या सर्व नेत्यांनी निर्णय सांगितल्यास त्यानुसार भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिले. मात्र, त्याचवेळी उदयदादा पाटील-उंडाळकर हे सोसायटी गटातून महायुतीचे उमेदवार असतील, हे त्यांनी स्पष्ट केल्याने या उमेदवारीबाबतचे संकेत अधिक ठळक झाले आहेत.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांकडून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली जात असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटी गटातील उदयदादा पाटील-उंडाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीचा पाठिंबा मिळणार असल्याचे अतुल भोसले यांच्या वक्तव्यामुळे संकेत मिळाले आहेत.

अतुल भोसले यांनी स्वतःचा अर्ज दाखल करताना उंडाळकरांच्या उमेदवारीचा मुद्दा जाहीरपणे पुढे आणल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा पुढचा  "प्लॅन’  काय असावा ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आता महायुतीच्या अंतिम जागावाटपात कोणाच्या पदरात कोणती जागा पडणार, कोण माघार घेणार आणि कोणाला वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ‘पुढं-मागं’ व्हावे लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment