सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुल भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते.त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.
खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो.मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अशी प्रतिक्रिया डॉ.अतुल भोसले यांनी दिली आहे
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ अतुलबाबांची झालेली निवड महत्त्वाची मानली जाते.