Tuesday, August 5, 2025

कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या वाढीव खर्चास मंजुरी ; १७.१६ कोटी रुपयांच्या निधीस सरकारने दिली मान्यता ;

वेध माझा ऑनलाइन
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून, भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस भाजपा-महायुती सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच या पाईपलाईनचे स्थलांतर होऊन, विमानतळ विस्तारीकरण कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून, याठिकाणी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून विमानतळ उभा राहिले. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारामुळे कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

पण या निधीमध्ये भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी २०१२ च्या शासन निर्णयात नमूद केलेली ८ कोटी ५० लाखांची तरतूद तशीच ठेवण्यात आली होती. वास्तविक या खर्चात संबंधित पाईपलाईनचे स्थलांतर शक्य नसल्याने, स्थलांतराअभावी विमानतळ विस्तारीकरण कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी, भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थितीबाबत चर्चा केली होती. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत, शासनाने भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रकाशित करण्यात आला आहे. 

भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी सुधारित खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे कराड विमानतळाच्या विकासाला गती मिळणार असून, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार व आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.

No comments:

Post a Comment