Sunday, August 10, 2025

फडणवीसांनी दिले शरद पवारांना उत्तर ; म्हणाले... हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम ;

वेध माझा ऑनलाइन
आजपर्यंत राहुल गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असली तरी शरद पवार तसं कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवार साहेबांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार अचानक मतदानप्रक्रियेतील फेरफाराविषयी बोलू लागले आहेत. हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी आजच एका पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी  दिल्लीत दोन जण आपल्याला भेटायला आले होते. या दोघांनी आपल्याला 160 मतदारसंघांमध्ये हमखास विजय मिळवून देतो, असे सांगितले होते. मात्र, आम्ही पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांच्या सर्व आरोपांचे खंडन केले.

विरोधकांनी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताइतक्या पारदर्शक आणि मुक्त पद्धतीने निवडणुका कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्यावर आरोप करणारी मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. पण संसदेतील शपथ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात चालते का? त्यांना माहिती आहे की, आपलं खोटं पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, असे हे पळपुटे लोक आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

No comments:

Post a Comment