माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत कराड नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पार पडली.
बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, माजी अध्यक्ष ऋतुराज मोरे, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, जेष्ठ नेते विठ्ठलराव शिखरे, माजी नगरसेवक अशोक कोळी, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, श्रीकांत मुळे, हणमंत घाडगे तसेच पै. अक्षय सुर्वे, ज्ञानदेव राजापूरे, विश्वाजीत दसवंत, साहेबराव शेवाळे, नितीन ओसवाल, जितेंद्र ओसवाल, सुनील शिंदे, शरद गाडे, इरफान सय्यद, डॉ. मधुकर माने, ऍड. इरशाद खैरतखान, विक्रम देशमुख, योगेश लादे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शहरातील प्रभागनिहाय काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळाची तयारी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा पर्यायही विचाराधीन आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच रणनिती आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.”
बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आग्रह नोंदवला.
युवानेते इंद्रजीत चव्हाण म्हणाले “कराड शहराने आमच्या चव्हाण कुटुंबावर सदैव प्रेम दाखवले आहे. आपले नेते व मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीही सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी राजकारण केले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचा विचार जपत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.”
पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण यांनी निवडणुकीसंबंधी तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली. “कराड शहराने नेहमी काँग्रेसला भरघोस मतदान दिले आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेसला निश्चित यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचा पराभव करण्याची ताकद केवळ काँग्रेस मध्येच- ऍड. अमित जाधव
काँग्रेस हा समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष आहे. कराड शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक विकास कामे केली असून त्या आधारे निवडणुकीला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. कराड नगरपालिका निवडणुकीत भाजप ला पराभूत करण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षाकडेच आहे.
बैठकीच्या शेवटी राहुल चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, इरफान सय्यद, शरद गाडे, अक्षय सुर्वे, अमित माने आदींसह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडली. सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र चिंगळे यांनी केले व आभार जितेंद्र ओसवाल यांनी मानले.