Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment