Tuesday, September 1, 2026

वेध- माझा च्या प्रश्नावर अतुल भोसलेंचा ‘बॉम्ब’; अतुलबाबा म्हणाले... तर...उदयसिह पाटलांना भाजपकडून लढावे लागेल...अतुल भोसलेंच्या या बोलण्याचा अर्थ काय? कराड तालुक्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच कराड दक्षिणेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारीच्या चर्चेला आता थेट पक्षीय समीकरणांचा तडका मिळाला असून, आमदार अतुल भोसले यांनी आज कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अतुल भोसले?
‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तुमचे आणि ॲड. उदयसिह पाटील यांचे नाव चर्चेत आहे ’ असे वेध- माझा कडून विचारण्यात आले असता डॉ अतुल भोसले यांनी अत्यंत सूचक उत्तर देत “भाजप स्वतंत्रपणे लढणार असेल, तर उदयसिह पाटील यांना भाजपमधून उभे राहून निवडणूक लढवावी लागेल. अन्यथा पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट केले. त्यांच्या या बोलण्यामागचा अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे...

अतुल भोसले यांच्या या विधानाने अनेक राजकीय अर्थ काढले जात असून, भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या चौकटीबाहेर जाऊन स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या ॲड. उदय पाटील यांना भाजपमधून निवडणूक लढवावी लागेल, असे अतुल भोसले यांनी स्पष्टपणे सांगितल्याने महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीच्या समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला आहे.

दरम्यान ॲड. उदयसिह पाटील हे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडमधील नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी स्वतः अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदय पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले पॅनेलला मदत केली होती. त्यानंतर या राजकीय सहकार्याच्या बदल्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऍड उदय पाटील यांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचीही राजकीय चर्चा रंगली होती.
मात्र आता अतुल भोसले यांनी उदय पाटील यांनी भाजपमधून निवडणूक लढवावी, असे सूचक विधान केल्याने आता पुढे काय होणार? हाच सवाल निर्माण झाला आहे

अतुल भोसले यांनी टाकलेला हा ‘बॉम्ब’ आता केवळ कराड दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, उदयसिह पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात आणि भाजप-राष्ट्रवादीतील स्थानिक समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जयकुमार गोरे, यांच्यानंतर आता अतुल भोसले यांचा ‘सिग्नल’?
काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती.
त्यातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही या राजकीय हालचालींवर भाष्य करत, “आम्ही तुम्हाला या निवडणुकीत तुमच्याबरोबर का चालत नाही, असे दोन्ही मंत्र्यांना विचारू; मग आम्हीही गप्प बसणार नाही,” असा इशारा दिला होता.
आता अतुल भोसले यांनी उदयसिह पाटील यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखी धार आली आहे.

No comments:

Post a Comment