Wednesday, September 2, 2026

उदयदादांना भाजपमधून लढावे लागेल - आमदार अतुलबाबांच्या ‘रोखठोक’ विधानाने जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात खळबळ; ;भाजप जो उमेदवार देईल त्याचे काम करू’ या अतुलबाबांच्या विधानात दडलेला संकेत काय? त्यांची उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; पण संकेत मात्र बोलके? जिल्ह्यात चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या एका रोखठोक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल, असे सांगतानाच, “जर तसे झाले नाही तर भाजप जो उमेदवार देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट करून आमदार भोसले यांनी जिल्हा बँक निवडणुकीतील आपल्या भूमिकेबाबत नवा राजकीय संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असताना ते भाजपच्या चिन्हावर किंवा भाजपच्या माध्यमातून कसे निवडणूक लढवणार, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार भोसले यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, “उदयदादा भाजपमधून लढणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण?” या प्रश्नाभोवती आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण फिरू लागले आहे.

भाजप जो उमेदवार देईल त्याचे काम करू’... विधानात दडलेला संकेत?
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अतुलबाबांनी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचाही संदर्भ घेतला. भाजप ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटल्याचा अर्थ “आम्ही सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढणार” असा असल्याचे अतुलबाबांनी स्पष्ट केले.मात्र, याच चर्चेत ‘जर-तर’च्या भाषेत बोलताना त्यांनी उदयसिंह पाटील यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आणि भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करावे लागेल, असे सांगितले.याच एका वाक्याने राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
कारण, जर उदयसिंह पाटील भाजपकडून निवडणूक लढवणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण? आणि त्या उमेदवारासाठी कराडसह जिल्ह्यातील भाजपची ताकद कोणाच्या मागे उभी राहणार? या प्रश्नांची उत्तरे 
शोधण्यास वेध माझा ने सुरुवात केली आहे.

उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; 
पण संकेत मात्र बोलके!
आमदार अतुलबाबा भोसले यांनी मात्र अद्याप “मीच भाजपचा उमेदवार” अशी आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून होईपर्यंत स्वतःचे नाव पुढे न आणता योग्य वेळ साधण्याची ही रणनीती असू शकते. पक्षाने निर्णय जाहीर केल्यानंतरच स्वतःची उमेदवारी अधिकृतपणे समोर आणण्याचा त्यांचा मानस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे अतुलबाबांच्या या विधानाकडे केवळ एक साधे राजकीय वक्तव्य म्हणून न पाहता, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीबाबतचा सूचक संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.

उदयदादांच्या नावाची चर्चा संपवण्यासाठी ‘राजकीय गुगली’?
उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महायुतीतील घटक पक्षांच्या समीकरणात त्यांचे नाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नावाची आणि अतुलबाबांच्या नावाची एकाचवेळी सुरू असलेली चर्चा थांबवण्यासाठी अतुलबाबांनी हे वक्तव्य केले असावे, अशीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
“उदयदादा भाजपमधून उभे राहणार असतील तर ठीक; अन्यथा भाजप जो उमेदवार देईल त्याचे काम करावे लागेल,” या भूमिकेतून त्यांनी एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्याबाबत थेट संघर्षाची भूमिका घेतलेली नाही, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराबाबत पक्षनिष्ठेची भूमिका स्पष्ट केली आहे.मात्र, याच भूमिकेतून स्वतःच्या संभाव्य उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा सवालही आता उपस्थित होत आहे.

बॉम्ब’ फुटला; 
आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही भाजपची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र, अतुलबाबांच्या एका विधानाने या निवडणुकीतील राजकीय गणितांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.उदयसिंह पाटील नसतील तर मग भाजपचा दुसरा उमेदवार कोण? का भाजपचा तो दुसरा उमेदवार अतुलबाबाच असणार का?या प्रश्नाचे उत्तर अद्याप अधिकृतपणे मिळालेले नसले, तरी अतुलबाबांच्या विधानाने त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेला पुन्हा जोरदार हवा मिळाली आहे... पाहूया पुढे काय होते ते...


No comments:

Post a Comment