Wednesday, September 30, 2026

अतुल भोसले यांनी टाकला पत्ता! उंडाळकरांच्या उमेदवारीवर महायुतीचा शिक्का? प्रक्रिया गटातून अतुल भोसले यांचा अर्ज; सोसायटी गटातून उदयदादा पाटील-उंडाळकर महायुतीचे ‘फिक्स’ उमेदवार!

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या राजकीय डावपेचांना आता वेग आला आहे. प्रक्रिया गटातून आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतानाच सोसायटी गटातून ॲड. उदयदादा पाटील-उंडाळकर हे महायुतीचे ‘फिक्स’ उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा राजकीय संदेश गेला आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अतुल भोसले यांनी महायुतीच्या एकत्रित लढतीची भूमिका स्पष्ट केली. “प्रक्रिया गटातून मी माझा अर्ज भरला आहे. ॲड. उदयदादा पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज भरला आहे. जिल्ह्यात महायुती म्हणून आम्ही सगळे या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही महायुती म्हणून लढत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

...तर माझा अर्ज राहील...’
विशेष म्हणजे, महायुतीच्या जागावाटपासाठी “थोडं पुढं-मागं व्हावं लागलं तर माझीही तयारी आहे,” अशी भूमिका अतुल भोसले यांनी घेतली. महायुतीच्या सर्व नेत्यांनी निर्णय सांगितल्यास त्यानुसार भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिले. मात्र, त्याचवेळी उदयदादा पाटील-उंडाळकर हे सोसायटी गटातून महायुतीचे उमेदवार असतील, हे त्यांनी स्पष्ट केल्याने या उमेदवारीबाबतचे संकेत अधिक ठळक झाले आहेत.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांकडून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली जात असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटी गटातील उदयदादा पाटील-उंडाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीचा पाठिंबा मिळणार असल्याचे अतुल भोसले यांच्या वक्तव्यामुळे संकेत मिळाले आहेत.

अतुल भोसले यांनी स्वतःचा अर्ज दाखल करताना उंडाळकरांच्या उमेदवारीचा मुद्दा जाहीरपणे पुढे आणल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा पुढचा  "प्लॅन’  काय असावा ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आता महायुतीच्या अंतिम जागावाटपात कोणाच्या पदरात कोणती जागा पडणार, कोण माघार घेणार आणि कोणाला वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ‘पुढं-मागं’ व्हावे लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा बँकेसाठी आमदार अतुलबाबांचा अर्ज दाखल ; अतुलबाबा म्हणाले...ही निवडणूक महायुती म्हणून लढणार ; ऍड उदयदादा पाटील यांची उमेदवारी "फिक्स' , मात्र, माझी पुढं मागं व्हायची तयारी -

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रक्रिया गटातून मी माझा अर्ज आज भरला आहे तसेच ऍड उदयदादा पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज भरला आहे जिल्ह्यात महायुती म्हणून या निवडणुकीत आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही महायुती म्हणून लढत आहोत  त्यामुळे या निवडणुकीत माझा अर्ज वरिष्ठ नेत्यांनी सांगितला तर राहील...आणि महायुतीसाठी थोडं पुढं- माग व्हावं लागलं तर तशीही माझी तयारी आहे...मात्र उदयदादा पाटील उंडाळकर हे सोसायटी गटातून  महायुतीचे फिक्स उमेदवार असतील असे आमदार अतुल भोसले यांनी आज स्पष्ट केलं

आज आमदार अतुलबाबा यांनी या निवडणुकीसाठी प्रक्रिया गटातून आपला अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

दरम्यान
महायुती म्हणून राष्ट्रवादी सेना आणि भाजप लढणार असल्याने सेना भाजप तसेच राष्ट्रवादी च्या बाजूचे पारडे या निवडणुकीत जड झाल्याचे सध्यातरी चित्र आहे त्यामुळे सोसायटी गटातून महायुतीच्या मदतीने ऍड उदयदादा पाटील यांचा विजय सुकर होणार हे आता जवळजवळ स्पष्टच झाले आहे

‘दुष्काळ जाहीर झाला तर अतुलबाबांचे जाहीर अभिनंदन; नाही तर रस्त्यावर उतरू!’काँग्रेसचे अजितअप्पा पाटील चिखलीकर यांचा इशारा;

वेध माझा ऑनलाईन।
कराड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली असून, तालुक्यात मंडल निहाय दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, आमदार अतुल भोसले यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून कराडचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी भागात समावेश होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मग काँग्रेसला ही मागणी करण्यास उशीर झाला नाही का? असा सवाल ‘वेध माझा’ने काँग्रेसचे राज्य सचिव अजितअप्पा पाटील-चिखलीकर यांना केला.
यावर उत्तर देताना अजितअप्पा पाटील-चिखलीकर यांनी थेट भूमिका मांडली. “अतुलबाबांच्या मागणीमुळे कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तर आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू. मात्र, तसे झाले नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असा इशारा त्यांनी दिला.
कराडच्या पाटण कॉलनीतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारकडून कराड तालुक्याचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी भागात समावेश होण्याचे संकेत दिले जात असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अजितअप्पा पाटील म्हणाले, “नुसते संकेत देऊन काय करायचे? दुष्काळ जाहीर होईल तेव्हा बघू!”
“अतुलबाबांच्या मागणीने कराडला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केले गेले, तर आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू. पण तसे झाले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कराड तालुक्यातील उत्तर भागातील 28 गावे, पश्चिम भागातील 23 गावे तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक भाग पावसापासून वंचित राहिले आहेत. जवळपास 45 दिवस पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा अजितअप्पा पाटील यांनी यावेळी केला.
“शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना या भागाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांनी आपापले तालुके वाटून घेत दुष्काळ जाहीर करून घेतला मात्र कराडला वाली कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार अतुल भोसले यांनी पाठपुरावा केला असल्याचा दावा होत असतानाच काँग्रेसने त्यांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला.
“आपल्या भागाला कोणी वाली नाही. आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत,” असा आरोप  करत कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  अजितअप्पा पाटील यांनी केली

दरम्यान 
कराडमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकीकडे आमदार अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून दुसऱ्या टप्प्यात कराडचा समावेश होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेही ही मागणी लावून धरली आहे काल पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी केली तर आज काँग्रेसचे राज्य सचिव अजितअप्पा चिखलीकर यांनीही पुन्हा हीच मागणी लावून धरत नुसते आश्वासन नको तर कराडमध्ये  ‘दुष्काळ जाहीर होतो की नाही ते बघू’ अशी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे एकूणच कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर होण्याच्या निर्णयाकडे लागले आहे.
कराड चे आमदार अतुल भोसले यांनी अगोदरच कराड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणी केली आहेत त्यानंतर तुम्ही काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन ही मागणी करत आहात तुम्हाला ही मागणी करायला उशीर झाला अस वाटत नाही का?
कारण , याचा एक टप्पा जरी जाहीर झाला असला, तरी दुसऱ्या टप्प्यात कराड चा समावेश दुष्काळी भाग म्हणून त्यात समाविष्ट होईल असा विश्वास अतुलबाबा यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे तुम्ही उशिरा ही मागणी करत आहात अस वाटत नाही का? या वेध माझा च्या प्रश्नावर काँग्रेसचे राज्याचे सचिव अजितअप्पा पाटील - चिखलीकर म्हणाले...अतुल बाबांच्या मागणीने कराडमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यास आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करू...आणि तसे झाले नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू...

कराडच्या पाटण कॉलनीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी याविषयीची मागणी करणारी पत्रकार परिषद काँग्रेसचे अजितप्पा चिखलीकर यांनी आज बोलावली होती त्यावेळी ये बोलत होते शहराध्यक्ष ऍड ...उपस्थित होते

*अजितअप्पा पाटील पुढे म्हणाले*
कराड तालुक्यातील उत्तर भागातील 28 गावे तसेच पश्चिम भागातील 23 गावे तसेच कराड दक्षीण भाग पावसापासून वंचीत राहिला आहे जवळजवळ 45 दिवस पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळ सदृश स्थिती आहे जिल्ह्यातील मंत्र्यांनी आपापला तालुका वाटून घेत दुष्काळ जाहीर केला आहे आपल्या भागाला कोणी वाली नाही आपले आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिझी आहेत त्यामुळे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्याला दुष्काळी जाहीर करा अशी मागणी केली असल्याचे ते म्हणाले

दरम्यान  राज्यातील युती सरकारच्या वतीने राज्यातील बहुतांशी भागाला दुष्काळी जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यात कराडच्या आमदार अतुल भोसले यांनीही दुसऱ्या टप्प्यात कराडमध्येही दुष्काळ जाहीर होईल असे संकेत दिल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणूनदिल्यावर 
श्री पाटील म्हणाले... नुसते संकेत देऊन काय करायचंय...दुष्काळ जाहीर होईल तेव्हा बघू असे ते म्हणाले...तसे झाले तर आम्ही अतुलबाबांचे जाहीर अभिनंदन करू...आणि तसे नाही झाले...तर आम्ही आंदोलन करणार असल्याचेही पाटील म्हणाले...

प्रवरा विद्यापीठाकडून डॉ. सुरेश भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ; वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन, सहकार आणि ग्रामीण विकासातील प्रदीर्घ योगदानाची दखल

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, संशोधन, सामाजिक आणि संस्थात्मक क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त लोणी येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील कॉम्प्लेक्समध्ये संस्थेच्या २३ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे माजी संचालक पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा, कुलगुरु प्रा. अनिरुद्ध पंडित, प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णाताई विखे-पाटील, सौ. मोनिका सावंत- इनामदार, ध्रुव विखे-पाटील, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे आदी मान्यवर होते. 

या सोहळ्यात पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा यांच्या हस्ते डॉ. सुरेश भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. भोसले यांनी आपल्या भाषणात कृष्णा आणि प्रवरा या दोन्ही संस्थांच्या जडणघडणीच्या इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, प्रवरा आणि कृष्णा या दोन्ही संस्थांच्या वाटचालीमागे समान वारसा आणि समान मूल्ये आहेत. ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सहकारी साखर कारखाने उभारण्याचे धाडस आमच्या पूर्वजांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धैर्य, चिकाटी व संघर्षामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला दिशा मिळाली. त्यांनी निर्माण केलेला वारसा, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी पुढे नेणे हीच आमच्यासह पुढील पिढ्यांची जबाबदारी आहे. प्रवरा विद्यापीठाकडून दिलेल्या या पुरस्काराबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. 

पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा यांनी डॉ. सुरेश भोसले यांचा सन्मान केल्याबद्दल प्रवरा संस्थेचे अभिनंदन केले. एका वैद्यकीय संस्थेने दुसऱ्या वैद्यकीय संस्थेतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे ही विशेष बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात कृष्णा व प्रवरा संस्थांनी परस्पर सहकार्य वाढवावे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणारे संशोधन व विशेष कौशल्याचे क्षेत्र विकसित करावे, असे आवाहन केले. 

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रवरा विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांचे अभिनंदन करुन, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवरा विद्यापीठाने विविध क्षेत्रांत विस्तार केला असून, मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेसच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान व विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक कले. प्रा. संजीव कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे यांनी आभार मानले. 

या सोहळ्याला कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, कृष्णा फिजिओथेरपी विभागाचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, धोंडिराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, बाजीराज थोरात, सुनील पाटील, अरविंद पाटील, छबन कांबळे, बाळासो जगताप, अविनाश खरात, दिपक जाधव आदी मान्यवरांसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Monday, September 28, 2026

शरद पवार यांनी आपली भूमिका केली स्पष्ट : म्हणाले...ज्याला कुणाला यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाकडे जाणार नाही,” :वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्याला कुणाला यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाकडे जाणार नाही,” असे सांगत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टच केली

जून-जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी आठ आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर पक्षातील दोन गटांचे राजकारण उघडपणे समोर आले. दोन्ही गटांनी पक्ष आणि नेतृत्वावर दावा केला. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांसमोरही दोन्ही बाजूंनी अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या.
फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह दिले. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या नावाने स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवली. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ हा संघर्ष अधिक ठळक झाला.


जानेवारी २०२६ मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसमोर नव्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे २०२३ मध्ये अजित पवारांनी सुरू केलेल्या स्वतंत्र राजकीय वाटचालीला आता नवे नेतृत्व मिळाले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला होता. काही काळ दोन्ही बाजूंकडून एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आले. मात्र शरद पवार यांनी आज या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेत, त्यांचा पक्ष कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. उलट इतरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचे असेल तर त्यांनी यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुतीची सध्याची रचना आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी निधीवाटप, महामंडळांवरील नियुक्त्या आणि राजकीय प्रभावाच्या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांमध्ये मतभेदही समोर आले होते.
महायुतीतील तणाव कमी करण्यासाठी समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. महामंडळांच्या वाटपासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ४८:२९:२३ असे प्रमाण निश्चित करण्यात आले, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतही सूत्र ठरवण्यात आले. तिन्ही पक्षांनी सार्वजनिकरीत्या एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी सप्टेंबरमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील मतभेद पुन्हा चर्चेत आले.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे आजचे वक्तव्य केवळ विलीनीकरणाच्या चर्चेपुरते मर्यादित नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय दिशेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. एका बाजूला शरद पवार आपल्या पक्षाची स्वतंत्र संघटनात्मक ताकद वाढवण्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक म्हणून सरकारमध्ये आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष संपला आहे की नव्या स्वरूपात पुढे जाणार, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; जलसंधारणाच्या कामांना गती द्या : पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

वेध माझा ऑनलाईन।
 महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असला तरी कराड तालुक्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तालुक्यातील अनेक भागांमध्ये गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टद्वारे चव्हाण यांनी म्हटले आहे की, कराड तालुक्यातील एकूण खरीप क्षेत्र ३२,५०० हेक्टर असून त्यापैकी १३,५०० हेक्टर (४२ टक्के) क्षेत्र सिंचित आहे, तर १९,००० हेक्टर (५८ टक्के) क्षेत्र जिरायत आहे. उंडाळे, येवती, काले, मसूर, इंदोली आणि उंब्रज ही महसूल मंडळे दुष्काळामुळे गंभीररीत्या प्रभावित झाली आहेत. त्यामुळे शासनाने वस्तुस्थितीचा विचार करून संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा.

याचबरोबर राज्यातील ज्या ९३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही, त्या तालुक्यांचा मंडळनिहाय सर्व्हे करण्याची मागणीही त्यांनी केली. या सर्व्हेमध्ये जर बहुसंख्य महसूल मंडळे ‘ट्रिगर-१’ निकषांत बसत असतील, तर संबंधित संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत बोलताना चव्हाण यांनी नवीन साखळी बंधारे उभारण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. तसेच विद्यमान बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे तातडीने सुरू करावीत आणि ही सर्व कामे रोजगार हमी योजना (रोहयो) तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.

कराड तालुक्यातील दुष्काळी मंडलांसाठी अतुलबाबांचा थेट मंत्रालयीन पाठपुरावा - मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अतुलबाबांची थेट चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
पावसाने पाठ फिरवली... पिकांचे नुकसान झाले... आणि आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कराड तालुक्यातील आवश्यक मंडलांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या व पिकांचे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची तसेच पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मनव, साळशिरंबे, महारूगडेवाडी, बोत्रेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, टाळगाव आणि घोगाव या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 
कराड तालुक्यातील ज्या मंडलांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले असून पिकांचे नुकसान झाले आहे, त्या मंडलांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचे आमदार अतुल भोसले यांनी सांगितले. याबाबत ई-मेलद्वारे तसेच दूरध्वनीवरूनही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आमदार भोसले म्हणाले, “कराड तालुक्यात ज्या-ज्या मंडलांमध्ये पाऊस कमी झाला आहे आणि पिकांचे नुकसान झाले आहे, त्या मंडलांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश व्हावा, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. आवश्यक मंडलांचा दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी म्हणून समावेश करून तेथील शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.”

कराड दक्षिणमधील दुष्काळ परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच कराड तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करावा यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, दूरध्वनीवरुनही संवाद साधला आहे. यंदाच्या हंगामात भुईमूग, सोयाबीन यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कराड तालुक्यात ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागांचा दुष्काळ परिस्थितीच्या निकषांत समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि नुकसानग्रस्त पिकांचे योग्य सर्वेक्षण होऊन शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पंकज पाटील, प्रविण साळुंखे, निळकंठ शेडगे, तानाजी चवरे, धोंडीराम चोरगे, मच्छिन्द्र साळुंखे, जयवंत शेवाळे, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, दादासो शेवाळे, संताजी शेवाळे, अशोक पाटील, जयसिंग जाधव, सागर जाधव, रविंद्र सपकाळ, निवास शेवाळे, संदीप भावके, दिलीप सूर्यवंशी, निवास जाधव, सचिन बागट, हंबीराव पाटील यांच्यासह उंडाळे मंडल कृषी अधिकारी सपना देव्हारे, उपकृषी अधिकारी विशाल जगदाळे, बाबा तोरणे, अश्विनी कुबडे, रोहित शिगावकर आदी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या... नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; 
आमदार अतुल भोसले यांनी आज दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली. 
त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले
शेतकऱ्यांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू. पाण्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पीक नियोजनाबाबतही संबंधित विभागांसोबत चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले. 




महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा चर्चेत,

वेध माझा ऑनलाईन।
पुण्यातील संगीता तिवारी यांनी महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विश्रांतवाडी येथील प्रकरण, उंडरीतील हुंडाबळी आणि बेपत्ता महिलांची वाढती संख्या या घटनांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना महिला आयोग अध्यक्षपदाच्या रिक्ततेबद्दल प्रश्न विचारला आहे. गेले सहा महिने हे महत्त्वाचे पद रिकामे असल्याने महिलांना न्याय मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला आयोग अध्यक्षपद हे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
सध्या राज्यात महिला आयोग अध्यक्षपदी कोणीही नसल्याने, हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. राजकारणाबाहेरील, ज्ञान आणि सेवाभावी वृत्ती असलेली सेवानिवृत्त न्यायाधीश, डॉक्टर किंवा प्राध्यापक अशा सक्षम व्यक्तीला या पदावर नियुक्त करण्याची मागणी संगीता तिवारी यांनी केली आहे. केवळ राजकारणी व्यक्ती न नेमता, पूर्णवेळ महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. महिला आयोगाचे अध्यक्षपद तातडीने भरण्याची मागणी करत त्यांनी सरकारला महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक गंभीर होण्याचे आवाहन केले.

Sunday, September 27, 2026

ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यात ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. मतचोरीच्या गंभीर आरोपांवरून ज्ञानेशकुमार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी काँग्रेसची प्रमुख मागणी आहे. पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितले की, राहुल गांधी सातत्याने मतचोरीचा मुद्दा मांडत आहेत. ज्ञानेशकुमार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याचा आरोप जगताप यांनी केला. ज्ञानेशकुमार यांनी भाजप आणि मोदी सरकारला मदत करण्यासाठी मतदार याद्या, डेटा आणि ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासह त्यांच्या कार्यकाळातील सर्व निवडणुकांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस करत आहे. हे आंदोलन केवळ पुण्यातच नाही, तर मुंबईसह देशभरात सुरू आहे, असेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानंतर विरोधक या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारला आणखी एक थेट इशारा ; 12 ऑक्टोबरच्या आधी शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर ...

वेध माझा ऑनलाईन।
राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने सरकारला नवीन इशारा दिला आहे. 12 ऑक्टोबरच्या आधी शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर समृद्धी महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये सरकार शेतकऱ्यांबाबत काही तरी योजना आणि मदत जाहीर करेल अशी आशा आहे. पुढच्या आठवड्यातही कॅबिनेट होणार आहे. या दोन कॅबिनेटमध्ये मदत जाहीर झाली नाही तर पुढच्या 12 दिवसात म्हणजे 12 ते 15 ऑक्टोबर रोजी आम्ही समृद्धी मार्ग अडवणार आहोत. 12 तारखेच्या आधी मदत नाही झाली तर शेतकरी आणि मजूर समृद्धी महामार्ग अडवणार आहेत, असा इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा : पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाईन : 
निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत 'द इंडियन एक्सप्रेस' दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोग ही संविधानाच्या कलम ३२४ अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था असून १९९५ मधील 'टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार' या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते. या संदर्भातील बाबींची सविस्तर नोंद संबंधित वृत्तात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या वृत्ताचे अद्याप कोणाकडूनही खंडन करण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी, "ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?" असा सवाल उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेले "आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले" हे स्पष्टीकरण तपासाअंती टिकत नसल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी काँग्रेस पक्षाने 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी. राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
"हा विषय अत्यंत गंभीर आहे. निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही," असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

शरद पवारांचे, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे 17 मागण्या केल्या आहेत.

राज्यात पावसाभावी दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. राज्य सरकारकडून राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे 17 मागण्या केल्या आहेत. ‘महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे 17 मगाण्या केल्या अशी माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे.

शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या...

१) राज्यात वंचित राहिलेले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे.

२) संपूर्ण जमीन महसूल माफ करण्यात यावा.

३) कर्जमाफी झालेल्या तारखेनंतर आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी शेती व शेती व्यवसायाशी निगडित घेतलेले सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी अर्बन बँका आणि पतसंस्था तसेच सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, आदिवासी विभागाचे वैयक्तिक कर्ज, तसेच फळबागांसाठी घेतलेले कर्ज आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात यावी.

४) शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत.

५) दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह फी आणि मेस फी संपूर्णपणे माफ करण्यात यावी.

६) रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्याचे निकष शिथिल करून, मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे सुरू करण्यात यावीत.

७) पिण्याच्या पाण्याच्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदारांना देऊन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

८) टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये. तसेच दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करण्यात येऊ नये.

९) शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सरसकट मोफत देण्यात यावे.

१०) दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजूरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे.

११) जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी सध्याचे निकष शिथिल करून विशेष निधी उपलब्ध करून देत ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.

१२) महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये तसेच शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे.

१३) दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस व भात यांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

१४) ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने आदेश निर्गमित करण्यात यावेत.

१५) शेतकरी अथवा शेतमजूर यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रलंबित असलेली थकीत देयके व त्यावरील अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे.

१६) दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने वर्ग करण्यात यावा.

१७) दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात यावी व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात यावेत. तसेच या अधिवेशनात झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून, नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात यावी.

वरीलप्रमाणे केलेल्या मागण्यांची शासनामार्फत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, ही विनंती. अशा मागण्या  पत्रात करण्यात आल्या आहेत.

Saturday, September 26, 2026

चावडी चौकात गणेश विसर्जनाचा जल्लोष!पारंपरिक वाद्यांना नागरिकांची पसंती; हजारोंच्या गर्दीत भक्तिमय वातावरणमध्यरात्रीपर्यंत १९६ सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जनासाठी रवाना; पहाटेपर्यंत ‘मोरया मोरया’चा जयघोष

वेध माझा ऑनलाईन
 ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, गुलालाची उधळण आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात कराड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहाचे शिखर गाठले. चावडी चौकातून प्रीतिसंगम घाटाकडे जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मध्यरात्रीपर्यंत तब्बल १९६ सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या.
सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी अजिंक्य गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, आगाशिवनगरचा गणपती चावडी चौकात दाखल झाला. त्यानंतर दिवसभर टप्प्याटप्प्याने गणेश मंडळांच्या मिरवणुका चौकात दाखल होत राहिल्या. सायंकाळी साडेसहापर्यंत ७७ मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या होत्या. याचबरोबर काही घरगुती गणपतींचेही सामूहिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते चावडी चौकात गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही गणेश मंडळांचे स्वागत केले.

सायंकाळी सात वाजता आमदार डॉ. अतुल भोसले चावडी चौकात दाखल झाले. नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी त्यांचा सत्कार केला. 
शिवाजी गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ सोमवार पेठ, न्यू व्यापारी गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ मलकापूर, कोल्हाटी समाज गणेश मंडळ आगाशिवनगर, मातानगर गणेश मंडळ कराड, श्री साई गणेश मंडळ चौक आदी मंडळांच्या मिरवणुका रात्री साडेसातपर्यंत प्रीतिसंगम घाटाकडे रवाना झाल्या.

एकता गणेश मंडळ, मलकापूरने धनगरी ढोल आणि लेझीम पथकाच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली. आमदार मनोज घोरपडे यांनी मंडळाचे स्वागत केले.

रात्री आठपर्यंत १०२, नऊपर्यंत १०६, तर साडेनऊपर्यंत १११ गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या. जय जवान गणेश मंडळ, शुक्रवार पेठने ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढत सुवर्णमहोत्सवी वर्षाचा जल्लोष केला. कृत्रिम हत्ती, चार वाद्ये, दोन पालख्या, घोडे व उंटांचा सहभाग असलेली ही मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. शाही दरबाराच्या स्वरूपातील मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री साडेआठनंतर चावडी चौकाकडे येणारे सर्व रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ज्योतिर्लिंग गणेश मंडळ, हजारमाचीने मशीनद्वारे गुलालाची उधळण केली. विविध मंडळांच्या मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

मध्यरात्री बारा वाजेपर्यंत १९६ गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी रवाना झाल्या. त्यानंतर पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा बंद केली. उर्वरित मंडळांनी ‘मोरया मोरया’चा जयघोष करीत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक पुढे नेली. रात्री १ वाजून २५ मिनिटांनी न्यू सरकार गणेश मंडळ, मलकापूरची मिरवणूक विसर्जनासाठी रवाना झाली. त्यामुळे पहाटेपर्यंत सुरू असलेला गणेश विसर्जन सोहळा भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडला.

 पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कोल्हाळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. विसर्जन मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



Friday, September 25, 2026

मोठी बातमी ! अखेर राज्यात दुष्काळ जाहीर…

वेध माझा ऑनलाईन ।
राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ स्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सवलत, रोजगार हमी कामे आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अशा अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार,जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट), शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवणार, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही, शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार, आदी उपाययोजना फडणवीस यांनी जाहीर केल्या आहेत.

Thursday, September 24, 2026

कराड येथील सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसीय रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झालेल्या स्थितीवर मात करत 20 वर्षीय आईची प्रकृती सुधारली पल्मनरी थ्रोम्बेक्टॉमीद्वारे फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करून हृदयावरील गंभीर ताण कमी करण्यात आला ;

वेध माझा ऑनलाईन।
सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार दिवसांनी गंभीर स्वरूपाचा पल्मनरी एम्बोलिझम झालेल्या 20 वर्षीय महिलेवर कराड येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. सुरुवातीला या महिलेला पायात तीव्र वेदना जाणवत होत्या. त्यानंतर तिला चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पुढील तपासणीत डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) असल्याचे आढळून आले. हा रक्ताच्या गुठळ्यांचा अडथळा फुफ्फुसांपर्यंत पोहोचून पल्मनरी एम्बोलिझममध्ये रूपांतरित झाला होता. दोन्ही फुफ्फुसांमधील अनेक रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या स्थितीमुळे हृदयाच्या उजव्या बाजूवर मोठा ताण आला होता. उजव्या हृदयाच्या कप्प्याची कार्यक्षमता गंभीररीत्या कमी झाली होती, ट्रायकस्पिड झडपेत लक्षणीय गळती होती आणि फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब धोकादायक पातळीवर वाढला होता.

अलीकडेच झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे उपचार अधिक आव्हानात्मक झाले होते. शस्त्रक्रियेनंतर लगेच रक्ताच्या गुठळ्या विरघळविणारी औषधे दिल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका होता. पल्मनरी एम्बोलिझमची तीव्रता, रक्ताच्या गुठळ्यांचे मोठे प्रमाण आणि हृदयावर आलेला ताण लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने दोन्ही फुफ्फुसांमधील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी आणि फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन द्विपक्षीय पल्मनरी थ्रोम्बेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला.

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा काळ यामध्ये शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. यामध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि पल्मनरी एम्बोलिझम यांचा समावेश होतो. विविध अभ्यासांनुसार, गर्भधारणेशी संबंधित रक्ताच्या गुठळ्यांची समस्या प्रत्येक 1,000 गर्भधारणांमागे सुमारे 0.5 ते 2 महिलांमध्ये आढळते. प्रसूतीनंतरच्या काही आठवड्यांमध्येही हा धोका वाढलेला राहतो. जागतिक आरोग्य संघटनेने सिझेरियन प्रसूतीसह काही मातृ घटकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या वाढलेल्या धोक्याशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. भारतात गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळातील रक्ताच्या गुठळ्यांशी संबंधित उपलब्ध आकडेवारी अद्याप मर्यादित आहे. मुंबईतील 34,720 गर्भवती महिलांचा समावेश असलेल्या एका संभाव्य अभ्यासात गर्भधारणेदरम्यान 32 महिलांमध्ये लक्षणांसह डीप व्हेन थ्रोम्बोसिस आढळून आला. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर रक्ताच्या गुठळ्यांशी संबंधित गुंतागुंत ओळखण्यासाठी अधिक जागरूकता आणि वेळेवर निदानाची गरज या अभ्यासातून अधोरेखित होते.

या प्रकरणाबाबत बोलताना डॉ. अमृतराज नेर्लीकर, सल्लागार हृदय व छातीच्या रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक (CVTS), सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालय, म्हणाले, “रुग्णाला आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत आणण्यात आले होते. तिला मोठ्या प्रमाणात श्वास घेण्यास त्रास होत होता आणि दोन्ही फुफ्फुसांमधील रक्तप्रवाहात मोठ्या रक्ताच्या गुठळ्यांमुळे अडथळा निर्माण झाल्याचे आढळले. या पल्मनरी एम्बोलिझममुळे हृदयाच्या उजव्या बाजूवर गंभीर ताण आला होता आणि फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब मोठ्या प्रमाणात वाढला होता. सिझेरियन शस्त्रक्रियेला केवळ चार दिवस झाले असल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळविणारी औषधे देताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका होता. रुग्णाची गंभीर अवस्था आणि रक्ताच्या गुठळ्या विरघळविणाऱ्या उपचारांवरील मर्यादा लक्षात घेऊन आम्ही रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्याचा निर्णय घेतला.”

पुढे ते म्हणाले, “आम्ही द्विपक्षीय पल्मनरी थ्रोम्बेक्टॉमी केली. या प्रक्रियेदरम्यान दोन्ही फुफ्फुसांमधील अनेक भागांमध्ये आणि लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेल्या मोठ्या प्रमाणातील रक्ताच्या गुठळ्या काढण्यात आल्या. या गुठळ्यांमध्ये नव्याने तयार झालेल्या तसेच जुन्या गुठळ्यांचाही समावेश होता, त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. फुफ्फुसांमधील अडथळा शक्य तितका दूर करून रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि हृदयाच्या उजव्या बाजूवरील दाब कमी करणे हा या प्रक्रियेचा उद्देश होता. शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील दाब लक्षणीयरीत्या कमी झाला आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारली. रुग्णाला ECMOची गरज भासली नाही आणि फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह पूर्ववत केल्यानंतर कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नाही.”

डॉ. सुहास मुळे, कन्सल्टंट कार्डिओलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, म्हणाले, “थ्रोम्बेक्टॉमीनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर, पायांमधून फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यांचा पुढील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इन्फिरिअर व्हेना कावा (IVC) फिल्टर बसवण्यात आला. पायातील रक्तवाहिन्यांमधून सुटणाऱ्या गुठळ्या हा फिल्टर अडवतो, त्यामुळे रुग्णाच्या पुढील उपचारादरम्यान पुन्हा पल्मनरी एम्बोलिझम होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.”

डॉ. चिन्मय एरम, हॉस्पिटल डायरेक्टर, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, म्हणाले, “बाळंतपणानंतर उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतींवर उपचार करताना वेळेत निदान होणे आणि तातडीने उपचार सुरू होणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून दिसून येते. रुग्णाची प्रकृती गंभीर होती आणि तिच्यासाठी तातडीच्या उपचारांसोबतच विविध वैद्यकीय विभागांमधील तज्ज्ञांच्या समन्वयाची गरज होती. कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिक सर्जरी, इंटरनल मेडिसिन, अ‍ॅनेस्थेशिया तसेच प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञांच्या सहभागामुळे उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार मिळू शकले. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सक्षम मल्टिडिसिप्लिनरी टीम, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि परस्परांमधील समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे रुग्णाची झालेली यशस्वी सुधारणा अधोरेखित करते.”

शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि तिच्या हृदयाच्या व फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत हळूहळू सुधारणा झाली. तिची प्रकृती स्थिर राहिली आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या ती आपल्या नवजात बाळासोबत घरी असून तिची प्रकृती सुधारत आहे.

पल्मनरी एम्बोलिझम ही गंभीर वैद्यकीय स्थिती असून त्यामध्ये रक्ताची गुठळी फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. प्रसूतीनंतर अचानक किंवा वाढता श्वास घेण्यास त्रास, छातीत अस्वस्थता किंवा दुखणे, चक्कर येणे तसेच एका पायात वेदना किंवा सूज यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

ही प्रक्रिया डॉ. अमृतराज नेर्लीकर, सल्लागार हृदय व छातीच्या रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक (CVTS); डॉ. राम देसाई, सल्लागार अंतर्गत औषधतज्ज्ञ; डॉ. सुश्रुत पाटील, सल्लागार अंतर्गत औषधतज्ज्ञ; डॉ. संदीप मोरे, सल्लागार भूलतज्ज्ञ; डॉ. सुहास मुळे, सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ; आणि डॉ. वृषाली चव्हाण, सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखालील बहुविशेषज्ञ वैद्यकीय पथकाने केली. या पथकाला ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागातील (ITU) सहाय्यक वैद्यकीय पथकाची साथ लाभली.

कोयना सहकारी बँकेच्या उंब्रज शाखेचा नूतन जागेतील स्थलांतर समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ;

वेध माझा ऑनलाईन।
कोयना सहकारी बँक लि., कराडच्या उंब्रज शाखेचा नूतन जागेतील स्थलांतर समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कृष्णा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख व यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या शुभहस्ते झालेल्या या कार्यक्रमास आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, बँकेचे संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), युवा नेते अदिराज पाटील, बँकेचे चेअरमन कृष्णत पाटील, व्हाईस चेअरमन साहेबराव शेवाळे यांच्यासह जि. प. सदस्य लालासाहेब जगदाळे, कोयना दूध संघाचे चेअरमन बाबुराव धोकटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कराड खरेदी विक्री संघाचे चेअरमन  अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव इंगवले,  मोहनराव माने, महेशकुमार जाधव, माजी सभापती  एम जी भाऊ थोरात, संपतराव  इंगवले, माजी जि. प. सदस्य सुदाम दीक्षित, पै आनंदराव मोहिते, रोहित पाटील, राजेंद्र पाटील, जालिंदर जगदाळे,  सुरेश  पाटील, सुरेश साळुंखे, पं. स. सदसया कोमल यादव,  दिनकरआबा निगडीकर, उमेश साळुंखे, वैभव कदम, संभाजी जाधव, जयसिंग चव्हाण,   रणजीत पाटील, निवासराव निकम, जयवंतनाना जाधव, माजी जि.प. सदस्य संपतराव जाधव, चंद्रकांत जाधव, नौशादभाई मुलांनी, चारेगावचे  सरपंच  गणेश माने, पै. पांडुरंग पाटील, वसंतराव पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोयना सहकारी बँकेच्या जडणघडणीत लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांचे मार्गदर्शन व योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या विचारातून आणि सहकाराच्या मूल्यांवर उभी राहिलेली बँक आज तीन दशकांच्या वाटचालीत सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर सातत्याने प्रगती करत आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली बँकेचा विस्तार व आधुनिकीकरणाचा प्रवास सुरू आहे. उंब्रज शाखेचे स्थलांतर हे बँकेच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल असून, नवीन जागेत ग्राहकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. बदलत्या काळानुसार डिजिटल बँकिंग, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख सेवांना प्राधान्य देत बँकेने आपल्या कामकाजात सातत्याने सकारात्मक बदल केले आहेत.

यावेळी डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी कोयना बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत बँक करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. बँकेने आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून आपली सेवा अधिक व्यापक करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी कोयना बँकेच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार मनोज घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम यांनीही बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण व निमशहरी भागातील ग्राहकांना बँकिंगच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोयना बँकेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. बँकेने भविष्यातही ग्राहकसेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून अधिक प्रगती करावी, अशा शुभेच्छा दोन्ही आमदारांनी व्यक्त केल्या.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानामुळे बँकेने आजचा टप्पा गाठल्याचे सांगितले. युवा नेते अदिराज पाटील यांनीही बँकेच्या आधुनिक विस्ताराच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बँकेचे चेअरमन कृष्णत पाटील यांनी बँकेच्या आगामी विकासाची दिशा स्पष्ट करताना ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक, गतिमान आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हाईस चेअरमन साहेबराव शेवाळे यांनी उपस्थित मान्यवर, सभासद व ग्राहकांचे आभार मानले. उंब्रज परिसरातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी सहज व आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. नवीन शाखेमुळे परिसरातील ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
समारंभाचे औचित्य साधून बँकेत ठेवी ठेवून बँकेवरील विश्वास दृढ करणाऱ्या ठेवीदारांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 


गणेश विसर्जनादिवशी प्रीतिसंगम बाग २४ तास बंद! नागरिकांच्या सुरक्षिततेसह यशवंतराव चव्हाण समाधीच्या पावित्र्याचे संरक्षण; कराडचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे आदेश;

वेध माझा ऑनलाइन।
आज गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी मोठी गर्दी, वाढलेली वाहतूक,तसेच परिसरात सरपटणारे प्राणी आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने प्रीतिसंगम बाग व स्व. यशवंतरावजी चव्हाण समाधी परिसर तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्मारकाच्या पावित्र्याचे रक्षण या दोन्ही बाबी लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कराड शहरातील प्रीतिसंगम बाग हे नागरिकांसाठी महत्त्वाचे पर्यटन व विरंगुळ्याचे ठिकाण आहे. याच परिसरात स्व. यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी असून ती राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद असलेली आहे. समाधी परिसराचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि शांतता अबाधित राखणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे.

या संदर्भात नगरपरिषदेने यापूर्वीच प्रशासकीय ठराव क्र. ३१६, दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी आवश्यक सूचना व उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे.

चालू वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत विविध प्रकारचे जीवजंतू तसेच सरपटणारे प्राणी परिसरात वाहून येण्याची शक्यता असते. सद्यस्थितीतही परिसरात सरपटणारे प्राणी आढळून येत असल्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

आज गणेश विसर्जनासाठी शहरातून मोठ्या संख्येने मिरवणुका निघतात. त्याचबरोबर वाहने, ढोल-ताशा पथके आणि भाविकांची मोठी गर्दी प्रीतिसंगम परिसरात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि नागरिकांची सुरक्षितता यासंदर्भात प्रशासनास मोठे आव्हान निर्माण होते.

समाधी परिसराचे पावित्र्य राखण्यावरही भर
गणेश विसर्जनाच्या कालावधीत निर्माण होणारी गर्दी आणि उत्सवी वातावरण लक्षात घेता स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधी परिसराचे पावित्र्य, प्रतिष्ठा व शांतता अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि राष्ट्रीय स्मारकाचे पावित्र्य या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून प्रीतिसंगम बाग तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कराड नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत प्रीतिसंगम बाग तात्पुरती बंद राहणार आहे.

हा निर्णय कायमस्वरूपी नसून गणेश विसर्जनाच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या विशेष परिस्थितीचा विचार करून करण्यात आलेली तात्पुरती प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका

प्रीतिसंगम बाग बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा माहितीवर विश्वास न ठेवता नगरपरिषद प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रीतिसंगम बाग नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी ठिकाण म्हणून कायम उपलब्ध राहावी, तसेच स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचे पावित्र्य व प्रतिष्ठा अबाधित राहावी, यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कराड नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

— मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद, कराड
— नगराध्यक्ष, कराड नगरपरिषद, कराड


Wednesday, September 23, 2026

दानपट्ट्याच्या थरारक प्रात्यक्षिकांनी श्री बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक भक्तिभावात ; सोमवार पेठेतील नवीन पाण्याची टाकी परिसरातून मिरवणूक ; दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची शिस्तबद्ध वाटचाल; विसर्जनानंतर महाप्रसादाचे आयोजन ; दिपकदादांच्या रूपाने सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या नेतृत्वाचा उदय ! ;

वेध माझा ऑनलाइन
: सोमवार पेठेतील नवीन पाण्याची टाकी परिसरातील श्री बाल गणेश मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली. मिरवणुकीदरम्यान मुला-मुलींनी सादर केलेल्या दानपट्टा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

कन्याशाळा, चावडी चौक मार्गे पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक पुढे सरकत प्रीतीसंगम घाटावर पोहोचली. याठिकाणी भक्तिमय वातावरणात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

दरम्यान, गणेश प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंतच्या कालावधीत श्री बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावर्षी दिपकदादा यांच्या नेतृत्वाखाली  मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर, दंत तपासणी शिबीर, तसेच विविध आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कार्याला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले असून, सामाजिक बांधिलकी जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

दीपकदादा पाटील यांनी मंडळाची धुरा सांभाळल्यानंतर सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरातुन सामाजिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे. 

दिपकदादा पाटील यांच्या रूपाने सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे त्यामुळे तेथील नागरिक आता आशावादी आहेत त्याठिकाणचे आत्तापर्यंत मरगळलेले राजकीय व सामाजिक वातावरण दिपकदादांच्या नेतृत्वामुळे पुन्हा प्रफुल्लित झाल्याचे दिसत आहे 

दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कार्याला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले असून, सामाजिक बांधिलकी जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरातील युवकांना एकत्रित करून सामाजिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनानंतर महाप्रसादाचे आयोजन मंडळाचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिक व भाविकांनी घेतला.

भक्ती, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि युवकांचा उत्साह यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या श्री बाल गणेश मंडळाच्या उपक्रमाचे व दीपक पाटील यांच्या नेतृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला लांबला! आजची सुनावणी झाली नाही;

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली नाही. काल दुपारी दोन वाजल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे अपेक्षित होते, मात्र दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे या सुनावणीला वेळ मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज एक यूपीएससी संबंधित मॅटर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर दोन तास सुरू होते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण आज युक्तिवादासाठी आले नाही. सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणासाठी नवीन तारीख देणार आहे.

पुढील उद्याही याच यूपीएससी प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याने, शिवसेना प्रकरणाची सुनावणी उद्याही होईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता कमी असून, पक्षचिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागू शकते. 

दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली ;

वेध माझा ऑनलाईन।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी डिफेंडर गाडी वापरण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि गंभीर वृत्ती दाखवत त्यांनी आपला दौरा टोयोटा फॉर्च्युनर या गाडीमधून सुरू ठेवला आहे. सध्या राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री शिंदे हे दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत असून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आहेत.
राज्यात धारशिव, सोलापूर, लातूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्रीही दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत असताना, उपमुख्यमंत्री शिंदे देखील सक्रियपणे पाहणी दौऱ्यांवर आहेत. या दौऱ्यादरम्यान, शेतकऱ्यांशी संवाद साधताना आणि त्यांच्या समस्या जाणून घेताना, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली साधी आणि दुसरी गाडी वापरण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांनी डिफेंडर गाडी नाकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची शेतकऱ्यांप्रति असलेली बांधिलकी अधिक स्पष्ट झाली आहे

दोन राज्यांच्या निवडणुका रद्द करा, काँग्रेसची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
निवडणूक आयोगाबाबत इंडियन एक्सप्रेसने केलेल्या गौप्यस्फोटावरून वादळ उठलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप करतानाच दिल्ली आणि हरियाणातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुका रद्द करा, अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशाची दिशाभूल केली आहे. आज निवडणूक आयोगासारखी संवैधानिक संस्था सुद्धा स्वतंत्र नाहीये. निवडणूक आयोगात अनेक निर्णय होतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या सहकाऱ्यांनाच अंधारात ठेवतात, असा हल्लाही सिंघवी यांनी चढवला आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणूक आयोग अंतरिक बुलडोझर असल्याचा आरोपही सिंघवी यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी केवळ देशाची दिशाभूल केली नाही तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगालाच हायजॅक केलं आहे. निवडणूक आयोग ही एक बहुमताची संस्था आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोग डमी असून एक व्यक्तीच आयोग चालवत आहे का? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी फॉर्म 6 बदलून नियमांचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले... निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका,

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना (उबाठा गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुका आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेत गैरकारभार झाल्याचा दावा ठाकरे यांनी केला. मतदारांच्या यादीत फेरफार झाल्याचे आरोप त्यांनी केले. ठाकरे यांच्या मते, बंगालमध्ये ९० लाख, तामिळनाडूमध्ये ७० लाख मतदार वगळले गेले, तर महाराष्ट्रात ४५ लाख मतदार बेकायदेशीरपणे घुसविले गेले. यातील ४० ते ४५ लाख नावांवर आक्षेप घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे अशा अनियमिततांबाबत तक्रारी केल्या होत्या. ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटले की, देशात लोकशाही टिकवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांनी केवळ ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी केली नाही, तर त्यांच्या “मोरक्या” (मुख्य सूत्रधार) यालाही शिक्षा व्हावी असे म्हटले. यापुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरनेच घेण्यात याव्यात अशी भूमिकाही त्यांनी मांडली. लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

स्मृती इराणी व विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी, भाजपची राज्य प्रभारींची नवी यादी जाहीर

वेध माझा ऑनलाईन।
भाजपने नुकतीच राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची नवीन यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणींना हरियाणा-छत्तीसगडची, तर विनोद तावडेंना उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्रासाठी वैजयंत जय पांडा यांची नियुक्ती झाली आहे. सुनील बन्सल पश्चिम बंगाल-तेलंगणा सांभाळतील. पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी ही महत्त्वपूर्ण फेरबदल आहेत.
भारतीय जनता पक्षाने राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत जय पांडा यांच्या नियुक्ती झाली असून अमित मालवीय, सदानंद शेर्ट तनावाडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी आहेत.

Tuesday, September 22, 2026

आज भूकंपाचा सौम्य धक्क जाणवला : भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यात ; किती वाजता आणि कुठे हा धक्का जाणवला ? तीव्रता किती ?

वेध माझा ऑनलाइन।
जिल्ह्यात आज पहाटे ३ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर इतकी होती. भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यात असून ते 17.373 अंश उत्तर अक्षांश आणि 73.769 अंश पूर्व रेखांशावर नोंदविण्यात आले आहे.

या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर होती. पहाटेच्या वेळी भूकंपाची नोंद झाल्याने काही नागरिकांना परिसरात सौम्य हादरे जाणवल्याची शक्यता आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्याचा परिणाम मर्यादित राहिला.
जिल्ह्यात यापूर्वीही अधूनमधून सौम्य स्वरूपाचे भूकंप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर तसेच ‘भूकंप’ ॲपवर या भूकंपाची नोंद उपलब्ध करण्यात आली आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Monday, September 21, 2026

आता खेळाडूंची गैरसोय होणार दूर! नरेंद्र लिबे यांचे प्रयत्न झाले सक्सेस! नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा पुढाकार; वेध माझा चा पाठपुरावा ; ओपन स्पेसमधील मैदान तात्पुरते सरावासाठी उपलब्ध ; नगरसेवक नरेंद्र लिबे यांची प्रत्यक्ष पाहणी; मैदानाची साफसफाई व तयारीला वेग

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम सुरू असल्यामुळे खेळाडूंना सराव व विविध खेळांसाठी मैदान उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे खेळाडूंची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक व स्वतः राष्टीय खेळाडू असलेले नरेंद्र लिबे यांनी याबाबत आवाज उठवला होता 
त्यासंदर्भात काल त्यांनी वेध-माझा शी बातचीत केली होती वरच्या दर्जाचा खेळाडू सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने जिल्हा स्तरावर देखील पोहोचू शकत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

त्यांनतर वेध-माझा ने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती...त्यानुसार या विषयाचा पाठपुरावा करत आज लग्गेच याबाबतचा निर्णय झाल्याचे नगरसेवक लिबे यांनी वेध-माझा शी बोलताना आज सांगितले 

लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पुढाकार घेत कराड नगरपरिषद हद्दीतील श्री हॉस्पिटल समोरील मोकळी जागा स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मैदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी खेळाडूंनी नगराध्यक्ष यादव यांची भेट घेतली होती. यावेळी नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी स्वतः खेळाडू असल्याने याबाबतची अडचण समजून घेत ती नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. खेळाडूंना सरावासाठी जागा मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन नगराध्यक्ष यादव यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेतला.

दरम्यान, आज सकाळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मैदानाची साफसफाई व आवश्यक तयारी करताना नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधितांना सूचना दिल्या. 

यावेळी नरेंद्र लिबे यांच्यासह महेंद्र भोसले सर अतुल पाटील, दिलीप चिंचकर, हनमंत साखरे आदी खेळाडू उपस्थित होते

खेळाडूंना सरावासाठी मैदान योग्य पद्धतीने तयार करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत खेळाडूंचा सराव खंडित होऊ नये, या उद्देशाने नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

“मैदानाचे काम सुरू असले तरी खेळाडूंचा सराव थांबता कामा नये; खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं भाजपा आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांना थेट आव्हान ; म्हणाले...निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे, सरकार तूमचे आहे, मग लावा माझी चौकशी;

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माझ्यावर वैयक्तिक आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे. सरकार तुमचं आहे, म्हणता तर मग लावा माझी चौकशी, असं थेट आव्हान बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना दिलं.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते

ते म्हणाले...
आनंदराव जाधव, विठ्ठलतात्या जाधव, राजाभाऊ देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ सभासद वार्षिक सभेत प्रश्न विचारायचे.
त्यावेळी तीन तीन तास सभा चालायची त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप आणि माईकची व्यवस्था केली जायची. त्या परंपरेला यंदा छेद देण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ एकच आहे की उत्तरे तुम्हाला ऐकायची नव्हती. कारखान्यावर काहीतरी आरोप करायचा, अशा प्रकारची विरोधकांची वृत्ती होती, असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला.
आपण संयम ठेवला पाहिजे. आपल्याला संस्था चालवायची आहे. पुढे जायचे आहे,
आपण एका मर्यादेपर्यंत संयम ठेवला. अंगावर आल्यावर आपण बघूच... असा सूचक इशारा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याच दोन्ही भाजपा आमदारांना दिला.
यंदा सह्याद्री कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार आहोत  प्रतिदिन 11 हजार टनापेक्षाही अधिक गळीत आपण करणार आहोत असेही ते म्हणाले





क्रीडा नगरीतच खेळाडूंच्या विजयाला ‘ब्रेक’! नवे स्टेडियम उभे राहतेय; पण तोपर्यंत खेळाडूंनी सराव करायचा कुठे? तंत्रशुद्ध सरावावर होतोय परिणाम; स्पर्धांमधील कामगिरी घसरल्याची क्रीडा क्षेत्रात खंत ;

वेध माझा ऑनलाईन।
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्यासारख्या दिग्गज मल्लांनी ज्या कराडच्या मातीत सराव केला, ज्या भूमीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे असंख्य खेळाडू घडविले, त्या क्रीडा नगरीतच आज खेळाडूंना सरावासाठी मैदान शोधण्याची वेळ आली आहे! कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम सुरू असल्याने खेळाडूंसाठी पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याचा थेट फटका त्यांच्या सरावाला आणि स्पर्धेतील कामगिरीला बसत असल्याची खंत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कराडमध्ये नवीन स्टेडियम उभारण्याचे काम सुरू आहे. भविष्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असली तरी आजचा खेळाडू उद्याच्या स्टेडियमची वाट पाहत बसू शकत नाही. त्याला आज मैदान हवे, आज सराव हवा आणि आजच स्पर्धेसाठी तयारी हवी. मात्र, तात्पुरत्या स्वरूपातही पुरेसे मैदान उपलब्ध नसल्याने खेळाडूंची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मैदान म्हणजे खेळाडूच्या मेहनतीचे, तंत्राचे आणि भविष्यातील यशाचे ते व्यासपीठ असते. नियमित आणि तंत्रशुद्ध सरावाअभावी खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होत असून त्याचा फटका स्पर्धांच्या निकालातही जाणवत असल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे,  राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविणारे आणि कराडचे नाव उज्ज्वल करणारे काही खेळाडू आज मैदानाअभावी जिल्हास्तरीय स्पर्धेतही अपेक्षित कामगिरी करू शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वरच्या स्तरावर बक्षीस मिळविणाऱ्या खेळाडूंना जिल्हास्तरावरच संघर्ष करावा लागणे ही परिस्थिती कराडसारख्या ऐतिहासिक क्रीडा नगरीला निश्चितच शोभणारी नाही.

खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आहे मग अडथळा नेमका कुठे आहे? मैदानाचा! हा अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरते का होईना, पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

“स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत खेळाडूंनी थांबायचे का?” असा सवाल आता क्रीडाप्रेमी उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून नगरपालिका, क्रीडा विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत खेळाडूंसाठी पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

कराडची क्रीडा परंपरा ही केवळ भूतकाळाची आठवण नाही ही परंपरा पुढे नेण्यासाठी आजच्या खेळाडूंना मैदान मिळणे आवश्यक आहे. नवीन स्टेडियमच्या कामाचे स्वागतच पण त्या कामाच्या काळात खेळाडूंच्या कारकिर्दीला ‘ब्रेक’ लागता कामा नये, एवढीच अपेक्षा


नगरसेवक 
राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र लिबे म्हणाले...

स्टेडियमचे काम सुरू आहे, ठीक आहे...
पण खेळाडूंनी सराव करायचा कुठे?
राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आज जिल्हास्तरावरच थांबावे लागत असेल, तर ही कराडच्या क्रीडा नगरीसाठी धोक्याची घंटा नाही का? असा सवाल खेळाडू व नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी याविषयी बोलताना केला

पुन्हा एकदा भाजपने दिला काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला ;

वेध माझा ऑनलाइन
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा काँग्रेस पक्षासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या तसेच चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे शिलेदार असलेले माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे भाजपच्या गळाला लागले असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राहुल बोंद्रे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  काँग्रेस पक्षाने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी आणि पदे दिली, तसेच जिवाभावाची अनेक माणसं दिली, असे सांगत बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि अत्यंत प्रेम व मार्गदर्शन दिले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचेही बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र आता राजकीय वळणावर आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राहुल बोंद्रे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.


कोयना सहकारी बँकेच्या उंब्रज शाखेचे बुधवारी उद्घाटन ; भाजपचे आमदार मनोज घोरपडे,धैर्यशील कदम हे राहणार उपस्थित; सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन ;

वेध माझा ऑनलाईन।
कोयना सहकारी बँक लि., कराडच्या उंब्रज शाखेचे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, उंब्रज, ता. कराड येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. या स्थलांतर समारंभाचा शुभारंभ यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुकचे चेअरमन तथा कृष्णा उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख मा. डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे, विधानपरिषद सदस्य मा. आ. धैर्यशील कदम, कोयना सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मा. ॲड. उदयसिंह पाटील (दादा) तसेच युवा नेते मा. आदिराज पाटील (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उंब्रज व परिसरातील सभासद, खातेदार, व्यापारी, उद्योजक, शेतकरी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाखेचे स्थलांतर करण्यात येत आहे. नव्या जागेमुळे ग्राहकांना अधिक सुलभ, प्रशस्त व सोयीस्कर वातावरणात बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत.
बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल सुविधा आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर बँकेचा विशेष भर असून, उंब्रज शाखेच्या स्थलांतरामुळे या परिसरातील ग्राहकांना त्याचा अधिक लाभ मिळणार आहे.
उंब्रज व परिसरातील सर्व सभासद, खातेदार, ग्राहक, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी या स्थलांतर समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कृष्णत पाटील, उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे व संचालक मंडळाने केले आहे.

                

हिरण्यकश्यपू वधाचा थरार अनुभवण्यासाठी आझाद चौकात रेकॉर्डब्रेक गर्दी!

वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवजवान गणेश मंडळ, आझाद चौक यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘नरसिंह अवतार’ या जिवंत देखाव्याला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, देखावा पाहण्यासाठी दररोज रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. विशेषतः भगवान नरसिंहांनी भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार आणि हिरण्यकश्यपूचा केलेला वध हा प्रसंग पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, संस्कार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नवजवान गणेश मंडळाने केला असून, ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा कराड शहरातील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
वैभव भोसले, अतुल पाडळे, रितेश नलवडे, कृष्णा काटवटे, श्रीधर मुळे, सिद्धप्रसाद मुळे, अंकुश नलवडे, ज्ञानेश्वर भस्मे, विनायक काटकर, बाल कलाकार रुद्र नलवडे यांच्या  या देखाव्यात प्रमुख भूमिका आहेत.

नरसिंह अवताराच्या जिवंत देखाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी!आझाद चौकातील नवजवान गणेश मंडळाचा आध्यात्मिक संदेश ठरतोय भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ;

वेध माझा ऑनलाईन: 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कराड शहरातील नवजवान गणेश मंडळ, आझाद चौक यांच्यावतीने साकारण्यात आलेल्या ‘नरसिंह अवतार’ या जिवंत देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दर्शनासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत आहेत.
भगवान विष्णूंचा चौथा अवतार मानल्या जाणाऱ्या नरसिंह अवताराची कथा आणि भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा या देखाव्यात प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. भक्ती, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याचा अखेर विजय होतो, असा आध्यात्मिक संदेश या जिवंत देखाव्यातून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे केवळ धार्मिक कथानक सादर करण्यापुरता हा देखावा मर्यादित न राहता सत्य, श्रद्धा, संस्कार आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हा सामाजिक संदेशही देत आहे. त्यामुळे हा देखावा भाविकांसह युवक आणि बालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
देखाव्याची मांडणी, पात्रांचा अभिनय, प्रकाशयोजना आणि प्रसंगाचे सादरीकरण यामुळे प्रत्यक्ष नरसिंह अवतार आपल्या डोळ्यांसमोर साकारल्याचा अनुभव भाविकांना मिळत आहे. त्यामुळे दररोज आझाद चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असून, गणेशोत्सवाच्या उत्साहात या देखाव्याने विशेष रंग भरला आहे.
परंपरा, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधणाऱ्या नवजवान गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कराडकरांकडून कौतुक होत आहे.

Sunday, September 20, 2026

श्री गणेश फार्मा प्रो हब एलएलपी होलसेल औषधांच्या दुकानात विविध पदांवर भरती सुरू ; आकर्षक पगारासह सुविधा मिळणार ; कोणकोणत्या पदांसाठी ही नोकर भरती सुरू आहे... त्यासाठी वाचा बातमी...आणि करा एक फोन... दिलेल्या नंबरवर...

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर येथील इंगवले नगर नाकोडा स्टील शेजारी असलेल्या श्री गणेश फार्मा प्रो हब या होलसेल मेडिकल व्यवसायामध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी मुला-मुलींसह कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

        
        या जॉबसाठी खालील               लोकेशनवर भेटा.. माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करा...

याठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढे यावे, असे आवाहन फर्मच्या वतीने करण्यात आले आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामाची क्षमता व पदानुसार योग्यतेचा विचार करून आकर्षक पगार देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भरतीबाबत माहिती देताना फर्मचे संचालक म्हणाले की, 
संस्थेच्या वाढत्या कामकाजासाठी विविध पदांवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मेहनती, जबाबदार आणि काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या तरुण-तरुणींना तसेच अनुभवी कामगारांना येथे रोजगाराची संधी दिली जाणार आहे.रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, 

अधिक माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करावा असे आवाहन फर्मच्या संचालकानी केले आहे.


या फर्ममध्ये खालील पोस्टसाठी...
अर्जंट जागा भरायच्या आहेत...

Saturday, September 19, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा'(king) माझे जिवलग मित्र लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे हे माझे पत्र...

वेध माझा ऑनलाईन।

प्रिय राजू... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा वाढदिवस...

पण माझ्यासाठी आजचा दिवस केवळ नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसाचा नाही;
तर माझ्या गेल्या ३५ वर्षांपासूनच्या अतिशय जिवलग मित्राचा, माझ्या भावाचा वाढदिवस आहे...!

राजू म्हणजे...
पहिल्यापासूनच राजासारखं मन असलेला माझा मित्र!

आपण दोघेही दहावी उत्तीर्ण झालो. तू शिवाजी हायस्कूलमधून आणि मी टिळक हायस्कूलमधून. त्यानंतर अकरावीच्या वर्गात आपण एकत्र आलो. त्यावेळी कुठे माहीत होतं, की वर्गात सुरू झालेली ही ओळख पुढे आयुष्यभराच्या मैत्रीत आणि अक्षरशः भावाच्या नात्यात रूपांतरित होईल!

पण ती झाली... आणि अशी झाली की गेली ३५ वर्षे आमच्यातील मैत्री, आपुलकी आणि वैचारिक नातं आजही तितकंच घट्ट आहे.

या नात्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कधीही अपेक्षा नव्हती... हिशोब नव्हता... स्वार्थ नव्हता. होती ती फक्त निरपेक्ष मैत्री!

माझ्या आयुष्यात एक काळ असा आला, जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या एका कठीण टप्प्यातून जात होतो. त्या काळात तू केवळ माझ्या सोबत नव्हतास, तर माझी सावली बनून उभा होतास.

माझी ताकद माझ्यात टिकवून ठेवण्यासाठी तू जे केलंस, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

आम्ही अक्षरशः एका ताटात जेवलोय...
मी माझ्या घरापेक्षा तुझ्या घरीच अधिक असायचो. तुझे बंधू संजय, विजय आणि प्रशांत यांच्या सोबत मला कधीच वेगळं मानलं गेलं नाही. उलट, लोक मला तुमच्या घरचा आणखी एक भाऊ म्हणूनच ओळखायचे.

तुझी मोठी बहीण रंजना सणस आणि तुझी वहिनी, स्व. उज्वला विजय यादव... या दोघींच्या राख्या माझ्या मनगटावर कधीच चुकल्या नाहीत.

मला बहीण नाही, ही भावना माझ्या मनात कधी निर्माणच झाली नाही... कारण ज्या दिवशी माझ्या हातावर राखी बांधली जात नव्हती, त्या दिवशी तुमच्या घरच्या बहिणींनी आणि वहिनीने माझ्या मनगटावर भावाचं नातं बांधलं होतं.

राजू सातारला शिकायला असताना तर आमची मैत्री आणखीच रंगली होती. मी कराडहून त्याच्याकडे वारंवार जायचो. तो आमच्या दोघांसाठी डबा आणायचा आणि आम्ही दोघे त्याच डब्यात जेवायचो.

त्या डब्यात फक्त अन्न नव्हतं...
त्या डब्यात आमच्या मैत्रीची चव होती!

आणि मग आला तो काळ...

वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी राजू पहिल्यांदा पोस्ट ऑफिस परिसरातून कराड पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरला. तेव्हा अख्खं गाव त्याच्या पाठीशी उभं राहिलं.

कदाचित नियतीने त्याच दिवशी लिहून ठेवलं असावं—

“हा २३ वर्षांचा युवक एक दिवस कराडचा राजा नव्हे, तर कराडकरांच्या विश्वासाचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होईल!”

आज ते स्वप्न सत्यात उतरलेलं पाहताना मित्र म्हणून माझ्या मनात जी भावना आहे, ती शब्दांत मावणारी नाही.

गेली तीन दशके नगरपालिका आणि कराड शहराच्या विकासाशी जोडलेला तुझा प्रवास आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कराडच्या बदलत्या गरजा ओळखून तू ‘कराड फेज टू’ या नवनिर्माणाच्या संकल्पनेचा ध्यास घेतलास. विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि मोठ्या निधीच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा देण्याचे प्रयत्न केलेस.

नगराध्यक्ष झाल्यानंतरही तुझ्या निर्णयांमध्ये तुझ्या संस्कारांची झलक दिसली. नगराध्यक्षपदाचे मानधन आणि बैठकीचे भत्ते स्वीकारून ते स्वतःकडे न ठेवता जनरल फंडात जमा करण्याचा निर्णय असो किंवा नगराध्यक्षांचे वाहन न वापरण्याचा निर्णय असो—पदापेक्षा जबाबदारी मोठी मानणारा माझा मित्र राजू मला त्यातून पुन्हा दिसला.

तुझ्या वडिलांचा, शिक्षणतज्ञ व शाहीर आत्माराम यादव यांचा शैक्षणिक वारसा तू पुढे नेत आहेस, याचा मला विशेष अभिमान वाटतो.

कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ साठी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून संगणक कक्ष, गणवेश, बांधकाम आणि रंगरंगोटी करून देण्यापासून ते पालिकेच्या शाळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यापर्यंतचा तुझा प्रवास हा केवळ राजकीय नाही; तो एका संवेदनशील माणसाचा प्रवास आहे.

आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुझ्याकडे पाहताना मला अभिमान वाटतो...

पण खरं सांगू?

मला सर्वाधिक अभिमान वाटतो तो ‘
आजही माझ्यासाठी तितकाच जिवलग असलेल्या  ‘राजू’चा!

कारण पदं येतात... जातात...
सत्ता बदलते... काळ बदलतो...
पण काही नाती काळाच्या पलीकडे जातात.

आपली ३५ वर्षांची मैत्री हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.

राजू...

तू आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेस. हजारो लोकांच्या अपेक्षा तुझ्याशी जोडल्या आहेत. शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे.

पण माझ्यासाठी तू आजही तोच आहेस...

अकरावीच्या वर्गात माझ्यासोबत बसलेला,
सातारला दोघांसाठी डबा आणणारा,
एका ताटात माझ्यासोबत जेवणारा,
माझ्या वाईट काळात माझी सावली बनून उभा राहणारा,
आणि सुख-दुःखात कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्या सोबत राहणारा माझा मित्र ‘राजू’!

तुझं मन असंच मोठं राहो...
तुझ्या हातून कराडच्या विकासाची मोठी कामं घडोत...
तुझ्या नेतृत्वाला यश मिळो...
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

आज पदामुळे तुझी ओळख मोठी झाली असली, तरी माणूस म्हणून तू जसा आहेस, तसाच कायम राहा...

कारण माझ्यासाठी...

“राजेंद्रसिंह यादव” आणि “राजू” हे माझ्या आयुष्यातील एका अतूट, निरपेक्ष आणि भावासारख्या नात्याचं नाव आहे!

माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक, मनापासून आणि अनंत शुभेच्छा!

तुला उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि कराडच्या विकासासाठी तुझ्या मनात असलेली प्रत्येक स्वप्नं पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


तुझा मित्र

अजिंक्य गोवेकर-संपादक/ पत्रकार/वेध-माझा...


Friday, September 18, 2026

सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘जय जवान’चा तिरुपती बालाजी अवतरला! मंदिर प्रतिकृती ठरतेय कराडकरांचे आकर्षण; देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या शुक्रवार पेठेतील जय जवान श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भव्य आणि आकर्षक देखाव्यामुळे हा देखावा गणेशभक्तांसह कराडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, दर्शन व देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

जय जवान श्री गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून कराडच्या गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक देखाव्यांची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यंदा मंडळाचे ५० वे वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विशेष आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
मंडळाच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या देखाव्यांमध्ये इच्छापूर्ती कलश, भुताची गुहा, चालता-बोलता प्रश्नमंजुषा, अष्टविनायक दर्शन, अक्षरधाम मंदिर, एड्स जनजागृती सजीव देखावा आणि गंगोत्री मंदिर यांचा समावेश आहे. या देखाव्यांना कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
सुवर्ण महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेविका किशोरी शिंदे, नगरसेवक आशुतोष डुबल तसेच भाजप युवा नेते अतुल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी जय जवान श्री गणेश मंडळ उत्सव समिती २०२६चे अध्यक्ष सचिन औंधकर, उपाध्यक्ष अमोल पोकळे, खजिनदार संदीप कालेकर, सचिव प्रसाद तोडकर, तसेच ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष शंतनू कालेकर, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, खजिनदार उमेश बाचल, सचिव आकाश बाचल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक परंपरा आणि कलात्मक देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या जय जवान मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीने यंदाच्या गणेशोत्सवात विशेष रंग भरला आहे.

गणेश मंडळाच्या आरतीतून जनतेशी नाळ जोडणारे अतुलबाबा-शिवेंद्रसिंहराजे! कराडच्या गणेश मंडळांना दुचाकीवरून भेटी; सामान्यांमध्ये मिसळत नेत्यांनी साधला थेट संवाद ;कराडमध्ये चर्चेला उधाण!

वेध माझा ऑनलाइन।
गणेशोत्सवाच्या उत्साहाने कराड शहर आणि परिसर भक्तिमय झाला असताना सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या, दर्शन आणि विविध कार्यक्रमांना राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही पाहायला मिळत आहे. आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये आरतीचे कार्यक्रम सुरू असतानाच, आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही कराड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणरायाची आरती केली.

विशेष म्हणजे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना दुचाकीवरून फिरत भेटी देत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. मोठा ताफा किंवा औपचारिक स्वागतापेक्षा गणेशोत्सवाच्या वातावरणात सामान्य नागरिकांमध्ये मिसळण्याच्या या पद्धतीची सध्या शहरातील गणेश मंडळांमध्ये चर्चा रंगली आहे.

गणेश मंडळात पोहोचल्यानंतर आरतीमध्ये सहभागी होणे, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणे, गणेशभक्तांच्या शुभेच्छा स्वीकारणे आणि त्यांच्यासोबत काही क्षण घालवणे, यामुळे दोन्ही नेत्यांनी आपुलकीचा संदेश दिल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपचे प्रमुख नेते म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अतुलबाबा भोसले यांची स्वतंत्र राजकीय ओळख आहे. सातारा परिसरात शिवेंद्रसिंहराजे तर कराडमध्ये अतुलबाबा भोसले, अशी स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मात्र गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक आणि धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही नेते नागरिकांमध्ये प्रत्यक्ष मिसळताना दिसल्याने त्यांच्या या शैलीची चर्चा आता गणेश मंडळांमध्येही होत आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, आपुलकी आणि नागरिकांशी संवाद साधण्याचे माध्यम ठरतो. त्याच पार्श्वभूमीवर नेते आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कराडच्या गणेश मंडळांमध्ये सध्या आरतीसोबतच या दोन्ही नेत्यांच्या साधेपणाच्या शैलीचीही चर्चा रंगताना दिसत आहे.