एकीकडे वाहतुकीच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था उभारली जात असताना, कराडच्या कोल्हापूर नाक्यावर मात्र वाहतूक नियोजनाचा सावळागोंधळ नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व मलकापुचे नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोल्हापूर नाका हा कराड-मलकापूरला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या मार्गावर विद्यार्थी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी वाहतुकीच्या दिशांमध्ये बदल करताना सुरक्षितता, वाहनांची संख्या, पादचारी व विद्यार्थ्यांची हालचाल आणि संभाव्य अपघातस्थळांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निर्णयामुळे हे सर्व निकष तपासले गेले आहेत का, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
P87-P88 बंद... मग P86-P87 का खुला आहे हाच मुख्य प्रश्न आहे एक महत्त्वाचा क्रॉसिंग बंद करण्याची गरज निर्माण झाली असेल, तर त्याच परिसरातील दुसरा क्रॉसिंग खुला ठेवण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न विचारत P87 ते P88 दरम्यानचा मुख्य क्रॉसिंग बंद झाल्यानंतर वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह बदलणार आहे. अशा परिस्थितीत P86 ते P87 दरम्यानचा खुला क्रॉसिंग वाहनचालकांसाठी संघर्षबिंदू ठरू शकतो,
विशेषतः विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याठिकाणी गंभीर असल्याचे भोंगाळे व शिंगण यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
मलकापूर नगरपरिषदेने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी डी. पी. जैन कंपनीला मुख्य रस्ता बंद करण्याबाबत पत्र दिले होते. या पत्राचा आधार घेत सध्याचा मुख्य क्रॉसिंग बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, २०२४ आणि २०२६ या दोन वर्षांतील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला का?
वाहनांची संख्या वाढली आहे. नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विद्यार्थ्यांची ये-जा वाढली आहे. परिसरातील वाहतूक पद्धती बदलली आहे. मग दोन वर्षांपूर्वीच्या पत्राच्या आधारे आजचा वाहतूक निर्णय घेणे कितपत योग्य आहे? हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.जुन्या पत्राचा संदर्भ देणे सोपे आहे; परंतु आजच्या परिस्थितीचा नव्याने वाहतूक अभ्यास करून निर्णय घेणे प्रशासनाचे कर्तव्य नाही का? असा सवाल भोंगाळे व दादा शिंगण यांनी यावेळी केला
इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य क्रॉसिंग बंद करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करण्यात आली होती का?या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अद्याप समोर आलेले नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
वाहतूक व्यवस्थेचा निर्णय काही मोजक्या कार्यालयीन कागदपत्रांपुरता मर्यादित राहणार असेल, तर रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचा विचार कोण करणार? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित केला गेला.
दादा शिंगण व सतीश भोंगाळे थेट पोलिसांच्या दारात
या संपूर्ण प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.उद्या अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा आजच उपाययोजना करा’अशी भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुर्लक्ष झाल्यास आंदोलन...
या प्रश्नाबाबत NHAI अधिकारी तसेच अदाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने फेरआढावा घेऊन सुरक्षित पर्याय निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दादा शिंगण व सतीश भोंगाळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment