कराड येथे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या समस्येकडे आणि महामार्गालगतच्या गटर्सच्या प्रलंबित कामांच्या प्रश्नांकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कराड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा झाली. बैठकीला आमदार मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
बैठकीत आमदार डॉ. भोसले म्हणाले, कराड येथे राष्ट्रीय महामार्गालगत गोटे परिसर, मलकापूर येथे जय मोटर्स, पाचवड फाटा परिसर आदी ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच अनेक ठिकाणी गटार व्यवस्थेची कामे प्रलंबित आहेत. तीदेखील तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्गाची उंची अधिक असल्यामुळे त्याला जोडणारा अप्रोच रस्ताही उंच झाला आहे. परिणामी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घेऊन, या समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
बैठकीला सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment