अजिंक्य गोवेकर
कराड
आमदार पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसापूर्वी गृहराज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांचे समवेत मुंबईला जात असताना साताऱ्यात माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता काही काळ थांबले. त्यानंतर बाबा- काका यांच्या मनो मिलनाच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र या दोघांचे मनोमिलन येथील मलकापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवेळीच झाले आहे हे सगळेच जाणतात. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक दुरंगी न होऊ देता तिरंगी घडवून आणून पृथ्वीराज बाबांना आमदार करण्यात मोलाचा वाटा उचलून काका गटाने त्यांची सिद्धता देखील दिली आहे. आता त्यापुढे जाऊन ऍड.उदयसिह पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी या मनोमिलनाचा पुढचा अध्याय घडवून आणण्याचे प्रयत्न एकत्रपणे या दोघांकडून सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील हे दोन दिवसापूर्वी मुंबईला जाण्याकरिता एकत्रपणे चालले असताना अचानक त्यांनी सातार्यात जाऊन माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांचे घरी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यानंतर राज्यभर त्यांच्या मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. खरं तर त्यांचं मनोमिलन येथील मलकापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यानच झाल्याचे अनेक जण जाणतात. कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल बाबांना थांबवणे हा यामागचा हेतू आहे. या झालेल्या निवडणुकीनंतर मनोहर शिंदे याना काका गटाच्या महत्वपूर्ण मदतीने मलकापूर काबीज करता आले. त्यानंतर विधानसभा पार पडली. त्याचेही गणित जर पाहिले तर ही निवडणूक अतुल भोसले आणि पृथ्वीराज बाबा अशी दुरंगी झाली असती तर अतुल बाबांचा विजय झाला असता कदाचित...? अशी त्यावेळची परिस्थिती चर्चेत होती, मात्र त्यावेळी ऍड उदयसिह पाटील यांचा पाठिंबा न घेता त्यांना या निवडणुकीतून उभे करत ग्रामीण भागातील काँग्रेस मतांच्या विभाजनाचे चित्र उभे करून विरोधकांना अंधारात ठेवले व काकांच्या बालेकिल्ल्यात बाबांना मते देण्याचे राजकारण ग्रामीण परिसरातून घडवून आणले. पर्यायाने या दोघांची मते विभाजित न होता ऐनवेळच्या मिळणाऱ्या काकांच्या मताच्या आधारे पृथ्वीराजबाबा जोरात चालले, आणि आमदार झाले. डॉ. अतुल बाबांची देखील मते दुर्लक्षित करता येणार नाहीत इतकी वाढली. अर्थात ही निवडणूक दुरंगी झाली नाही हेच काँग्रेसच्या पथ्यावर पडले. यावेळी देखील काका गटाने पृथ्वीराज बाबांना व पर्यायाने काँग्रेसला मदत करत डॉ. अतुल बाबांना बाजूला करण्यात मोलाची भूमिका बजावली अशी चर्चा त्यावेळी झाली.
एकूणच कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राखला गेला आहे. गेली 35 वर्ष विलासकाका उंडाळकर यांनी राज्यात बिकट राजकीय परिस्थिती असताना दक्षिण च्या माध्यमातून काँग्रेसचे नाक नेहमीच उंच ठेवले होते हा इतिहास आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, खरेदी-विक्री संघ च्या माध्यमातून विलासकाकांनी मतदारसंघात काँग्रेसचे जाळे विणले. त्यांच्या मदतीशिवाय कृष्णा कारखान्याचा चेअरमनदेखील ठरत नव्हता अशी परिस्थिती होती. भोसले आणि मोहिते यांना पर्याय म्हणून अविनाश मोहिते यांचे नेतृत्व त्यांनीच कृष्णेच्या सभासदांना पर्याय म्हणून दिल्याचे सर्वज्ञात आहे. दक्षिणेत असणारी त्यांची ताकद संपूर्ण राज्याला परिचित आहे. पैलवान संजय पाटील खूनखटल्यानंतर दक्षिण चे राजकारण फिरले. उदयसिंह पाटील यांचे नाव यामध्ये येऊ लागले. परंतु त्यातून उदयसिंह पाटील निर्दोष झाल्यानंतर मात्र नाट्यमय घडामोडी घडत गेल्या व काँग्रेसचे आमदार म्हणून पृथ्वीराज चव्हाण दक्षिणचे नेतृत्व करू लागले. सध्याही तेच दक्षिणचे आमदार असले तरी डॉ. अतुलबाबा या मतदारसंघात आमदार होण्यासाठी म्हणून पुढे येऊ लागले आहेत. त्यांनी काका बाबांना टक्कर देत त्याठिकाणी यापूर्वी निवडणूक लढवली आहे. त्यावेळच्या मिळालेल्या मतापेक्षा आताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोठी मते मिळवून आपली घोडदौड सिद्ध केली आहे. याच कारणाने त्यांना थांबवणे काका किंवा बाबा गटाला एकट्याने व स्वतंत्रपणे शक्य नाही. म्हणूनच मतदारसंघावर काँग्रेसची पकड कायम ठेवण्यासाठी या दोघांची एकमेकांशी तडजोड गरजेची आहे. त्याला मनोमिलन असे नाव देऊन हे दोघेही यशस्वी राजकारण करत आहेत अशीही चर्चा असते. त्याचाच एक भाग म्हणून यापुढेही हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे राहवा यासाठी काका- बाबा यांनी अप्रत्यक्ष एकत्रितपणेच याठिकाणी भाजपला थांबवले आहे. काकांची पस्तीस वर्षाची मतदारसंघाची बांधणी आहे. पृथ्वीराज बाबांनी देखील दहा वर्षात आपली मोट बांधली आहे. याची बेरीज कायमच राहावी यासाठी ह्या दोघांचे एकत्रीकरण गरजेचे आहे. त्यासाठी उदयदादाना विधान परिषदेवर पाठवून काका- बाबा गटासह मतदार संघातील काँग्रेसदेखील अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे.त्याच कारणाने बाबानी साताऱ्यात अचानक जाऊन काकांची घेतलेली भेट होणाऱ्या विधानपरिषदेच्या निमित्ताने काँग्रेससाठी गरजेची व महत्त्वाची मानली जात आहे.
पाहूया...पुढे काय होतय ते...!!
No comments:
Post a Comment