कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवस निळसर-हिरवा होत असताना आता पावसामुळे नदी गढूळ होऊन प्रदूषण अधिकच वाढेल की काय अशी भीती आहे? दरम्यान संबंधित यंत्रणांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की सत्य दडपण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आणि कराड उत्तर आणि दक्षिण चे लोकप्रतिनिधी अजूनही याविषयी गप्प का आहेत... हाही जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे...
या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या 'वेध माझा' मुळे हा विषय लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला असून, प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांच्या मते, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीशी आणि पर्यावरणाशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागांचे मौन अत्यंत संशयास्पद आहे. पाण्याचे नमुने नमुने घेतले का ? ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले का? अहवाल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो जनतेपासून का लपवला जात आहे? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
'वेध माझा' ने सातत्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून हा विषय जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहणारा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. "हा पाठपुरावा थांबवू नका; सत्य बाहेर येईपर्यंत आवाज उठवत राहा," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवून अहवाल प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे, अशी भूमिका पुढे येत आहे.
याशिवाय, हजारो नागरिकांच्या सहभागातून सही मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता जनआंदोलनात रूपांतरित करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
स्थानिक महाविद्यालये, पर्यावरण अभ्यासक आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी होत आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र परीक्षणाची तुलना झाल्यास सत्य अधिक स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.
प्रशासनाला थेट सवाल...
पाण्याचा रंग बदलून अनेक दिवस झाले, तरी अधिकृत अहवाल का नाही?
पाण्याचे नमुने तपासले की नाही?
तपासणी झाली असेल तर निष्कर्ष जनतेपासून लपवले का जात आहेत?
नदी प्रदूषित नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे सांगण्यास का टाळाटाळ करत आहे?
आणि प्रदूषण झाले असेल, तर जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत नागरिक शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
'वेध माझा'चा निर्धार
कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य, अधिकृत तपासणी अहवाल आणि जबाबदारांवरील कारवाई जनतेसमोर येईपर्यंत 'वेध माझा' चा पाठपुरावा आणखी तीव्रपणे सुरू राहील.
कारण हा केवळ एका नदीचा प्रश्न नाही तर हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment