Sunday, June 1, 2025

कराड पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार ; राजेंद्रसिंह यादव यांची गर्जना -सातारा जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत,; नामदार देसाई यांचे आवाहन; मंत्री देसाई यांची कार्यक्रमाला वेळेत न येण्याची सवय आजही कायम ; पत्रकाराच्यात चर्चा -

वेध माझा ऑनलाइन
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सातारा जिल्ह्याला भरभरून निधी दिला आहे. आपला जिल्हा म्हणून त्यांना सातारा जिल्ह्याबद्धल जिव्हाळा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सातारा जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
दरम्यान नियोजित कार्यक्रमाला उशिरा येण्याची पालकमंत्री देसाई यांची सवय आजही कायम असल्याचे आज दिसून आले
पालकमंत्री शंभूराजे देसाई हे कोणत्याही नियोजित कार्यक्रमात वेळेवर आलेत अस चुकून कधीतरी झालं असेल, नाहीतर शक्यतो वेळ उलटून गेल्यावरच ते येतात असा साताऱ्या जिल्ह्याला अनुभव आहे...तोच अनुभव आजही कराडात आला... आज कराडमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला नियोजित वेळेत मंत्री आलेच नाहीत... वेळ निघून गेल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना फोनवर फोन केले जात होते... ते कुठं आहेत याची माहिती घेतली जात होती... तरीही ते नेहमीप्रमाणे वेळेपेक्षा उशीराच कार्यक्रमस्थळी आले... ताटकळत त्यांची वाट बघत थांबलेल्या पत्रकारांच्यात याबाबत त्याठिकाणी चर्चा सुरू होती.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडला भरभरून दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू, अशी ग्वाही राजेंद्रसिंह यादव यांनी यावेळी दिली.
 
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनमध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे, कराडचे शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रक्षप्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, राहुल खराडे, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे, विनायक पावसकर, विनोद भोसले, ओंकार मुळे, चंद्रकांत जाधव, विद्या पावसकर, सुलोचना पवार, रणजीत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भूमिका घेतल्यावर आमच्यावर टीका झाली. मात्र, राज्यातील जनतेने 80 आमदार निवडून देत पक्ष आणि चिन्ह कोणाचे, यावर शिक्कामोर्तब केले. आमचा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास असून त्यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर शिवसेना वाढीसाठी संघटन बळकट करून पक्षवाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. देसाई म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांनी आतापर्यंत कराडसाठी मागितलेल्या सर्व कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला आहे. त्यातील शिवतीर्थ व अन्य पुतळे शुशोभीकरण, स्मारक भूमिपूजन, समाज मंदिर बालसंस्कार केंद्राचे भूमिपूजन आदी कामांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. त्यामुळे आता कराडमध्ये विकासकामच शिल्लक राहिलेले नाही. संपूर्ण जिल्हाभरात विकासकामे देण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पेन कधीही थांबलेला नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेतला लगावला.
लोकसभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता त्यावेळी झालेल्या एका सभेत आपण विधानसभेला जिल्ह्यातील महायुतीचे आठही आमदार निवडून आणण्याचे बोललो होतो. त्यानुसार आपले आठही आमदार निवडू आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही हे चित्र पाहायला मिळेल. त्यासाठी महायुती मजबूत करून शिवसेनाही वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला झेंडा फडकवूया, असे आवाहनही शंभूराज देसाई यांनी केले.

प्रास्ताविकात राजेंद्रसिंह यादव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असून जिल्ह्यात शिवसेनेचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. आपल्याला मिळालेल्या दोन दिवसांच्या अवधीत आपण हा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम घेतला असून पुढच्या महिन्यात वीस ते पंचवीस हजार लोकांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. तसेच शिवसैनिक काम करायला इच्छुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने बूथ आणि शाखा मांडणीवर भर देणार आहोत. 
प्रारंभी, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर, तालुका, तसेच जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. 

कराड पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडला भरभरून दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू, अशी ग्वाही राजेंद्रसिंह यादव यांनी यावेळी दिली.


विकासकामांसाठी आपण मंत्रीपदाचा वापर करणार : ना. देसाई यांचे विधान 

एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर लक्ष आहे. त्यांनी आपल्याला मागील तेवढा निधी दिला आहे. आपणही पालकमंत्री म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. जिल्हाधिकारी, प्रशासन, शासन स्तरावर पाठपुरावा करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणलेल्या विकासकामांसाठी आपण मंत्रीपदाचा वापर करणार असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.


कामाचे मोजमाप करून जबाबदारी देणार

पक्षाने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार येत्या काळात विविध कमिट्यांवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सभासद नोंदणी, पक्ष वाढीसाठी प्रयत्न, विविध कार्यक्रमांचे आयोजन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीची धडपड आदी निकष लावून कामांचे मोजमाप करूनच राज्य, तालुका आणि जिल्हा कमिट्यांवर, तसेच युवक, युवती, महिला, कामगार सेनेच्या पदांवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवडी करणार असल्याचे ना. देसाई यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment