सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. सभासदांचे हक्क पायदळी तुडविले.सहकाराच्या नियमांचे पालन करूनच मी सह्याद्रीचा सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये ५ वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्तार वाढीचाही प्रश्न होता. त्यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला होता? कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरली होती? कोणाला काम
देण्यात आले त्याची कॉपी, प्रोसिडिंग नक्कल व करारनामा मागितले होते. मात्र या प्रश्नाबाबत टुकार उत्तर देऊन सभा गुंडाळण्याचे काम अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी केली.
कराड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद निवास थोरात बोलत होते. यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण आनंदराव थोरात, विश्वास जाधव आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा दावा अध्यक्ष बाळासाहेब पाटील करतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे का टाळता? प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना माईक का बंद करता?असा सवाल करत त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता अध्यक्षांनी केलेली चिडचिड म्हणजे 'खाई त्याला खवखवे' अशीच परिस्थिती असल्याचा टोलाही निवास थोरात यांनी यावेळी लगावला माझ्या व्यक्तिगत कर्जाबाबत टीका टिप्पणी केली व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती साखर आयुक्तालय येथून घ्या असे मुजोर उत्तर दिले. हा प्रकार लांच्छनास्पद आहे याशिवाय मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही ही बाब चुकीची आहे असेही ते म्हणाले
खरंतर या सर्व प्रकाराबाबत मी साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील ती माहिती दिलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत विचारले असता त्याचेही उत्तर देत नाहीत. ही दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही असेही थोरात म्हणाले.
No comments:
Post a Comment