थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या मार्गदर्शनातून आणि अनुभवातून कारखाना उत्तम पद्धतीने कसा चालवावा हे आम्ही शिकलो. त्यामुळेच आज कारखाना प्रगतीपथावर नेता आला. पण अविनाश मोहितेच्या सत्तेच्या काळात घोटाळ्यांच्या पलीकडे त्यांनी काय केले?,
निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने कशाला देता? असा थेट सवाल य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केला. वाठार (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील, संभाजी पाटील, दयानंद पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की २०१५ साली जेव्हा आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेव्हा व्यापाऱ्यांची देणी देण्याकरता ही पैसे नव्हते. पण गेल्या ११ वर्षांत आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे कारखान्याने नवी उंची गाठली असून, आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. येणाऱ्या ५ वर्षात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते पूर्ण करायचे आहेत. तसेच ऊसदरातही एक नंबरला आम्ही राहू, अशी खात्री देतो.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला. त्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. पण विरोधक आज खोट्या वल्गना करत आहेत. ते आज १२० किलो मोफत साखर देण्याची घोषणा करत आहेत. पण मग जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा का मोफत साखर दिली नाही? आज निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने कशाला देता? आज कृष्णा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गेल्या ११ वर्षात कारखान्याला १४ पुरस्कार मिळाले असून, त्यापैकी ८ पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत व्ही.एस.आय.च्या माध्यमातून मिळाले आहेत. विरोधकांकडे कोणताही अजेंडा नाही. त्यांनी स्वतःच्या ५ वर्षात काय दिवे लावले हे सभासदांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.
राजेश पाटील-वाठारकर म्हणाले, भाऊ - आप्पांनी ज्या कल्पकतेने हा कारखाना उभारला, त्याला आज बदलत्या काळानुसार प्रगतीपथावर नेण्याचे काम डॉ. सुरेशबाबांनी केले आहे. राज्यातील नामांकित कारखान्यामध्ये आज कृष्णा कारखान्याचे नाव अभिमानाने घेतले जाते.
संचालक दत्तात्रय देसाई यांनी डॉ. सुरेशबाबांनी शेतकरी हिताचे धोरण राबवित कारखान्याला महाराष्ट्रात अव्वलस्थानी केल्याचे सांगून, सभासदांनी सहकार पॅनेलला भक्कम साथ द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील, बाळासाहेब जगताप, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, माजी सदस्या शामबाला घोडके, महेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्या मनिषा पाटील, शिवाजीराव थोरात, वसंतराव शिंदे यांच्या विविध गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो :
No comments:
Post a Comment