गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापासून ते वाहतूक नियमांचे पालन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक शांतता राखण्यापर्यंत नागरिकांना नियमांची आठवण करून देणारे पोलीस प्रशासन स्वतःच्या बाबतीत किती काटेकोर आहे? हा सवाल कराडातील एका घटनेने ऐरणीवर आणला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे शहर व परिसरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी आज कराडात आले होते. बैठकीच्या निमित्ताने प्रशासनाकडून गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचे धडे दिले जात असतानाच, त्यांच्या वाहनावरील नंबरप्लेटनेच उपस्थित पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले.
वाहनाच्या नंबरप्लेटकडे बारकाईने पाहिल्यानंतर ती सध्या अपेक्षित असलेल्या विहित स्वरूपाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे, वाहन नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च स्तरावरील अधिकाऱ्याच्या वाहनाबाबतच असा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकाराची चर्चा होणे स्वाभाविक ठरले.
सवाल थेट आयजींना; उत्तरही स्पष्ट!
पत्रकारांनी याबाबत थेट आयजी रंजनकुमार शर्मा यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी “नंबरप्लेट आवश्यक त्या प्रोसेसमध्ये आहे. लवकरच करून घेऊ,” असे स्पष्ट केले.
आयजींच्या या उत्तरामुळे एक बाब स्पष्ट झाली—नंबरप्लेटबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ नंबरप्लेटचा राहत नाही; नियम सर्वांसाठी समान आहेत का आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतही त्याच निकषांचा अवलंब केला जातो का? हा मूलभूत प्रश्न पुढे आला आहे.
केवळ सामान्य नागरिकांकडून नियमांची अपेक्षा;
गणेशोत्सव काळात एखाद्या नागरिकाच्या वाहनावर नियमबाह्य नंबरप्लेट आढळल्यास त्याच्यावर कारवाईची शक्यता असते. वाहनचालकांकडून कागदपत्रे, नंबरप्लेट, वाहतूक नियम आणि इतर बाबींचे काटेकोर पालन अपेक्षित केले जाते. मग याच नियमांच्या चौकटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे पाहिले जाते का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या वाहनांबाबतही त्याच कायदेशीर निकषांचे पालन करणे अपेक्षित असते. कारण कायद्याची ताकद केवळ कारवाई करण्यात नसते; तर तो कायदा स्वतःपासून लागू करण्याच्या नैतिक भूमिकेतही असते.
आयजी शर्मा यांनी नंबरप्लेट आवश्यक प्रक्रियेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. संबंधित नंबरप्लेट बदलण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली? ती कोणत्या टप्प्यावर आहे? आणि विहित नंबरप्लेट वाहनावर नेमकी कधी बसविण्यात येणार? या प्रश्नांची उत्तरेही महत्त्वाची ठरणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडात शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन याचा संदेश देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनामुळेच ‘नियम आधी कोणासाठी?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे.
दरम्यान आयजी शर्मा यांनी स्वतः “लवकरच करून घेऊ” असे आश्वासन दिल्याने आता त्यांच्या वाहनावर नियमानुसार नंबरप्लेट कधी झळकते, याकडे कराडातील पत्रकारांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment