Thursday, September 3, 2026

कराडच्या नवीन उड्डाणपुलाखाली प्रवेश-निर्गमन मार्गाची पाहणी ; प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग सुचवला; ‘ब्लॅक स्पॉट’ टाळण्यासाठी नियोजन करण्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे संकेत

वेध माझा ऑनलाईन।
 : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड शहरातील नवीन उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश आणि शहरातून बाहेर जाण्यासाठी प्रस्तावित मार्गाची कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी केली. वाहतुकीची सुरक्षितता आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग तयार करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला.

उड्डाणपुलाच्या कामामुळे कराड शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीत बदल होणार असून, प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, तसेच वाहनचालकांना सुरक्षितपणे मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी नगराध्यक्ष यादव यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली.
दरम्यान, नवीन प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाचे नियोजन करताना या ठिकाणी पुन्हा ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. 
वाहतुकीचा प्रत्यक्ष प्रवाह लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात येतील, तसेच प्रायोगिक तत्त्वावर मार्गाची अंमलबजावणी करून त्याचा परिणाम पाहिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीला अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित दिशा मिळण्याची अपेक्षा असून, प्रवेश-निर्गमन मार्गाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या मार्गाची रचना करताना वाहनांची संख्या, वळणांची रचना, दृश्यमानता आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा विचार करून अंतिम आराखडा निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment