वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी हातात तलवार घेऊन क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविणाऱ्या कराडच्या यशश्री सायली महेश मुंढेकर हिने तलवारबाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कराडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
यशश्रीने राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत दमदार कामगिरी करत यश मिळविले. त्यानंतर जम्मू-कश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील फेंसिंग स्पर्धेतही तिने आपल्या खेळाची छाप उमटवली. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आता तिची आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेंसिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अवघ्या आठव्या वर्षी राज्यस्तरापासून राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा यशश्रीचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. शिक्षणासोबतच तलवारबाजीच्या सरावासाठी वेळ देत तिने सातत्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
यशश्रीच्या या यशामागे तिची जिद्द, मेहनत, सातत्य तसेच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. लहान वय असूनही सरावातील सातत्य आणि खेळाप्रती असलेली तिची निष्ठा अनेक बालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
तलवारबाजीसारख्या कौशल्य, वेग, चपळता आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या खेळात यशश्रीने मिळविलेली ही झेप कराडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ती उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यशश्री सायली मुंढेकर हिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुटुंबीय, शाळा, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच कराड परिसरातून तिचे अभिनंदन होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत
No comments:
Post a Comment