“करी घेऊ ते कार्य सिद्धीस नेवू, असा सह्यनिर्धार चित्तांत ठेवू... ‘शिवाजी’ आपत्ती पुढे नाही झुकले जगी ‘हिंदवीराज्य’ निर्माण केले!” ...या प्रेरणादायी विचारांना कृतीची जोड देत कऱ्हाडच्या धारकऱ्यांनी आता राजस्थानकडे कूच केले आहे.
गुरुवर्य श्री. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या आदेशानुसार कऱ्हाडमधील श्री सागर आमले,अनिल खुंटाळे,डॉ प्रवीण माने, विक्रम सावंत, अक्षय डीचले, प्रसाद शेलार,विक्रांत यादव,वैभव ढगाळे, विक्रांत माने, रमेश, पवार
हे धारकरी राजस्थानमध्ये प्रचारक व विस्तारक म्हणून कार्य करण्यासाठी रवाना झाले आहेत.
कऱ्हाडमध्ये सुरू असलेल्या शिवकार्याची व्याप्ती महाराष्ट्राच्या सीमारेषेपलीकडे नेण्याच्या उद्देशाने या धारकऱ्यांवर राजस्थानमध्ये नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजस्थानमध्ये श्री दुर्गामाता दौड तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांचे विचार, इतिहास आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच कार्याचा विस्तार राजस्थानमध्ये करण्यासाठी कऱ्हाडचे धारकरी तेथे जाऊन स्थानिक समाजाशी संपर्क साधणार असून, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या विविध उपक्रमांना सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
राजस्थान हे नवे कार्यक्षेत्र असले तरी ‘कार्य सिद्धीस नेण्याचा’ निर्धार घेऊन धारकऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुजींच्या मार्गदर्शनातून मिळालेली प्रेरणा आणि शिवकार्याची निष्ठा या बळावर राजस्थानमध्ये कार्याची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कऱ्हाडच्या धारकऱ्यांच्या या नव्या कार्यप्रवासामुळे शिवकार्याचा संदेश महाराष्ट्राबाहेरही पोहोचविण्याच्या प्रयत्नांना नवे क्षेत्र मिळाले आहे या कार्यासाठी आई जगदंबेने सर्व धारकऱ्यांना उदंड यश, सामर्थ्य, धैर्य आणि कार्यपूर्तीचे बळ द्यावे, अशी भावना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कऱ्हाड यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
“शिवकार्याची ज्योत एका प्रदेशापुरती मर्यादित न राहता विविध भागांत पोहोचावी, यासाठी कऱ्हाडचे धारकरी राजस्थानच्या भूमीत नव्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणार आहेत,” अशी भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment