रुद्राक्ष धारण करणे म्हणजे एक कोटी गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होणे होय. इष्टलिंग हे केवळ दागिना नसून शिवतत्त्वाशी जोडणारा जिवंत दुवा आहे. श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा केल्यास तेहतीस कोटी देवतांच्या पूजेइतके पुण्य लाभते असे प्रतिपादन केदार पिठाचे जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर केदार जगद्गुरु भिमाशंकरलिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा उत्साहात झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर, महादेव शिवाचार्य वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडच्या भूमीत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारांचीही समृद्ध परंपरा जपली जात आहे. या परंपरेचेच दर्शन घडविणारा वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेषतः नव्या पिढीला आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान, संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा ठरला.
भस्माचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शरीरावरील विविध ठिकाणी लावले जाणारे भस्म हे केवळ धार्मिक प्रतीक नसून मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला कुबेराची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भस्म ठेवले तरी भस्माचे महात्म्य श्रेष्ठ आहे असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामी (म्हैसाळ) म्हणाले की, संपत्ती, नाव, कीर्ती आणि मान-सन्मान माणूस आयुष्यात मिळवू शकतो; मात्र जीवनाचा शेवटचा प्रवास करताना त्याच्यासोबत केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच जाते. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.
वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, समता, श्रमप्रतिष्ठा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक मानली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने धर्माबद्दल आत्मीयता बाळगून त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
विनायक विभुते,अनिल खुंटाळे यांच्या हस्ते महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला.राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे,चंद्रशेखर नखाते, विजय पट्टणशेट्टी या ५ दांपत्यांचे हस्ते इष्टलिंग महापूजेला सुरुवात करण्यात आली.नंदकुमार बटाणे,संजय शेटे, सुनील महाजन, धनंजय विभूते,सुनील चिंगळे, विजय भागवत, राजू खलीपे, गुरुनाथ कचरे,अशोक संसुद्दी, दिलीप चिंचकर,राजन धोकटे,गणेश शेटे यांनी उपस्थित शिवाचार्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.प्रा.प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment