Thursday, March 26, 2020

...आता विचार व्हायलाच हवा...!!

(अजिंक्य गोवेकर)
कराड-
सध्या कोरोना व्हायरस च्या प्रसाराला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी 21 दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला आहे.खरतर लोकांची एकमेकांशी असणारी रोजची साखळी मोडून काढणे हे या मागचे उद्दिष्ठ आहे,की जेणे करून लोक-लोकांच्या संपर्कात राहणार नाहीत व या विषाणूचा संसर्ग रोखला जाऊ शकेल.  खूप चांगला पर्याय आहे ... पण याची दुसरी बाजू दुर्दैवाने खूप वाईट दिसून येत आहे ती म्हणजे,गोर-गरीब जे भीक मागून खातात,किंवा रोजच्या रोज कमावून खातात त्यांना सध्या 2 वेळा जेवायचं काय असा प्रश्न आहे.म्हणजे...भीक मागायची कोणाला...,रस्त्यावर भीक मागायला देखील कोणी दिसत नाही,तर स्वतः चे व घरच्यांचे पोट भरायचं कस... हा प्रश्न या लोकांना आहे,तर हातावर पोट आहे त्यांची तर मारामारच आहे,सध्या कोठे काम नाही तर खायलाही नाही अशी वाईट अवस्था त्यांची आहे. मग याच विषयाला धरून सगळीकडे चर्चा अशी आहे की...निवडणूक काळात जे लोक जेवण न मागता देतात ते या गरीब लोकांचा आत्ता जगण, मरण्याचा  प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करायला मोठया मनाने सध्या का पुढं येत नाहीत...??? तसेच ज्या सामाजिक संस्था ,आम्ही गरिबांसाठी झटतो अस सांगत वर्तमानपत्रातून गरिबांना मदत केल्याचे फोटो सेशन करून चमकोगिरी करताना दिसतात आत्ता या संस्था कुठं गेल्या ?अशीही सध्या चर्चा आहे...

सध्या कोरोनाच्या प्रसाराच्या भीतीने कोणीही कोणाला जवळ करत नाही अशी सामाजिक स्थिती दिसते आहे,म्हणजे समाज एकत्र करून करायचे कोणतेही कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम कोणीच करण्याच्या मनस्थितीत नाहीत ,गर्दी करून या रोगाला आमंत्रण द्यायचं नाही म्हणून माणूस माणसापासून लांब आपआपल्या घरात स्वतःला कोंडून घेतल्याच्या अवस्थेत दिसतो आहे.हे चित्र एकीकडे,तर दुसरीकडे ज्या लोकांना घर दार नाही,किंवा हातावर पोट आहे अशा लोकांना सध्या या बंदमुळे पोटाला खाण्यासाठी नसल्याने या लोकांच्या पोरा बाळांना अक्षरशः भुकेने मरायची वेळ सध्या आली आहे. या लोकांना एखाद्या दयावानची गरज भासू लागली आहे की जो यांच्या भुकेची कळ ओळखून त्यांना अन्नाचा घास देऊ शकेल ,पण अद्याप कोणीच असा विचार करत पुढे आलेला दिसत नाही.
याच्या उलट चित्र निवडणुकीच्या दरम्यान नेहमी दिसते.नको म्हटलं तरी जेवायचा आग्रह  होतो.सरसकट सगळ्यांना त्यावेळी बुचकळून काढले जाते. दारूचा पाऊस ही त्यावेळी पाडला जातो. .शेकडो लोक पुन्हा जेवतील एवढ्या अन्नाची नासाडी होते, तरी त्याचे सुख,दुःख त्यावेळी काही नसते. मग आजची परीस्थिती ओळखून रस्त्यावर भीक मागून खाणारे म्हातारे असतील,लहान मूल असतील बेवारस असतील किंवा रोज काम करायचं आणि जगायचं अशी जगण्याची पद्धती असणारे गरीब असतील ,त्यांची भूक समजून घेण्याची गरज आता खऱ्या अर्थाने आहे.यासाठी आपली बांधीलकी माणुसकीशी आहे असे स्वतःला समजावून सांगून मगच या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊ शकतो. त्यांना दिलेल्या जेवणाच्या बदल्यात या लोकांचा आपल्याला कसलाही परत उपयोग नाही हे देखील लक्षात घेऊन हा दिलदारपणा दाखवणार्याची आज गरज आहे . तसेच ज्या संस्था आम्ही गरिबांना मदत करायला नेहमी तत्पर असतो अस सांगत तसे काही कार्यक्रम केल्याचे फोटो पत्रकारांना देत आमचे फोटो छापा अस सांगून आपली पाठ नेहमी थोपटून घेत असतात त्या संस्था आत्ताच्या वेळेला गरिबांच्या पोटाचा विचार करताना का दिसत नाहीत?
एकूणच, चार,चार दिवस उपाशी असणाऱ्या, भुकेने व्याकुळ होऊन रडणाऱ्या गरीब लहान मुलांना तसेच  म्हाताऱ्या माणसांना व एकंदरच अशा गरिब असणाऱ्या प्रत्येकालाच दोन घास देण्यासाठी  माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ माणूस म्हणऊन घेणाऱ्या प्रत्येकावर यानिमित्ताने आता आली आहे.या लोकांना आत्ताच अन्नाचा कण जर नाही मिळाला तर ही लोक अक्षरशः भूक भूक करून मरतील ...
आणि आपण त्यानंतर आपल्यातील माणुसकीला जागे करून काय उपयोग...???
लॉक डाऊन 21 दिवसाचा आहे...म्हणजे 21 दिवस हे सगळे गरीब उपाशी राहणार आहेत.
आत्ताच त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे..
 याबाबत विचार व्हायला हवा...!!

Saturday, March 21, 2020

उद्याचा होणारा " जनता कर्फ्यु ' यशस्वी करूया... कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणीताई शिंदे यांचे आवाहन


कराड-
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य आणि केंद्र शासनाद्वारे अनेक तातडीने उपाय,प्रतिबंध घातले जात आहेत त्यातील व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी रविवार दि २२मार्च २०२० रोजी 'जनता कर्फ्यू ' चे आवाहन केले आहे.
आपले कुटुंब, समाज व पर्यायाने देशातील प्रत्येक नागरिकाचा सुरक्षेचा दृष्टीने आपण सर्वानी स्वयंप्रेरणेने रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत घराबाहेर न पडून हा 'जनता कर्फ्यू  यशस्वी करूयात, मी व माझे कुटुंब या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत आहे.आपण सर्वांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन कराड नगरीच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी कराड वासीयांना केले आहे.

Friday, March 20, 2020

जमाल सिद्दीकी यांची महाराष्ट्राच्या "हज कमिटी' च्या अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी करा ; काँग्रेस अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण यांची मागणी



(अजिंक्य गोवेकर)
कराड-
एन, आर, सी, विरोधातील आंदोलन काँग्रेसचेच आहे असे म्हणणाऱ्या व NRC विरोधात चाललेल्या आंदोलनास बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची त्यांच्या हज कमिटीच्या राज्याच्या अध्यक्ष पदावरून त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी काँग्रेसचे सातारा जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे,की N r c ला विरोध करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला बदनाम करणाऱ्या भाजपच्या जमाल सिद्दीकीची महाराष्ट्राच्या हज कमिटीच्या अध्यक्ष पदावरुन तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.
जमाल सिद्दीकी हे भाजपाचे पोपट आहेत. राज्यात आता सरकार बदलले आहे. पदावरुन त्याची
हकालपट्टी होणार आहे, म्हणून त्यांची जाता जाता काँग्रेस विरोधी बाष्फळ बडबड सुरु आहे. त्यांनी
मुस्लीमांची दिशाभूल करण्याचे कट कारस्थानांचे षडयंत्र चालू केले आहे. NRC ला काँग्रेसचा विरोध आहे. परंतू जनतेने या विषयी चे आंदोलन हाती घेतले आहे. NRC होवू नये, यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत याबाबत अहवाल येईल.
आणि भाजपने केलेला CAA,NRC, NPP कायदा असंविधानिक आहे. काँग्रेसने पूर्वी केलेला कायदा संविधानिक होता. म्हणून आंदोलने जनक्षोभ झाली नाहीत. त्यामुळे जमाल सिद्दीकीचा काँग्रेसला विरोध म्हणजे जनतेला आडाणी समजण्याचा बालिश प्रकार आहे व हेतुपुरस्सर काँग्रेसला बदनाम करण्याचे त्यांनी घेतलेले कंत्राट आहे. काँग्रेस राजवटीत भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुस्लीमाला नागरीकत्व मिळालेले आहे.
परकीय घुसघोरांना नागरीकत्व देण्यास आमचा नव्हे, तर सर्वच भारतीयांचा विरोध राहील. मात्र हा कायदा येण्याअगोदर पाकिस्तानी मुस्लीमांना नागरीकत्व कोणी दिले, याचीही माहिती सिद्दीकी यांनी घेतलेली नाही. नागरिकत्व कायदा काँग्रेसच्या राजवटीत त्रासदायक मुळीच नव्हता.नागरीकत्व कायद्यातून मुस्लीमांना वगळून देशाचे तुकडे करायचे व जातीय वाद वाढविण्याचे घृणास्पद काम कोण करत आहे? हे स्पष्ट दिसत असून मुस्लीमच नव्हे संपूर्ण भारतीय जनता या कायद्या विरोधात पक्ष, गट-तट न पाहता उभी आहे. आत्तापर्यंत झालेल्या कोणत्याही जनगणनेत मुस्लीमांना भडकावलेले नव्हते व नाही. मात्र यावेळी जनगणनेत मुस्लीमच नव्हेत, तर ओ बी सी., एस.सी., एस.टी., अदिवासी यांना भडकविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.
सध्याचे NRC, NPP मध्ये मुस्लीमांना घाबरण्याचे कारण नाही हे जमालभाई सिद्दीकी जाहीर बोलत आहेत. तर त्यांनी NRC, NPP बंद करण्यासाठी व NRC रद्द करण्यासाठी हिम्मत दाखवावी.खरंच मुस्लीमांना NRC बाबत घाबरण्याचे कारण नसेल तर सुप्रिम कोर्टाचे जजमेंट मिळवून घ्यावे तेव्हाच जनतेला विश्वास बसेल. दंगल भडकवणाऱ्यांवर केसेस दाखल करा. असे सांगणाऱ्या न्यायमूर्तीची बदली एका रात्रीत कशी होते, ही कसली न्यायप्रक्रिया?
जमालभाईंचे वक्तव्ये जनतेची दिशाभूल करणारी व देशाची एकात्मता धोक्यात घालणारी आहेत.
म्हणून आम्ही त्याचा अल्पसंख्याक राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. हज समिती अध्यक्ष पदावरुन त्यांची त्वरीत हकालपट्टी व्हावी. तसेच शासनाने No NPR बाबत लवकरच ठराव
मंजुर करावा अशीही मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत . मुस्लीमांसह सर्व भारतीयांनी CAA, NRC रद्द होण्यासाठी NPP बॉयकॉट करावा असे आवाहन ही या निमित्ताने सातारा जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्यांक  अध्यक्ष झाकीर पठाण यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

Thursday, March 19, 2020

आण्णा पावस्करांचे नगरसेवकपद रद्द करा- नगरसेविका स्मिता हुलवान यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कराड
येथील नगरसेवक आण्णा पावसकर यांनी झालेल्या विशेष सभेदरम्यान पालिकेतील महिला सदस्यांबाबत द्विअर्थी बोलणे,अपमानास्पद बोलणे,महिलांची टिंगल टवाळी करणे,महिला सदस्याना लज्यास्पद बोलणे असे प्रकार केले. हे चुकीचे असून या त्यांच्या वागणुकीचा आम्ही सर्वजण निषेध करतो.त्यांच्या या गैरवरतनाबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी आपण सातारा जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली असल्याचे नगरसेविका स्मिता हुलवान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्याने महिला राजकारणात धाडसाने आल्या. मलाही त्यामुळेच संधी मिळाली. आमचे पालिकेतील काम प्रभावीपणे चालु आहे, हे पाहून आण्णा पावस्कर याना ते खुपतय, त्यांचा जळफळाट होतोय.म्हणून ते सभागृहात असले उद्योग करत आहेत.त्यामुळे मात्र, समाजात महिला सदस्यांकडे पाहण्याचा लोकांचा ड्रीष्टीकोन बदलला आहे. असे चालत राहिल्यास महिला राजकारणात येण्यास धजावणार नाहीत. पावसकर यांचे असले उदयोग या पुढे आपण खपवून घेणार नाही असा इशाराही नगरसेविका हुलवान यांनी यावेळी दिला.
यावेळी,नगरसेवक राजेंद्र यादव म्हणाले,आण्णा पावसकर यांचं वय वाढेल तस त्यांची बुद्धी काम देईना असच दिसतय. पालिका इतिहासात महिलां सद्स्याचा अपमान झालेला आजपर्यंत कधी ऐकले नाही.चव्हाण साहेबांची परंपरा या शहराला आहे.त्यामुळे या परंपरेचे पावित्र्य अण्णांच्या असल्या वागण्याने खालावत चालले आहे.सभागृहात बायकांशी काय भांडता?असा सवाल करत,तुमच्या वयाकडे बघून आम्ही आत्ता पर्यंत काही बोललो नाही पण यापुढे महिला सदस्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशाराही यादव यांनी नगरसेवक पावसकर याना दिला.

Wednesday, March 18, 2020

हॅलो... शंभुराज बोलतोय...खासगी सावकारीचा विषय आहे, स्ट्रॉंग ऍक्शन घ्या...

(अजिंक्य गोवेकर)
कराड-
एकीकडे राजकारणी म्हटलं की फसवणारे,किंवा खोट बोलणारे,कार्यकर्त्यांना वापरून घेणारे,
भ्रष्टाचारी,अशी इमेज लोकांच्या मनात पुढारी म्हटलं की सर्वसाधारणपणे असते.पण सगळेच एका माळेचे मणी नसतात तर राजकारण्यांमध्ये सुद्धा संवेदनशील माणूस एखाद्याला न्याय देण्यासाठी धडपडत असतो हेही काहीवेळा दिसून येत असते...असाच काहीसा प्रत्यय काल येथील सर्किट हौस येथे आला.राज्याचे गृह,वित्त राज्य मंत्री ना. शंभुराज देसाई पत्रकार परिषद घेण्याकरिता सर्किट हौस येथे काल संध्याकाळी अचानक आले.  पत्रकार परिषद ठरल्याप्रमाणे पार पडली, आणि ते त्यांच्या पुढच्या नियोजित ठिकाणी जायला निघणार तोच, उत्तर कोपर्डे येथील एक युवती अचानकपणे त्या ठिकाणी येऊन... सर ,माझं एक तुमच्याकडे काम आहे ...अस मंत्री महोदयांना म्हणाली...बोला काय काम आहे, अस मंत्र्यांनी विचारले...त्यावर ती युवती म्हणाली... माझ्या भावाला पैसे देऊन एका सावकारी करणाऱ्याने त्याला फसवंले आहे .पैसे देऊन काही वर्षाच्या करारावर आमची जमीन संबंधित सावकाराने आपल्या ताब्यात घेतली आहे...एवढं ऐकूनच नामदार साहेबांना विषयाची खोली आणि गांभीर्य एका सेकंदात लक्षात आलं ... लगेचच त्यांनी त्या युवतीकडून त्या सावकाराचे गाव, बँकग्राउंड, तो काय करतो , याची माहिती जागेवरच घेऊन पोलिसांना तिथूनच फोन लावला...हॅलो, शम्भूराज बोलतो...सावकारीचा विषय आहे...स्ट्रॉंग ऍक्शन घ्या...आणि परत माझ्या पर्यंत हा विषय येऊ देऊ नका... तक्रारदार गरीब महिला आहे आणि ती माझ्याकडे तक्रार घेऊन आली आहे...स्ट्रॉंग ऍक्शन घ्या...  तिथल्या तिथंच अस सांगून मंत्री महोदयांनी त्यांच्या कामाची चुणूक ऑन द स्पॉट तिथं उपस्थित सर्वानाच दाखवून दिली...
साखर कारखान्याची निवडणूक असो,किंवा विधान सभेची... नामदार देसाई हमखास पाटणकरांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि पाटणकर जनता त्यांना सलग मोठ्या मताने निवडूनही देते असे पाटण भागातील गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने चित्र पहावयास मिळत आहे... तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर पक्षाच्या प्रवक्ता पदाची जबाबदारी दिली आहे, टी व्ही वर सातत्याने शम्भूराज देसाई सेनेची बाजू मांडताना दिसत असतात. सध्याच्या राज्यातील सरकारमध्ये ठाकरेंचे विश्वासू तसेच अभ्यासू  म्हणून त्यांच्याकडे राज्यातील महत्वाच्या अनेक खात्यांची मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उत्कृष्ठ संसदपटू म्हणूनही त्यांना संबोधले जाते.आणि या सगळ्यांचे कारण म्हणजे त्यांच्या कामाची सडेतोड अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक असणारी पद्धती...मागील भाजप-सेना सरकारच्या काळात त्यांच्या मतदार संघात त्यांनी सर्वाधिक कामे केली. ,डोंगरी भागासाठी मोठा निधी खेचून आणण्यात त्यांनी राज्यात बाजी मारली.आणि त्या परिसरातील विकास साधण्यासाठी मोठे प्रयत्न
केले. हे आजही पाटणकरांच्या लक्षात आहे ...त्यांच्या कामाची तळमळ, पद्धत ग्राउंड वरच्या कार्यकर्त्याला देखील आपलीशी वाटावी अशी नेहमीच असते. त्यांच्याशी कधीही बोलले तरी असे कधीच वाटत नाही की आपण एखाद्या चेअरमन,आमदार,किंवा नामदाराशी बोलतोय...एवढी आपुलकी किंवा साधेपणा त्यांच्या बोलण्या वागण्यात कायमच दिसतो आणि...असतोही. जो एखाद्या गाव पातळीवरच्या लोकल पुढाऱ्यात दिसणेही अवघड असते, हे त्यांचे वेगळेपण व  वैशिष्ठय मानवेच लागेल.आता तिसरी पिढी लोकसेवेत असताना जनतेत मिसळून लोकांना आपलं समजून लोकसेवा करणारे शंभूराज देसाई यांच्यासारखा लोकांनी ठरवलेला लोकनेता किमान या जिल्ह्यात तरी दुर्मिळच... ते आमदार किंवा मंत्री आहेत या पेक्षा ते आपले आहेत,,,इथं आपलं काम होणारच...ही खात्री लोकांच्या मनात त्यांच्या बद्दल आपुलकीचे घर निर्माण करून देणारी नेहमीच असते...असे हे व्यक्तिमत्व लोकनेत्याचा वारसा जपत जनसेवेत यशस्वी पुढे जात आहे...त्यासाठी  लोकसेवेला पूजा मानून त्यातूनच स्वतः ला त्यांनी अक्षरशः वाहून घेतल्याचे त्यांच्या एकूणच सार्वजनिक काम करण्याच्या तडफडीने दिसून येतंय. याचा प्रत्यय म्हणूनच, या युवतीचा विषय अचानकपणे समोर आला असतानाही तो आपल्या मतदारसंघातला किंवा आपल्या मतदारांचा आहे, नाही...हे अजिबात न पाहता  ऐनवेळी  तो इतक्या जबाबदारीने व आपुलकीने हाताळला व पोलिसांना या प्रश्नी स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला सांगून त्या पीडित युवतीला on the spot न्याय दिला, किंबहुना देण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांना असणारी लोकसेवेची तळमळ,तडफड दिसून आली व समाजकारणात ब्राईट फ्युचर असणारे नामदार शम्भूराज देसाई हे पाटणकर जनतेच्या गळ्यातील ताईत का बनले आहेत?...हे या अचानक घडलेल्या घटनेने सिद्ध आणि उघडही केले.

Tuesday, March 17, 2020

डांगे यांनी आमच्या पार्टीची वाट लावली ; पार्टी कोण चालवतय तेच कळेना... उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

कराड
येथील पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी आमच्या पार्टीची अक्षरशः वाट लावली. आमचे एकमेकाचे फोन रेकॉर्डिंग करून याचे त्याला ऐकवायचे प्रकार करून लावलाव्या केल्या, पार्टीचा सगळं इस्कुट केला. आता यापुढं आमचं काय जुळत नाय.आता निवडणुकीला राहिलंय वर्ष, दिडवर्ष,आम्हाला काय फरक पडत नाय.आमची काम  व्यवस्थित चालू आहेत. अशा शब्दात उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत डांगे यांच्यावर तोंडसुख घेत पालिकेतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केल व आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, 80 लाखाचा खर्च डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये टेंडर शिवाय केला, त्याचे टेंडर नंतर काढलं तेव्हा आम्हाला या भानगडीबद्दल समजले.पहिले मुख्याधिकारी जसे हिटलर होते त्यांचाच कित्ता हे गिरवत आहेत.पालिका सध्या डांगेच चालवत आहेत असच दिसतंय.
मी उपनगराध्यक्ष असून मला कोणत्याही मिटींगला ऐन वेळी फोन करून बोलावले जाते.मध्ये व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या मीटिंग चा मला निरोपच नव्हता,अशी आमच्या पार्टी अंतर्गत अवस्था व्हायला डांगेच जबाबदार आहेत. त्यांनी आमच्यात गैरसमज पसरवले.
त्यांचं पहिल्या वर्षी शहरासाठी दीलेलं योगदान चांगलंच होत.आम्ही सगळ्यांनी त्यावेळी त्यांचं कौतुकच केलं .देशात पहिला नंबर येण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील लोकांनीही मोठा सहभाग नोंदवलाही होता. मात्र आत्ता शहरातील अतिक्रमण त्यांनी ज्या पद्धतीने काढली आणि गावच,व्यापाऱ्यांच नुकसान झालं त्याच आम्ही समर्थन करत नाही.आम्ही वाहतुकीस अडथळा येणारे रस्त्यातील अतिक्रमण काढण्याबाबत पालिका म्हणून त्यांना परवानगी दिली होती पण त्यांनी शहरातील अतिक्रमण नावाखाली गावचे पुरते नुकसान केलं.असेही जयवंत पाटील म्हणाले.
 दरम्यान बारा डबरी परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या घरकुलची अवस्था दैनिय झाली आहे.काही दिवसांपूर्वीच बांधलेल्या या संकुलाची अवस्था एवढ्यात अशी का होते? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Friday, March 13, 2020

मुख्याधिकारी शहरातील राजकारणाला खतपाणी घालत आहेत ? शहरात चर्चा सुरू...


(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
कराड-
येथील पालिकेचे आरोग्य सभापती नगरसेवक महेश कांबळे हे येत्या सोमवार पासून आपले उपोषण सुरू करणार आहेत.मुख्याधिकाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून सांगूनही शहरातील बारा डबरी परिसरातील पालिकेने बांधलेल्या घरकुल परिसरातील स्वच्छता अद्याप करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी दुर्गंधीच प्रमाण एवढं वाढलं आहे की,तिथे आता रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे,तरीही सी. ओ. याकडे कानाडोळा करत असल्याने या भागातील नगरसेवक महेश कांबळे येत्या सोमवारपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रकाराना सांगितलं. दरम्यान सी. ओ. डांगे शहरातील राजकारणाला यातून खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर यानिमित्ताने होत आहे.काल शुक्रवार दि.13 रोजी अतिक्रमण विषयी झालेली सभा सी. ओ. यांनी होऊ नये यासाठी प्रयत्न केले अशी चर्चा झाली. ही सभा नगरसेवकांच्या "कोरम' अभावी होणार नाही असे अगोदरच सांगून सदर सभेला नगरसेवकांची संख्या आवश्यक तेवढी भरणार नाही असं त्यानी पत्रकारांना सभेपूर्वीच सुचवले होते याचे पत्रकारांना आश्चर्य वाटले.म्हणजे डांगे हे सत्ताधारी गटाचे पुढारी आहेत की मुख्याधिकारी?अशी शंका सर्वानाच आली.दरम्यान याच सभेला पालिका अधिकाऱ्यांनी हजर रहायचे नाही असा डांगे यांनी "स्टाफ' अंतर्गत "फतवा' काढलेला कागद यावेळी पत्रकारांना मिळाला.  या सर्व गोष्टींना राजकीय हस्तक्षेप नाही म्हणायच तर काय म्हणायचं ?अशी शहरातून विचारणा होते आहे. त्यांच्याकडून अशा चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या  कामाच्या निमित्ताने  सम्पूर्ण गावाकडून ते आता शिव्याच्या लाखोल्या खाऊ लागल्याचं चित्र आहे.
यशवंत डांगे हे कराड शहरातील कार्यक्षम सी.ओ. असल्याची चर्चा काही दिवसापर्यंत होती.मात्र,येथील अतिक्रमण मोहिमेने त्यांना बदनाम केले.त्यांचं खर स्वरूप लोकांसमोर आलं. त्यांनी ही मोहीम राबवली त्याबद्दल लोक त्यांना नाव ठेवत नाहीत, मात्र ती मोहीम त्यांनी ज्या पद्धतीने चालवली त्याची निंदा,निषेध शहरातून सुरू आहे.एवढ्या घाणेरड्या पद्धतीने कामकाज करून सगळ्या गावाचे एकप्रकारे नुकसान व वाटोळं करणारा मुख्याधिकारी म्हणून त्यांची शहरात आता नवी ओळख बनली आहे अशी  टीका काही नगरसेवकांकडून होत आहे.
शहरातील व्यापारी,लहान लहान व्यावसायिक हातावर पोट असणाऱ्या अनेकांना अतिक्रमण नावाखाली त्यांनी अक्षरशः उपासमारी पर्यंत नेऊन ठेवलंय अशीही चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील धेंडांची अतिक्रमणे अद्याप त्यांनी काढली नाहीत यामुळे त्यांना शहरातून रोज लोकांच्या रोशास तोंड द्यावे  लागत असल्याचेही चित्र आहे.एवढा बदनाम सी. ओ. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इथे पाहीला असेही इथले व्यापारी त्यांच्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे सध्या डांगे म्हणजे एखाद्या चित्रपटातील व्हिलन असल्या प्रमाणे चुकीच्या पद्धतीच्या कामकाज करण्याने बदनाम झाले आहेत असे चित्र आहे व चर्चाही...
व्यापाऱ्यांचे त्यांनी अतिक्रमण नावाखाली केलेलं नुकसान,या मोहिमेत केलेला दुजाभाव शहरातून चर्चेत असतानाच,त्यांचा दुसरा एक प्रकार आता चर्चेत आहे. येथील बारा डबरी परिसरात पालिकेनेच बांधलेल्या गरिबांसाठीच्या घरकुल परिसरातुन अनेक महिन्यापासून असणाऱ्या घाणीच्या साम्राज्याला तिथे तसेच मुद्दाम ठेवत तेथील लोकांना जाणूनबुजून रोगराईच्या खाईत येथील सी. ओ. यांनीच ढकलले आहे अशी त्या ठिकाणचे लोक चर्चा करत आहेत. तेथील नगरसेवक महेश कांबळे यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की ,डांगे याना याठिकाणचे घाणीचे वाढते साम्राज्य काढण्यासाठी वारंवार सांगितले तरीही त्यांनी ऐकले नाही.आता इथं इतकी घाण वाढली आहे की येथे साठणारा मैला लोकांच्या घराजवळून वाहतोय,दुर्गंधी पसरतेय,रोगराई वाढते आहे,आणि याची कल्पना देऊनही सी. ओ. डांगे इकडे लक्षच देत नाहीत तर निष्ठुरपणे वागत आहेत.राजकारण करण्याला खतपाणी घालत आहेत. यासाठी आपण येथील लोकांना न्याय मिळावा म्हणून येत्या सोमवारपासून उपोषण करणार आहोत.याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना भेटून तक्रार देखील आपण करणार आहोत असेही ते म्हणाले. दरम्यान ,एवढे होऊनही डांगे,येथील बारा डबरी परिसरातील प्रश्नी लक्ष न घालता पालिकेतील सत्तारूढ गटातील अंतर्गत असलेल्या गटबाजीला एकप्रकारे खतपाणीच घालत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू  झाली आहे. यातून त्यांचा शहरातील राजकारणातील हस्तक्षेप दिसतो असेही बोलले जात आहे.एकूणच,  चुकीच्या चाललेल्या व शहराचे नुकसान करणाऱ्या  डांगे यांच्या कामाच्या पद्धतीच्या चर्चेमुळे तसेच, राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या कारणाने कराडकरांच्या कौतुकास पात्र ठरलेले एकेकाळचे हेच डांगे सध्या मात्र कराडकराच्या रोशास तोंड देत लोकांच्या शिव्या शाप खाताना दिसत आहेत.

Thursday, March 12, 2020

पालिकेची आजची "अतिक्रमण ' विशेष सभा डांगेना होऊ द्यायची नव्हती ? कारण काय ? शहरात चर्चा...

(अजिंक्य गोवेकर यांजकडून)

कराड

येथील पालिकेची आज शुक्रवार दिनांक 13 रोजी सायंकाळी पाच वाजता होणारी विशेष सभा येथील पालिका मुख्याधिकारी डांगे यांनी न होऊ देण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केला खरा ?,मात्र नगरसेवक आण्णा पावसकर, नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्यासह नगरसेवक फारुख पटवेकर व सर्व सहकाऱ्यांनी तो हाणून पाडल्याचे समजते. ही विशेष सभा आज  संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. शहरातील अतिक्रमणे,व हॉकर्सच्या शहरातील असणाऱ्या प्रश्नांवर ही सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान ही सभा न होऊ देण्यामागचा मुख्याधिकाऱ्यांचा हेतू अद्याप स्पष्ट होत नसला,तरी या अतिक्रमण मोहिमेतून झालेल्या नुकसानीला आपणच जबाबदार असल्याच्या ठपक्याच्या बदनामीला टाळण्यासाठी मुख्याधिकारी ही सभा होऊ न देण्याच्या पवित्र्यात होते का ? अशी चर्चा पालिकेत  ऐकायला मिळाली.
काही दिवसांपूर्वीच येथील मुख्याधिकारी डांगे यांनी शहरातील असणारे अतिक्रमण काढण्याचं काम हातात घेतलं. या मोहिमेला कोणाचाच विरोध नव्हता.नाही. पण ती ज्या पद्धतीने ती राबवण्यात आली,त्या पद्धतीला शहरातून मोठा विरोध झाला.आजही आहे. कोणालाही कसलीही नोटीस किंवा अगोदर कायदेशीर कल्पना न देता येथील मुख्याधिकार्यांनी येथील मुख्य ररस्त्यावर असणारी व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढायला सुरुवात केली.त्यावेळी येथील बाजार पेठेतील याच व्यापाराच्या दुकानाचे लाखो रुपयांच्या फलकांचे तोडून,फोडून प्रशासनाकडून नुकसान करण्यात आले. कोणाचे हजारात तर कोणाचं लाखात याबाबत नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. येथील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या असल्या कारभाराविरोधात शहरातून मोर्चा काढला.पोलिसांना निवेदन दिले.हे घडत असताना मुख्याधिकारी शहरातील खोकी,टपऱ्या, हातगाडी आशा अतिक्रमनावर
 हातोडा फिरवून शहरातील अतिक्रमणे झपाझप काढत पुढे  चालले होते, दुसरीकडे शहरातील काही सहकारी बँकांच्या मालकीच्या असणाऱ्या येथील  बझार ची अतिक्रमणे, तसेच काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे डांगे यांनी तशीच ठेवली अशा  चर्चा त्यावेळी होऊ लागल्या होत्या. मुख्याधिकार्यांच्या असल्या दुजाभाव करणाऱ्या या मोहिमेविरोधात त्यावेळी शहरातून मोठा विरोधही झाला होता. आजही आहे. त्यामुळे व्यापारी व लहान व्यावसायिक यांच्याकडून मुख्याधिकार्यांनी केलेल्या या पार्सलेटीमुळे डांगेच्या नावाची त्यावेळी  छि,,, थू,,, होताना दिसली. अक्षरशः त्यांच्या नावाने शहरातून शिव्यांच्या लाखोंल्या वाहिल्या गेलेल्या देखील ऐकायला मिळाल्या. आपल्या नावाने सम्पूर्ण शहर खडे फोडतय हे माहीत असलेल्या डांगे यांनी याच विषयावर आज सभा बोलावण्यासंदर्भात ,ती कायद्यात बसत नाही असं सांगत ती होऊच न देण्याचा प्रयत्न केला? मात्र नगरसेवक विनायक पावसकर यांनी तुमच्या बोलावलेल्या सभा कायदेशीर आणि आम्ही बोलावल्या की त्या कायद्यात कशा बसत नाहीत?असा सवाल करत कायद्याने ही सभा होऊ शकते हे दाखवून दिले, तरीही ही सभा झाली नाही तर आपण पालिकेसमोर उपोषण करणार व पत्रकार परिषद घेऊन या विषयी शहराशी बोलणार असा पवित्रा घेतला तेव्हा हा विषय सभा घेण्यावर संपला?? असे पालिकेतून समजते. ही सभा होऊ नये व जर झाली तर दुसरे दिवशी सभेतून होणाऱ्या आपल्यावरच्या आरोपाच्या प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या आपली बदनामी करू शकतात? त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून बदनाम झालेल्या या अतिक्रमण मोहिमेच्या अपयशाच खापर आपल्या टाळक्यावर फुटेल? असा विचार करून  ही सभा मुख्याधिकाऱ्यांना होऊच द्यायची नव्हती ?  मात्र आता ती होणार असल्याने ही सभा सम्पूर्ण जिल्ह्यात गाजणार अशी चर्चा आहे. तसेच या अतिक्रमण मोहिमेतील झालेल्या अनेक भानगडी  आता या निमित्ताने शहरासमोर येणार अशी शक्यताही वर्तवली जात आहे.याची कल्पना स्वतः डांगे यांनाही आहे? म्हणून ही सभा न व्हावी यासाठी सगळे प्रयत्न त्यांनी करून बघितले?? मात्र नगरसेवक आण्णा पावसकर,फारुख पटवेकर,नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी हा विषय लावून धरल्याने ही सभा होत असल्याचं पालिकेतून समजते.

Saturday, March 7, 2020

मी एकतर्फी प्रेम करत नाही .....डॉ.इंद्रजित मोहितेनी अविनाश मोहितेना चुचकारले...

कराड

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते,लोकनेते राजारामबापू पाटील,जेष्ठ विचारवंत रफिक झकेरीया यांचे सध्या जन्म शताब्दी वर्ष आहे.त्या निमित्ताने या सर्वांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण व्हावे म्हणून,येत्या  11 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई येथील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या नेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे,जेष्ठ पत्रकार कुमार केतकर,मधुकर भावे,व सनदी अधिकारी श्री,गोडबोले या वेळी आपले विचार मांडून या दिवंगत नेत्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणार आहेत. विधान सभा व  विधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.,अशी माहिती कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.इंद्रजित मोहिते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच,जेष्ठ नेते शरद पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अनेक आजी, माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.दरम्यान होणाऱ्या  कृष्णा कारखान्याच्या निवडनूक पटलावर अविनाश मोहितेबरोबर एकत्र येण्याबाबत "मी एकतर्फी प्रेम करत नाही'असे सांगत भविष्यात अविनाश मोहितेंनी तयारी दाखवल्यास आपण एकत्र येऊ शकतो असे त्यांनी यावेळी संकेतही दिले.

दरम्यान ते पुढे म्हणाले,राज्याच्या सुव्यवस्थित बांधणीसाठी यशवंतराव मोहितेंसह या चारही दिवंगत लोकनेत्यांचं योगदान फारच मोठं आहे.यांनी बहुजन लोकांना केंद्रबिंदू मानून त्या काळात केलेलं काम आजही राज्याच्या पटलावर आदर्शवत म्हणूनच आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज समाज कारण होण्याची गरज आहे.आम्हाला या गौरव सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभलं म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आहे.जुन्या  जाणत्या या नेत्यांचा गौरव  सोहळा आयोजित केल्याने सध्याच्या सरकारची वाटचाल योग्य चालु आहे असच म्हणावे लागेल  असही ते म्हणाले.

कृष्णा कारखान्याची निवडणूक शासनाच्या धोरणानुसार पुढे ढकलली गेली असली तरी,आम्ही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत.भाऊंच्या विचारांची बांधिलकी मानणारा कोणीही,आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं या निवडणुकीसाठी आम्ही आमच्या बाजूने स्वागत करणार आहोत. पक्षविरहीत आणि शेतकरी हाच पक्ष म्हणून आम्ही सर्व समावेशक अशी या निवडणुकीसाठी बांधणी करून उतरणार आहोत.आजही कारखाना भाऊंच्या विचाराने चालतो आहे.उभा राहिला आहे म्हणूनच शेतकऱ्यांना चांगले दिवस आज पहायला मिळत आहेत.भाऊंच्या विचारांने चालणारा सहकार शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.सहकार हा राजकारणाचा मुख्य कणा मानला गेला आहे.त्यामुळे साखर कारखानदारी वजा करून राज्याचं राजकारण व सहकार क्षेत्र अपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं.

कृष्णेच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार हा सत्ताधाऱ्याकडून सभासदांच्या हिताचा केला गेला नाही,तर तो शेतकऱ्यांची फसवणूक करणारा होता.दर्जेदार नव्हता.खासगी कारखाने सहकाराला धोकादायक ठरू पाहत आहेत,त्यामुळे भविष्यात सहकार क्षेत्राला त्याचे आव्हान असेल. त्याचे असणारे तंत्रज्ञान, कामगार भरती प्रक्रिया, व आधुनिकता सहकारी कारखान्यापेक्षा सरस असल्याने सहकार प्रक्रिया टिकवण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने आहे.
मी या पूर्वीच्या कृष्णेच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आवर्जून जात होतो,मात्र जेव्हा पासून लोकशाहीला मारक अशी या सभेची पद्धती सुरू झाली तेव्हा पासून तिथे जात नाही.खोट्या केसेस करणे,जाळ्या लावणे, बॅरिगेट्स ने अडआडवी करणें अशा पद्धती ने आता या सभा होत असल्याने आपण त्या ठिकाणी जात नसल्याचं मोहिते यांनी सांगितले.

भाऊंच्या गौरवसोहळ्याला आम्ही कुटुंबीय जाणार आहोत, असे इंद्रजित मोहिते म्हणाले त्यावेळी एक कुटुंब म्हणून तुम्ही भोसले कुटुंबियांना या सोहळ्या मध्ये आमंत्रित करून सामील करून घेणार का अस यावेळी विचारले असता,भाऊंच्या जन्म शताब्दी कार्यक्रमाला भोसलेंना मी बोलावले असता ते बोलावून आले नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम शासनाने आयोजित केला आहे आणि भोसलेंना बोलवायचं का नाही हे शासन ठरवेल.....असही मोहिते यावेळी म्हणाले.....




Thursday, March 5, 2020

मुख्याधिकारी शहराची दिशाभूल करत आहेत ? कराडात चर्चा सुरू...!!

कराड
येथील अतिक्रमण काढून शहरातील लोकांना वाहतुकीला अडथळा येऊ नये हा प्रमुख हेतू ठेवून शहरात अतिक्रमण मोहीम सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी नुकतेच काल वर्तमानपत्रातून व्यापाऱ्यांना सूचना करणारे एक प्रसिद्धीपत्रक काढले,पण शहरात अतिक्रमण बाबतीत इतकं रामायण झाल्यावर हे पत्रक आत्ता का काढलं ?ते काढण्यामाग नेमकी गेम काय असावी? या विषयी शहरात अनेक चर्चा सुरू आहेत.

काल काही दैनिकामधून पालिकेने जाहीर प्रसिद्धीकरणांच्या  नावाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकान चा बोर्ड करायचा असेल तर पालिकेकडून ना हरकत दाखला घेणे गरजेचे आहे. पायऱ्या बांधताना गटार स्वच्छतेसाठी मोकळी जागा सोडणेचे आहे.
खरतर  झालेल्या अतिक्रमण मोहिमेत या नियमांचे उलनघन करणाऱ्यांवर कारवाई झाली.पण ज्या प्रमाणे आत्ता प्रसिद्धीपत्रकातून व्यापाऱ्यांना येथील c o नि ह्या सूचना दिल्या, त्या प्रमाणे अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी का दिल्या नाहीत ..... हाच प्रश्न आहे...तसे केले असते तर व्यापाऱ्यांना मोर्चा काढावा लागला नसता... तसेच शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे झालेले नुकसान वाचले असते...
आता व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पवितऱ्यात असल्याचे समजल्याने याच व्यापाऱ्यांना आता सगळं रामायण झाल्यावर उगीचच नव्याने मलमपट्टी करून त्यांना गोंजारण्यासाठी हा नोटीसीचा नवीन फंडा हुडकून काढला आहे ? अशी शहराला शंका आहे. तर c o च्या असल्या कारभाराविरोधात पालिकेत विशेष सभा होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे सावध झालेल्या c o नी या चर्चेतून स्वतःला वाचवण्यासाठी ही नोटीस वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याची नवी आयडिया काढली आहे का ? की जेणेकरून या विषयावरच पडदा पडेल?कारण या पत्रकामुळे शहरात परत मोहीम सुरू होणार?की नाही?या चर्चेने वेग घेतला असल्याने, या चर्चेत शहराला नुसतच गोल गोल फिरवत वेळ घालवला जाईल? आणि मग ही मोहीम कालांतराने आपोआपच थांबेल व मोठी,मोठी राहिलेली शहरातील अतिक्रमणे वाचवण्यासाठी या निमित्ताने हा केलेला  खटाटोप शेवटी यशस्वी होईल ?अशीही चर्चा आता सुरू आहे.त्यामुळे अशा अनेक चर्चेचे वादळ या प्रसिद्ध झालेल्या निवेदनाने शहरात घोंगावत आहे.म्हणून नेमकं हे निवेदन  काढून त्यातून मुख्याधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे? हेच शहराला व व्यापाऱ्यांना कळण आता गरजेच आहे....
 येथील नेते आनंदा लादे यांनी शहरातील अतिक्रमणे काढताना दुजाभाव करण्यात आला या  कारणाने काल येथे  उपोषण सुरू केले होते. तिथे जाऊन मुख्याधिकारी यांनी लादेना 15 दिवसात शहरातील धेंडांची अतिक्रमण काढणार अशा भाषेत आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले.आता जर विचार केला,,,तर 15 दिवसच का?,,, आत्ताच 4 दिवस मोहीम बंद आहे तर लोक हळूहळू विसरू लागले आहेत, मग 15 दिवसांनी हा विषय शांत होऊन त्याचे गांभीर्य संपून जाईल आणि मग मुख्याधिकाऱ्यांना जे हवं आहे ते आपोआपच घडवून आणण्याचा प्रयत्न होईल...? अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.अशी चर्चा आहे. म्हणजे सगळंच कस प्लॅनिंग करून चाललंय इतपत हे जाणवल्याशिवाय राहत नाही.....
तर दुसरीकडे,शहरातील व्यापाऱ्यांना जेव्हा नोटीस किंवा निवेदन द्यायला पाहिजे होत,तेव्हा दिल गेलं नाही.आणि आता सगळं उजाड आणि भकास गाव करून ही नोटीस देऊन काय उपयोग? हे बारक्या पोराला पण कळतंय...मग, ही नोटीस, निवेदन किंवा सूचना व्यापाऱ्यांसाठी वर्तमानपत्रातून आत्ताच प्रसिद्ध करण्यामागची  नेमकी गेम काय आहे ? हे शहराला आता कळलंच पाहिजे अशी या निमित्ताने चर्चा आहे.

Wednesday, March 4, 2020

कराडच्या राजकीय नेत्यांची अतिक्रमणे असतील तर ती काढा; अन्यथा हायकोर्टात धाव घेणार...गोरख शिंदें

कराड
शहरातील अतिक्रमणे काढण्याचं काम हे खरच कौतुकास्पद आहे.प्रशासनाला याकामी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.मात्र नगरसेवक विनायक पावसकर यांनी या अतिक्रमण मोहिमेबद्दल आता अचानक हस्तक्षेप करण सुरू केलं आहे,
ते त्यांनी थांबवाव.पावस्करांचे शहराच्या विकासासाठी आज पर्यंत काय योगदान आहे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान शहरातील काही राजकीय नेत्यांनी अतिक्रमणे जर असतील तर ती अद्याप का काढली नाहीत,  प्रशासनाने ती काढून घेतली पाहिजेत अन्यथा आपण हाय कोर्टात या प्रश्नी धाव घेणार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमे बद्दल आपली भूमिका मांडताना ते आज येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले,ही मोहीम खरच कौतुकास्पद आहे. शहर स्वच्छ झाले पाहिजे अशी सर्वांचीच भूमिका असली पाहिजे.त्या करीता प्रशासनाला आपण सहकार्य केले पाहिजे. मात्र ज्याच्यावर अन्याय झाला त्यांच्या बाजूने एकही लोकप्रतिनिधी आला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.सध्या नगरसेवक विनायक पावसकर जे या प्रकरणी हस्तक्षेप करत आहेत तो केवळ त्यांच्या राजकीय हेतू पोटी आहे. ही मोहीम चालू असताना त्यांनी का हस्तक्षेप केला नाही?.याचवेळी नेमके ते बाहेर गावी का निघून गेले?आणि आता ते याविषयी राजकारण करत आहेत.त्यांचे शहरातील विकासासाठी योगदान काय?असा सवालही त्यांनी यावेळी केला.
इतरांना एक नियम आणि राजकारण्यांना एक नियम असा दुजाभाव  खरंच होत असेल तर आपण या विषयी हाय कोर्टात धाव घेणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या पाच ते सहा दिवसापासून शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे.ही मोहीम सुरू असल्या पासून वादाच्या भोवऱ्यात आहे.खरतर सगळीकडे या मोहिमेचे कौतुक होत असताना काही ठिकाणी ती राबवताना त्यामध्ये दुजाभाव झाल्याची भावना शहरातून व्यक्त होते आहे.त्यामुळे वादाच्या पिंजऱ्यात शहराचे मुख्याधिकारी डांगे अडकल्याचे चित्र आहे. मोहीम राबवताना येथील व्यापाऱ्यांच झालेलं नुकसान व त्यामुळं व्यापाऱ्यांनी काढलेला शहरातील मोर्चाने शहरातील या मोहीम प्रक्रिया राबवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.एकीकडे असे असताना दुसरीकडे काही सहकारी बँकांच्या मालकीचे बझार,तसेच  शहरातील काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे जर असतील तर अद्याप त्याच्यावर कारवाई का नाही ? अशी चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम आजही तितकीच चर्चेत आहे. मात्र,अनेक तर्क वितर्कनी गाजलेली ही मोहीम सध्या दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे आणि त्यामागचं कारण काय?याच्याही चर्चा ने सध्या जोर धरला आहे. याच कारणाने येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली याबाबत असलेली भूमिका स्पष्ट केली व प्रशासनाला सर्वांना समान न्याय देण्याबाबत इशारा देत लोकांनाही या मोहिमेस सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.मात्र ते करताना त्यांनी शहरातील काही राजकारण्यांचे असलेले अतिक्रमण पालिकेने काढले पाहिजे अशी भूमिका घेतली अन्यथा आपण या प्रश्नावर न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





Sunday, March 1, 2020

कराडात...जे. सी. बी. च्या दहशतीची चर्चा .....!!

कराड-
(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
आज रविवार, सुट्टीचा दिवस.आणि त्याचमुळे आज अतिक्रमण मोहीमेलाही सुट्टी. पण गेली चार दिवस अतिक्रमण मोहीम शहरात मोठ्या जोमाने चालू असल्यानं आजही ही मोहीम कुठे सुरू आहे का? अशी धास्ती सध्या लोकांमध्ये आहे.कोणत्याही गाडीचा आवाज ऐकला तर अतिक्रमण काढण्यासाठी वापरण्यात आलेला जे.सी. बी. आला की काय ?अशी भीती वाटून लोक घर अथवा दुकान बाहेर येऊन  jcb आला तर नाही ना ? याची खात्री करताना दिसत आहेत.त्यामुळे सध्या  त्याच जे. सी. बी. ची लोकांच्यात दहशत निर्माण झाली आहे...

गेली चार दिवस शहरातील अतिक्रमणे हटाव मोहीम पालिकेच्या व येथील पोलिसांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.शहरातील प्रमुख मार्गावरील बहुतेक अतिक्रमणे पालिका प्रशासनाने काढली आहेत.काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणची अतिक्रमणे ही वादाच्या भोवऱ्यातून सलामतपणे बाहेर निघाली असल्याचे आत्तापर्यंतचे चित्र आहे.येथील व्यापाऱ्यांचा मोठा रोष या मोहिमेवर आहे.आमचे मोठे नुकसान पालिकेने केल्याचा आरोप त्यांच्याकडून सध्या होताना दिसतोय.व्यापाऱ्यांच्या दुकानवरील फलकांचे, कोणाचे हजारात तर कोणाचे लाखात नुकसान झाल्याचे हे व्यापारी सांगत आहेत. अगोदर जरी सांगितले असते तरी आम्ही तुम्हाला आमची अतिक्रमणे काढून सहकार्य केले असत असा व्यापाऱ्यांनाचा पवित्रा आहे.त्यांचे झालेले नुकसान भरून मिळावे म्हणून त्यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेतली.शहरातून मोर्चा काढला.निवेदने दिली.या सगळ्या बाबी घडून झाल्यानंतर ही मोहीम आज सुट्टीच्या कारणाने थंड आहे.तरी लोकांना शहरातून फिरताना भकास झालेले रस्ते, बोडकी दुकाने,निराश व्यापारी,व हतबल झालेले किरकोळ व्यापारी पाहून नैराश्याच्या गर्तेत शहर बेवारसासारखं एकाकी उदास होऊन जगाच्या नकाशावरून एका कोपऱ्यात फेकलं गेलं आहे की काय अस वाटावं आशा परिस्थितीत सध्या दिसत आहे. एखाद्या ठिकाणची दहशतीच्या सावटाखालील वातावरणाची मानसिकता काय असू शकते हे सहज समजाव इतपत शहरातील व्यावहारिक वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येतंय...
अनेक अतिक्रमणे शेड स्वरूपात,तर अनेक पक्की बांधकामे स्वरूपात पहायला मिळाली.त्यात कोणाचीच गय केली गेली नाही.एखादं,दुसर अतिक्रमण वशीलेबाजीच्या नावाखाली चर्चेत आल... मात्र बहुतेक सरसकट काढली गेली आणि तीही कोणत्याही अडचनिशिवाय...
अर्थातच jcb च्या साहाय्याने...
आणि म्हणूनच आज जरी या मोहिमेला सुट्टी असली तरी एखादं वाहन जोरात आवाज करत आलं तरी jcb आला की काय अशी धास्ती वाटून आजही अनेकजण पळत येऊन ...jcb आला नाही ना?...याची खात्री करताना दिसत आहेत......
याला म्हणायच जे सी बी ची दहशत...अशी शहरात चर्चा आहे.