वेध माझा ऑनलाईन।
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र काल (29 जून) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केल्यानंतर तातडीने उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.
पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाने एकजूट दाखवली. त्याच्या दबावामुळेच सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली. हा मराठी एकजुटीचा विजय असून, 5 जुलै रोजी होणार विरोधाचा मोर्चा आता विजयी मोर्चा निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. मराठी माणूस एकत्र न येण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. पण, मराठी माणसांच्या एकजुटीची शक्ती पाहून सरकारने माघार घेतली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं ते वाक्य...
उद्धव ठाकरेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एका वाक्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. संकट आल्यावर पुन्हा जागे व्हायचे असे नको म्हणून ही एकजूट कायम राहावी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सर्व नेते पक्षभेद विसरून एकत्र आले होते, तेव्हा तो डाव उधळला आणि आताही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मनसेशी मोर्चापलिकडे युती ठेवण्याचे संकेतही दिले आहेत.
No comments:
Post a Comment