शहरात शिंदेमळा परिसरात हॉलिस्टिक हिलींग सेंटर सुरू असून या सेंटरचे मालक राजेश शिंदे यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. त्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सेंटरमध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून बेकायदेशीर सेंटरवर चार दिवसात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
याप्रकरणी कारवाईसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी चार दिवसात कारवाई करतो, असे सांगितले आहे. त्यामुळे गुरूवारचे आंदोलन स्थगित केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई न केल्यास पुढील महिन्यात आंदोलन करणार असल्याचे संकेत आनंदराव लादे यांनी दिले आहेत.
स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणार्या राजेश शिंदे याच्यावर दोन महिन्यापूर्वी परप्रांतातील मित्राला हाताशी धरून एका डॉक्टर महिलेसह दोन महिला व दोन नागरिकांचा परस्परसंबंध असल्याचा व्हिडीओ बनवून घेतला असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आनंदराव लादे यांनी पत्रकार परिषद घेत राजेश शिंदे याच्यावर गंभीर आरोप केले.
आनंदराव लादे म्हणाले, सन 2017 साली सोशल मीडियावर एका महिलेच्या नावाने अकाऊंट सुरू करून आपला फोटो अपलोड करत बदनामी करण्यात आली होती. याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याप्रकरणी अनुसूचित जाती कायद्यांतर्गत राजेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच हॉलिस्टिक हिलिंग सेंटरला किलेशन थेरपीसाठी इंडियन मेडिकल कौन्सीलची परवानगी आहे का, याची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी. या सेंटरमधील डॉक्टरांनी विशेष अभ्यासाची प्रमाणपत्र व त्याची शिक्षणाची पदवी घेतली आहे का? याचाही तपाास करावा. हे सेंटर बेकायदेशीर असल्याचा दावा करत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी आनंदराव लादे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment