वेध माझा ऑनलाईन
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं राज ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पादरम्यान राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर त्याच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला. त्यानंतर ही सक्ती मागे घेतली गेल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला. तब्बल 20 वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झाली.
आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बघू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवला. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्यामागून हालचाल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
No comments:
Post a Comment