महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करत शिवराज मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शिवराज मोरे हे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले तरुण नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दोन वेळा यशस्वी कार्य केले असून, युवक काँग्रेसमध्येही सरचिटणीस आणि उपाध्यक्षपदी निवडणुकीतून निवड होऊन जबाबदारी पार पाडली आहे. युवक काँग्रेसच्या मागील निवडणुकीत त्यांना राज्यभरातून दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मते मिळाली होती. ही बाब त्यांच्या नेतृत्व क्षमतेचा व कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काचा स्पष्ट पुरावा मानली जात आहे.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवराज मोरे यांनी सामाजिक जाणिवा आणि संघटन कौशल्याच्या जोरावर युवकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी राज्यभर युवकांचे संघटन मजबूत करत युवक काँग्रेसची गती वाढवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण राज्यातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना शिवराज मोरे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. ही केवळ पदाची नव्हे, तर जबाबदारीची संधी आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार युवकांची नवी पिढी घडविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसचे कार्य गावोगावी पोहोचवणे हे माझे उद्दिष्ट राहील.”
मोरे पुढे म्हणाले, “आज काँग्रेस पक्ष संघर्षाच्या काळातून जात आहे. या कठीण काळात पक्षाला बळ देणे, नव्या उमेदवारांना संधी देणे, आणि सामान्य युवकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवणे, यासाठी मी स्वतः झटणार आहे. हे केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आंदोलन आहे.”
शिवराज मोरे यांच्या या नियुक्तीचे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांसह विविध सामाजिक संस्थांनी देखील त्यांच्या निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment