Friday, August 29, 2025

भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना ...

वेध माझा ऑनलाइन
आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळत असून गावोगावी आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे. गणपती भक्तीत घरोघरी, गावोगावी आनंद उत्साह असताना पती-पत्नीच्या वादात झालेला शेवट सर्वांना हळहळ करणारा आहे. 
जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनपुर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता 3-4 दिवसांपुर्वी पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला आली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथेही या पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले. ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे, गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

No comments:

Post a Comment