Tuesday, November 3, 2026

पालकमंत्री शंभूराज देसाई पहिल्यांदाच जिल्हा बँकेचे संचालक झाले ; तब्बल 45 वर्षांनी झाली देसाई कुटुंबियांची बँकेत एन्ट्री ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने बॅंकेवर आपला झेंडा रोवला असून महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. शंभूराज देसाई यांच्या रूपाने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कुटुंबातील सदस्याची ४५ वर्षांनी बॅंकेत एन्ट्री झाली आहे. त्यांचे साडू ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे देखील विजयी झाले आहेत. तिरंगी लढतीत माणमधून मंत्री जयकुमार गोरे यांनी बाजी मारली.

पाटण आणि कराड तालुका सोसायटी मतदार संघात शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु, या निवडणुकीत दोघांनीही पराभवाचे उट्टे काढत बॅंकेत दिमाखात एन्ट्री केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पहिल्यांदाच जिल्हा बँकेचे संचालक झाले आहेत. त्यांनी आपले पारंपरिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. देसाईंना 58 आणि पाटणकरांना 46 मते मिळाली. उदयसिंह पाटील यांनी 100 मते मिळवत धनंजय पाटील (44) यांच्यावर मोठ्या फरकाने मात केली. देसाई आणि उंडाळकर हे एकमेकांचे साडू आहेत.

No comments:

Post a Comment