Monday, November 2, 2026

पी . डी. पाटील साहेबांचा आर्थिक शिस्तीचा सल्ला आजही स्मरणात! शंभूराज देसाईंचा जुन्या आठवणींना उजाळा; बाळासाहेब पाटील यांच्या कामाचेही केले कौतुक ; राजकीय पक्ष वेगळे असले तरी आम्ही जुने सहकारी; कराडच्या विकासासाठी सध्या एकत्र काम करतोय : मंत्री देसाई

वेध माझा ऑनलाईन।
सहकार क्षेत्रात काम करताना आर्थिक शिस्त किती महत्त्वाची असते, याचा मोलाचा सल्ला ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील साहेबांनी मला दिला होता. त्यांच्या त्या मार्गदर्शनाची आजही आठवण होते. शिवाजीराव देसाई यांनी काटकसरीने साखर कारखाना चालवला. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन तुम्हीही कारखाना चालवा, असे पी. डी. पाटील साहेबांनी मला त्यावेळी सांगितले होते, अशी जुनी आठवण राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितली. तसेच, बाळासाहेब पाटील हे देखील पी. डी. पाटील साहेबांच्या विचारांचा वारसा जपत चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कराड नगरपालिकेच्या नवीन पंपिंग स्टेशन क्रमांक १ च्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मंत्री शंभूराज देसाई कराडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सहकार क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा देतानाच बाळासाहेब पाटील यांच्याविषयीही आदर व्यक्त केला.

देसाई म्हणाले, मी बाळासाहेब पाटील यांच्याआधी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. आदरणीय पी. डी. पाटील साहेबांच्या काळात मलाही आमच्या कारखान्याचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी साहेबांना भेटण्यासाठी मी मंगळवार पेठेतील त्यांच्या जुन्या घरी जात असे. अशाच एका भेटीत त्यांनी मला कारखान्याच्या आर्थिक शिस्तीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला होता. कारखानदारीमध्ये आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असते. शिवाजीराव देसाई यांनी काटकसरीने कारखाना चालवला. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन तुम्हीही काम करा, असे त्यांनी मला सांगितले होते. हा सल्ला माझ्यासाठी मोलाचा ठरला, असे देसाई यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई जिल्ह्यात चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई यांनीही बाळासाहेब पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली.

ते म्हणाले, बाळासाहेब पाटील यांनी माझ्या कामाचे कौतुक केले, याचा आनंद वाटला. आम्ही दोघेही जुने सहकारी आहोत. यापूर्वी एकत्र काम केले आहे. आमचे राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी सध्या कराड नगरपालिकेत आम्ही विकासाच्या कामासाठी एकत्र काम करत आहोत. बाळासाहेब पाटील हे माझे जुने सहकारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे बाळासाहेब पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले, तर दुसरीकडे देसाई यांनी बाळासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या या स्तुतिसुमनांमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. विशेषतः राजकीय पक्ष वेगळे असतानाही कराडच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची दोन्ही नेत्यांची भूमिका आणि त्यांच्या जुन्या सहकार्याच्या आठवणी यांचीच पत्रकारांमध्ये बराच वेळ चर्चा रंगली होती.

No comments:

Post a Comment