Monday, July 4, 2022

मी पुन्हा येतो म्हटलं होतं...मी पुन्हा आलोय...मी शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा ; उपमुख्यमंत्री फडणवीस...

वेध माझा ऑनलाइन - शिंदे सरकारने अखेर बहुमत चाचणी पास केली आहे. 164 आमदारांची मत मिळवत शिंदे सरकारवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, त्यावर माझी खूप टिंगळ टवाळी केली. पण मी आता आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे' आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली.

शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी ते बोलत होते त्यावेळी त्यांनी शिंदेंचं कौतुकही केलं.

'एकनाथ शिंदे यांचे सरकार आता आले आहे. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे. एकनाथ शिंदे हे रसायन वेगळे आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.'मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं, मी सगळ्यांचा आता बदला घेणार आणि बदला असा आहे की मी त्यांना माफ केले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. आम्ही विरोधी बाकावर होतो पण कधी विचलित झालो नाही. कोरोनाच्या काळातही जनतेमध्ये राहिलो. काही लोक हे आम्हाला म्हणतात की सत्तेसाठी आम्ही आहोत. पण, सामाजिक काम करण्यासाठी सत्ता हवी आहे. पर्यायी सरकार देणार असं म्हटलो होतो. आता नरेंद्र मोदी यांनी ते दाखवून दिले आहे. ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारलं. आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

Sunday, July 3, 2022

बहुमत जिंकले ; आता राज्यात शिंदेशाही...शिंदे- फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब...

वेध माझा ऑनलाइन -  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद पटकावले. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध  केले आहे. शिंदे सरकारने बहुमताचा 144 चा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. तर 3 आमदार हे तटस्थ राहिले होते. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप यांना सभागृहामध्ये येता आले आहे. सभागृहाची दार बंद झाल्यामुळे पाच नेत्यांना येता आले नाही. त्यामुळे हे पाचही नेते मतदानाला मुकले.

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील ; शिंदे समर्थक गटातील शिवसेना आमदारांची संख्या आता ४०...

वेध माझा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. 
हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा संतोष बांगर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिंदे गटासोबत येण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. 

संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिंदे समर्थक गटातील शिवसेना आमदारांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, याच संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आपण कायमस्वरुपी उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी उभं राहणार असल्याचं सांगत मतदार संघात जाऊन जोरदार भाषण केलं होतं. तसंच मतदार संघातील शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना परतण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी ते भावूकही झाले होते.

मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल ; आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत ; संजय राऊत यांचे विधान

वेध माझा ऑनलाइन -  शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक दावा केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीनं सुरु राहील. मात्र मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केलीय. 106 आमदार असतानाही दुय्यम भूमिका त्यांनी घेतली आहे. अशी व्यवस्था 2019 ला केली असती तर महाविकास आघाडीच झाली नसती. त्यावेळीही आम्हाला डावललं. त्यांचा हेतू शिवसेनेला फोडणं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं असाच आहे, असं राऊत म्हणाले. भाजपला विश्वास असता की हे सरकार चालेल तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.

सत्ता गेली पण त्यांचा माज गेला नाही, जातीयवाद त्यांच्या मनात रुजलाय ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांची टीका...

वेध माझा ऑनलाइन - विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकर यांच्या आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी "आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं" असं विधान केलं होतं. 
त्यानंतर हे विधान अनावधानाने आल्याचे  त्यांनी सांगितले. दरम्यान सत्ता गेली पण माज जात नाही" असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केलं आहे "आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही" अशी घणाघाती टीका पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. 

जयंत पाटील यांनी झिरवळ यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. " दरम्यान, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांची ही चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, जयंत पाटील यांनी, आपलं हे विधान अनावधानाने आलं असून आपला तसा हेतू नव्हता, असे म्हटले आहे. तसेच, हे विधान रेकॉर्डवर घेऊ नये, अशी विनंतीही विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यामुळे, आता या गोष्टीवर पडदा पडला आहे. पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुनही यासंदर्भात माहिती दिली आहे

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच असतील ; उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

वेध माझा ऑनलाइन - रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील. विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 
शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. असं पत्र विधानमंडळ सचिवानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. 


शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार

वेध माझा ऑनलाइन -  राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे.

 राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. 
आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की,  राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा. 

विरोधी पक्षनेते पदी अजित पवार ?
विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.