कराड दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी इंदिरा गांधींच्या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही त्यांनी टीकेची झोड उठवली.
सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी "गुंगी गुडिया" असे संबोधले जात होते. हा काही अपमानास्पद शब्द नाही. त्याचे राजकारण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट करत, "त्या गुंगी गुडिया नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपण लढवय्या आहोत, दुर्गा आहोत, झाशीची राणी आहोत हे सिद्ध करावे," अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आल्याबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले की, "ज्यांना खरोखर जोडे मारायला हवेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत यांच्यात नाही. सत्तेची झुल पांघरून स्वतःला वाघ समजणाऱ्यांनी आधी ती झुल काढावी, मग ते वाघ आहेत की कोल्हे, हे जनतेला दिसेल."
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असूनही त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, अशी भावना व्यक्त करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करत त्यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. "त्या काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याची संधी देऊ," असे वक्तव्यही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. मात्र, त्यासाठी आधी दिल्लीतील दोन गुजराती नेत्यांना हटवावे लागेल, तेव्हा खरा आनंद होईल," असे म्हणत त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला.
विजय वडेट्टीवार यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment