वेध माझा ऑनलाईन।एखादी महिला राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसने नेहमीच राजकारणाची पातळी सांभाळली आहे. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. इंदिराजींप्रमाणे सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरील 'गुंगी गुडिया' पोस्टवरून राजकीय वातावरण तापले. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला 'जोडे मारो' आंदोलन केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पत्रकारांना कधीही सामोरे गेलेले नाहीत. ‘५० करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा' किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलची त्यांची वक्तव्ये जगजाहीर आहेत. पण, काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने राजकारणाची पातळी सोडलेली नाही. राम मनोहर लोहियांनी इंदिराजींबद्दल जो शब्द प्रयोग केला होता. त्याला इंदिराजींनी कृतीतून उत्तर दिले होते. सुनेत्रा पवार या देखील सक्रिय राजकारणात कार्यरत असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल पातळी सोडून बोलणे योग्य नाही. त्या देखील कृतीने उत्तर देतील, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
बीडमधील कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'गुंगी गुडिया' अशी टिप्पणी करण्यात आली होती.
दरम्यान, सुनेत्रा पवारांशी संबंधित पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आरोप आणि आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
No comments:
Post a Comment