Tuesday, August 2, 2022

भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता ; गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी;

वेध माझा ऑनलाइन - अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अल-कायदाशी संबंधित संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारणपणे जेव्हा-जेव्हा अल-कायदाचा नवीन उत्तराधिकारी आपली जागा सांभळतो. त्यानंतर अल-कायदाने विविध ठिकाणी हल्ले घडवून आणल्याचे याआधी दिसून आले. 
लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला
२०११ साली ओसामा बिन लादेन याची हत्या करण्यात आली. त्यानंतरही दूतवासावर हल्ला करणं, विविध शहरांवर हल्ला करण्याचे प्रयत्न अल-कायदाकडून करण्यात आले. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतरही अशाच प्रकारचे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अल-कायदा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असते. त्यामुळे या संघटनेचे जे स्लिपरसेल्स आहेत, त्यांना सक्रिय करण्याचे आदेश अल-कायदा देऊ शकतं, अशी माहिती समोर येत आहे.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी मारला गेला ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - दहशतवादाविरुद्धच्या युद्धात जगाला आणखी एक यश मिळताना दिसत आहे. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी मारला गेल्याचं वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या खात्मानंतर याकडे मोठं यश म्हणून पाहिलं जात आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी जवाहिरीच्या मृत्यूची माहिती दिली. या दहशतवाद्यावर 25 मिलियन डॉलर इनाम होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात असल्याची नोंद आहे, ज्यात सुमारे 3000 लोकांचा मृत्यू झाला होता.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, अमेरिकेनं रविवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ड्रोन हल्ला केला. व्हाईट हाऊसमधून दिलेल्या आपल्या भाषणात बायडन म्हणाले, "आता न्याय झाला आहे आणि तो आता हा दहशतवादी नेता राहिलेला नाही."
अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांना खात्री पटली आहे की ठार झालेला व्यक्ती जवाहिरीच आहे . या हल्ल्यात इतर कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अलीकडेच जवाहिरीच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरल्या होत्या. हेदेखील सांगितलं जात होतं की तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. आता त्याच्या मृत्यूनंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे, की ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्याला आश्रय दिला होता का? वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितल की, तालिबान अधिकाऱ्यांना शहरात त्याच्या उपस्थितीची माहिती होती.

Monday, August 1, 2022

भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली जाहीर माफी...म्हणाले...राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला होता. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने हात वर केले होते. यावर राज्यपालांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. तरीही यावर समाधान न झाल्याने काही पक्षांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन सुरुच होतं. यावर आता पुन्हा एक राज्यपालांनी एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?
शुक्रवारी 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे.  विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे निवेदन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध केले आहे.

कोण आहेत स्वप्ना पाटकर ? की ज्यांच्यामुळे संजय राऊत अडचणीत आले आहेत...शिवीगाळ केल्याची क्लिप देखील झालीये व्हायरल .

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने अटक केली. त्याआधी रविवारी मुंबई पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका साक्षीदाराने केलेल्या तक्रारीवरून संजय राऊतांविरोधात एफआयआर दाखल केली. या साक्षीदार स्वप्ना पाटकर आहेत, ज्यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार आहेत, तसंच त्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आपल्याला धमकी मिळत असल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीमध्ये केला आहे. याआधी पत्रा चाळ प्रकरणात आपण राऊतांविरोधात ईडीला दिलेला जबाब बदलावा, यासाठीही धमकी देण्यात आल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी केला होता.

स्वप्ना पाटकर यांना एका टाईप केलेल्या पेपरमधून बलात्कार आणि हत्येची धमकी देण्यात आली होती. 15 जुलैला त्यांच्या घरी वृत्तपत्रातून धमकीचा कागद पाठवण्यात आला, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध आयपीसी धारा 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), 506 (धमकी देणं) आणि 509 (महिलेचा अपमान) ही कलमं लावून गुन्हा दाखल केला आहे. रविवारी स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. तसंच स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे


कोण आहेत स्वप्ना पाटकर?
स्वप्ना पाटकर या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जवळचे असलेले सुजीत पाटकर यांच्या पत्नी आहेत. स्वप्ना पाटकर यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती, यात संजय राऊत यांनी कथितरित्या स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. स्वप्ना पाटकर पत्रा चाळ प्रकरणी साक्षीदार आहे, ज्यामुळे संजय राऊत इडीच्या अटकेत आहेत. स्वप्ना पाटकर या चित्रपट निर्मात्या आणि मोटिवेशनल स्पीकरही आहेत. स्वप्ना पाटकर यांचा बाळकडू हा चित्रपट काही वर्षांपूर्वी रिलीज झाला होता.

2021 साली संजय राऊत यांनी आपल्याला शिव्या दिल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. तसंच संजय राऊत आपल्याला 8 वर्षांपासून त्रास देत असल्याचा दावाही पाटकर यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. जी ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात 70 सेकंदांमध्ये 27 वेळा शिव्या देण्यात आल्या आहेत. स्वप्ना पाटकर यांना मिळालेलं धमकीचं पत्र आणि ऑडियो क्लिपचा पुढचा तपास पोलीस करत आहेत.40 वर्षांच्या स्वप्ना पाटकर या मुंबईच्या सांताक्रुझमध्ये राहतात. स्वप्ना पाटकर या सायकोलॉजिस्ट असून त्यांचं मुंबईमध्ये क्लिनिक आहे. 2007 साली सामनाच्या कार्यालयात आपली आणि संजय राऊत यांची भेट झाल्याचं स्वप्ना पाटकर सांगतात
स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, '2007 साली आपली आणि संजय राऊत यांची भेट झाली, यानंतर कौटुंबिक संबंध वाढत गेले. संजय राऊत यांना आपण त्यांच्या बिजनेस पार्टनर व्हावं असं वाटत होतं, पण मी याला नकार दिला, त्यामुळे राऊत यांना राग आला.''20 नोव्हेंबर 2016 साली मी संजय राऊतांना भेटायला सामनाच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि ते माझ्यावर ओरडले. याला विरोध करताना मी संजय राऊत यांची कॉलर पकडली आणि तिकडून निघून गेले, त्यावेळी राऊत यांनी मला पोलिसांच्या कारवाईची धमकी दिली,' असं स्वप्ना पाटकर यांनी सांगितलं.स्वप्ना पाटकर या त्यांचा पती सुजीत पाटकर यांच्यापासून विभक्त झाल्या आहेत. संजय राऊत यांच्या जवळचे मानले जाणारे सुजीत पाटकर यांनी आपल्या पत्नीसाठी काही मालमत्ताही खरेदी केल्याचं ईडी तपासात समोर आलं आहे

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 49 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 4 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 1 सातारा 5 वाई 1 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 49 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सूनावली ईडी कोठडी ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन - संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. 9 तास रविवारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली गेली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आता दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले. तर, 2 वाजून 15 मिनिटांनी त्यांना कोर्ट रुम नंबर 16 मध्ये विशेष इडी न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. कोर्टाने आता संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे

ईडीचा युक्तीवाद - 
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत फक्त नावाला होते. हे सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले, असा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीने संजय राऊत यांची ८ दिवसांची ईडी कोठीच मागितली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे, असा दावाही ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला आहे.

संजय राऊत यांचे वकील अशोक मृंदरगी यांचा युक्तीवाद -
संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का कारवाई केली नाही. कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती, असा आरोप त्यांनी केला.
 स्वप्ना पाटकर या महिलेशी काही कारणाने वाद झाले होते. त्याचा धागा पकडत हे आरोप करण्यात आले आणि ही कारवाई करण्यात आली.
 वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले. जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बँक खात्याने घेतले असते का?
 घर घेतले असेल किंवा जमिन घेतली असेल सर्व पैसे कायदेशीर रित्या चुकते केले. ते पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले होते
संजय राऊत हे ईडी चौकशीला सहकार्य करत नाहीत हा आरोप खोटा आहे. जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावले तेव्हा तेव्हा ते चौकशीला गेले. पण गेल्या काही दिवसात चौकशीला बोलावले गेले, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा निवडणूक आणि इतर निवडणूका होत्या ज्याबाबत माहिती ईडीला दिली गेली होती

शिवसेनेचे नेते राजन विचारे यांचे स्व. आनंद दिघे याना लिहिलेलं एक पत्र झाले व्हायरल...विचारे म्हणतात...आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की घात झालाय… दिघेसाहेब घात झालाय… आणि हो, तोदेखील आपल्याच लोकांकडून… म्हणूनच आज तुमची आठवण येतेय...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात मोठी फूट पडली. जवळपास सर्व नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत. खासदार राजन विचारे आणि नगरसेविका असलेली त्यांची पत्नी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. रविवारी, राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह ठाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. 

त्यानंतर आज राजन विचारे यांचे स्व. आनंद दिघे याना लिहिलेलं भावनिक एक पत्र आज व्हायरल झाले आहे. राजन विचारे हे आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे या पत्रात त्यांनी भावनिक सादही घातली असल्याचे दिसत आहे. राजन विचारे यांनी या पत्रातून  आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.  ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद कदापिही पुसू देणार नाही. पुन्हा एकदा तुमचा शिवसैनिक या वादळातही पहाडासारखा उभा राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशी साद राजन विचारे यांनी पत्रातून घातली आहे. 

राजन विचारे यांनी पत्रात काय म्हटलंय ?

प्रति, 
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांस...

जय महाराष्ट्र साहेब...
साहेब, आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. पण असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. आज जरा जास्त आठवण येतेय...

वयाच्या सोळाव्या वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो. या सगळ्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात. अजूनही अंधारात वाट दाखवत सोबतच आहात. अगदी धगधगत्या दिव्यासारखे...

पण, साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे...तितका कधीच नव्हतो...कारण, आज एक घटना घडली आहे. ज्या घटनेमुळे फक्त शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणूस सध्या अस्वस्थ झाला आहे... आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की घात झाला… दिघेसाहेब घात झाला… आणि हो, तोदेखील आपल्याच लोकांकडून… म्हणूनच आज तुमची आठवण येतेय... 

शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब...
तेव्हा तुमची 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही.. साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता... 
महाराष्ट्राने ज्या ठाण्याने  आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली. आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय...छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब...या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना साहेब? आज हे दुसऱ्यांदा झालंय...फक्त तुम्ही सोबत नाही. मग यांना माफ तरी कसं करायचं आम्ही...तुम्ही असता तर काय केलं असतं? म्हणून आज तुमची आठवण येतेयं...

आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही...आज काही जणांचं तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून जरा गहिवरून येतंय साहेब...तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होत आहेत... पण रडायचं नाही, लढायचं...हा विचार पुढं घेऊन जाणारी संघटना आहे आपली...साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला...म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब...

पण साहेब काळजी नसावी...कोणत्याही पदापेक्षा पिंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना, पक्ष महत्त्वाचा आहे. तुमची हीच शिकवण सोबत घेऊन आम्ही मानाने मिरवत पुढे जाऊ. साहेब काळजी नसावी. तुमचा राजन आणि सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी...कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्यासोबत...साहेब...आम्ही जिवाची बाजी लावू पण पण ‘शिवसेनेचे ठाणे…ठाण्याची शिवसेना... हे ब्रीद कदापि पुसू देणार नाही आम्ही...
पुन्हा एकदा शिवसैनिक या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे...कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या...
पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या.... आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...