Sunday, March 3, 2024

शिवीगाळ, चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली; पहिल्या यादीतून काढले बाहेर ; कोण आहेत ?

वेध माझा ऑनलाईन। लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना भाजपाने १६ राज्यातून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अनेक बदल केल्यामुळे ही यादी चांगलीच चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भोजपुरी गायक पवन सिंह यांना उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांनी आज अचानक माघार घेतली. तर दिल्लीच्या चांदणी चौक येथून माजी मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी आज थेट राजकारणातून निवृत्ती घेतली. फक्त डॉ. हर्षवर्धनच नाही तर इतरही अनेक नेत्यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. यामध्ये त्या खासदारांचाही समावेश आहे, ज्यांनी आपल्या कार्यकाळात भडकाऊ, चिथावणीखोर विधानं करून भाजपाला अडचणीत आणले होते.

भाजपाने पहिल्या यादीत काही प्रमुख खासदार जसे की, प्रज्ञा सिंह ठाकूर, रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा यांना तिकीट नाकारले आहे. तसेच जयंत सिन्हा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनाही उमेदवारी दिलेली नाही. मात्र जयंत सिन्हा आणि गौतम गंभीर यांनी यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली होती. प्रज्ञा सिंह, रमेश बिधुरी आणि परवेश वर्मा यांनी आपल्या कार्यकाळात संसदेत आणि संसदेबाहेर अनेकदा अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. भाजपाने यांना तिकीट नाकारून निवडणुकीच्या काळात जोखीम न उलण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. आरोपातून मुक्त झाल्यानंतर भाजपाने त्यांना निवडणुकीतून उतरवले होते, तेव्हाही भाजपावर जोरदार टीका झाली होती. गेल्या काही काळात त्यांच्या चिथावणीखोर विधानामुळे भाजपावर विरोधकांनी टीका केली होती. ठाकूर यांनी महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचे म्हटले होते. या विधानावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही आक्षेप घेतला होता.
माजी मुख्यमंत्री स्व. साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या परवेश सिंह वर्मा यांचे तिकीट कापल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवेश सिंह यांनीही अनेकदा वादग्रस्त विधानामुळे पक्षाला अडचणीत आणले होते. २०२० साली दिल्लीच्या शाहीन बाग येथे अल्पसंख्याक महिलांचे आंदोलन सुरू असताना परवेश सिंह वर्मा यांनी वादग्रस्त विधान केले होते. दिल्ली विधानसभेत भाजपाची सत्ता आल्यास आंदोलकांना एका तासात आंदोलनस्थळावरून हाकलून लावू, असे विधान त्यांनी केले होते.
दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. नव्या संसद भवनात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात रमेश बिधुरी यांनी बसपाचे तेव्हाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ही शिवीगाळ संसदेच्या थेट प्रक्षेपणातही ऐकू आली होती. सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसंगाचे गांभीर्य पाहून मध्यस्थी करत स्वतः माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

राज ठाकरे संतापले, पुण्यातून तडकाफडकी मुंबईला निघून गेले; काय घडलं ?काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आले होते. पण पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले. त्यामुळे या संतापाच्या भरातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. यावरून पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेण्यासाठी आले होते. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. दुपारी अडीच वाजताची बैठक होती. पण उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.

विभागप्रमुख आलेच नाही
राज ठाकरे येणार हे माहीत असतानाही विभागप्रमुख पक्ष कार्यालयात आले नाहीत. इतर नेतेही नव्हते. विभागप्रमुखांना फोनही लावण्यात आले. पण कुणीच वेळेत आलं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी अधिकवेळ वाट न पाहता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

संघटनेत गटबाजी
दरम्यान, पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले. राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या. पण त्यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पक्षातील धुसफूस कायमच राहिल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत आल्यावर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Saturday, March 2, 2024

एकमेकांच्या शेजारी उभं राहूनही... सुप्रिया सुळे, अजितदादांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही ; बारामतीकर आश्चर्यचकित ;

वेध माझा ऑनलाईन।  बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणं आणि भेटणं टाळलं. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात असं कधीच घडलं नव्हतं. बारामतीकरांनी मात्र हे चित्र पहिल्यांदाच पाहिलं. त्यावेळी अनेकांना आश्चर्यही वाटलं.

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे पाठून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली.

विजय शिवतारे यांचीही भेट घेतली. पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूसही केली नाही. किंवा भेटल्याही नाही. सुप्रिया यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. पण अजितदादांना भेटणं टाळलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे स्टेजवर असल्याचं अजितदादांनाही माहीत होतं. त्यांनीही सुप्रिया यांना भेटणं टाळलं. बारामतीकरांसाठी हे चित्र नवं होतं. हे चित्र पाहून बारामतीकरांनाही आश्चर्य वाटलं.

पहिल्या रांगेत सुनेत्रा पवार
यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसलेल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. एरव्ही कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा ; या प्रकरणाचा तपासच थांबवण्यात आल्याचे आले समोर ;

वेध माझा ऑनलाईन। शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात या प्रकरणासंदर्भात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असून यावर तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.

हे प्रकरण आहे काय ?
25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँकेचे घोटाळा प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सुत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यावधींचे कर्ज वाटले होते. मात्र या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे शिखर बँक घाईला आली. यामुळेच समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनी पाटील यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकांवरील सुनावणी सत्र न्यायालयात प्रलंबित असताना ‘ईओडब्ल्यू’ने अजित पवारांच्या विरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याचे निष्कर्ष काळात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर न्यायालयाने हा रिपोर्ट जमा करून घेत तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांना नोटीस बजावत याप्रकरणी आपली भूमिका मांडण्यास सांगितली आहे.

दरम्यान, 2015 साली अण्णा हजारे तसेच शालिनीताई पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारावर मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने राज्यातील विविध राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. यामध्येच अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण, यांचा समावेश होता. मात्र पुढे जाऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून या प्रकरणातून अजित पवार आणि इतर राजकीय नेत्यांची नावे वगळण्यात आली. यातीलच दुसरा क्लोजर रिपोर्ट 30 जानेवारी 2024 रोजी सादर करण्यात आला. यातील मधल्या काळात अजित पवार यांनी भाजप सरकारशी हात मिळवणी केली. त्यानंतर आता थेट या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आल्याचे समोर येत आहे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. 

भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एटा येथून राजवीर सिंह, अमेठी येथून स्मृती इरानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


“राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अंतिम चर्चा ही 29 मार्चला चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 195 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

विजय शिवतारे अजितदादांना बारामतीतच देणार धक्का ! काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत विजय शिवतारे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत ते अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत
विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.
त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी लोक ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशीच सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. 

जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार?
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत, या चर्चांवर विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या विजय शिवतारे हे पडद्यामागून काम करतात, अशी चर्चा आहे. याशिवाय शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साद घालण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीच्या चर्चा देखील आहेत. विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही अशी बारामती मतदारसंघातील नेत्यांची भूमिका असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

Friday, March 1, 2024

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमध्ये बाचाबाची, धक्काबुक्की ; धुसफूस आली समोर ;

वेध माझा ऑनलाईन। ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार भिडले आहेत.  भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचं बोलले जातेय. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यावरुन दादा भुसे यांना ही गोष्ट खटकली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. 

वादाचे नेमकं कारण काय ?   नेमकं घडलं काय?
अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज अखेरचा दिवस आहे. पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते.  पण त्याचवेळी दोन सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे काम सांगितलं होतं. ते काम दादा भुसे यांच्याकडून झालं नाही. यासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यामुळे दादा भुसे यांना राग अनावर झाला. महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणारं आहे, असे दादा भुसे यांना वाटलं. त्यामुळे दादा भुसे यांना राग आला. दोघांमध्ये पहिल्यांदा बाचाबाची झाली, त्याचं रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं. त्यावेळी उपस्थिती असणारे शंभुराजे देसाई आणि भरत गोगावले यांनी हा वाद मिटवला. पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. महेंद्र थोरवे यांच्यामते हे काम लवकर व्हायला पाहिजे होते. 

आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र ही जी वादावादी आहे, ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.