Tuesday, July 8, 2025

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची विधानसभेत शेतकऱ्यांसाठी जोरदार मागणी ; म्हणाले...सरकारने सहकारी पाणीपुरवठा योजनांना वीजबिल माफी देऊन अनुदान पुन्हा सुरु करावे; सरकारने वेळ दिल्यास याबाबतचे अभ्यासपूर्ण सादरीकरण आम्ही करू ;

वेध माझा ऑनलाईन
 राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजना सध्या संकटात सापडल्या आहेत. सरकारने १ एप्रिल २०२५ पासून या योजनांना दिले जाणारे ७५ टक्के अनुदान थांबवल्याने, ग्रामीण भागातील बागायती शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेऊन या सहकारी पाणीपुरवठा योजनांना वीजबिल माफी देऊन पुन्हा अनुदान सुरु करावे, अशी जोरदार मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. 

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना आ.डॉ. भोसले म्हणाले, १९६० ते १९९० या कालखंडात ग्रामीण भागात शेकडो पाणीपुरवठा योजना सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. त्या काळातील सामाजिक नेतृत्व, स्थानिक संघटनशक्ती आणि हजारो शेतकऱ्यांच्या श्रमातून या योजना साकार झाल्या. परंतु सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर टिकून असलेल्या या योजना आता आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

सध्या सरकारने ७.५ एच.पी.पर्यंतच्या कृषीपंपांसाठी वीजबिल माफीचा निर्णय घेतला आहे. परंतु अनेक सहकारी योजना १०० ते २५० एच.पी. क्षमतेच्या मोटरवर आधारित असल्याने त्या या लाभापासून वंचित आहेत. जरी एखाद्या योजनेत २५० एच.पी.ची मोटर असली, तरी ती योजना २००० शेतकऱ्यांची असते. त्यामुळे प्रत्यक्षात एका शेतकऱ्यावर केवळ ०.१२ एच.पी. इतकाच लोड येतो. या योजनांवर सध्या वीजबिलाचे मोठे ओझे आहे. त्यातच अनुदान बंद झाल्यामुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च करणे शक्य होत नाही. जुन्या योजनांमध्ये गळती, पंपांची कार्यक्षमता कमी होणे, वितरण यंत्रणेतील अडचणी यामुळे केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रालाच पाणी देता येते. त्यामुळे शासनाने या योजनांसाठीदेखील वीजबिल माफीचा निर्णय घेतल्यास, वाचवलेला निधी योजनांच्या  सुधारणांसाठी वापरता येईल. परिणामी जास्त क्षेत्र बागायतीत येईल आणि राज्यातील ऊस उत्पादनही वाढेल, असे आ.डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

आ.डॉ. भोसले पुढे म्हणाले, की एक टन उसावर सरकारला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून सुमारे ४११ रुपये महसूल मिळतो. जर पाणी योजना टिकली, तर शेती टिकेल आणि शेती टिकली, तर सरकारच्या तिजोरीतच भर पडेल. त्यामुळे ही योजना अनुदान किंवा माफी नव्हे, तर सरकारसाठीही गुंतवणूक आहे. या योजना व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी व्हाव्यात, यासाठी त्या कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची मागणीही आ.डॉ. भोसले यांनी केली. महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून या योजना वर्ग केल्यास, त्यांची देखभाल, अंमलबजावणी आणि कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी सांगितले.


अतुलबाबा विधानसभेत म्हणाले...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की सरकारने वेळ दिल्यास याबाबतचे अभ्यासपूर्ण सादरीकरण आम्ही करू, ज्यातून सिद्ध होईल की वीजबिल माफ करूनही राज्याच्या तिजोरीवर भार पडणार नाही, उलट महसूलवाढीचा मार्गच खुला होईल. ठिबक सिंचन, सोलर फिडर यांसारख्या योजनांवर सरकार भर देत आहे, हे चांगले आहे. पण सामूहिक पाणीपुरवठा योजनांकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार राजेंद्रसिंह यादव यांचा निर्धार ;

वेध माझा ऑनलाईन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवली अनेक सुख सुविधांचा लाभ गोरगरीब गरजूंना दिला त्यामुळे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व सर्वसामान्य माणसाला भावलं त्यामुळे अनेक जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत येणाऱ्या भावी काळात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक  जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील त्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होईल असा आत्मविश्वास शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांनी व्यक्त केला तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येईल तसेच कराड उत्तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल अशाप्रकारचा आत्मविश्वास कराड उत्तरचे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांनी व्यक्त केला

यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेकानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला पालकमंत्री शंभूराजे देसाई संपर्कप्रमुख शरद कणसे कराड उत्तर चे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश करण्यात आला
यावेळी सर्वांचे आभार महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष सुलोचना पवार यांनी मानले गुलाबराव पवार यांनी प्रास्ताविक केले

कृष्णा हॉस्पिटलतर्फे राबविण्यात आली ‘आरोग्य वारी’ ; सदर उपक्रमांतर्गत हजारो वारकऱ्यांनी घेतला वैद्यकीय सेवेचा लाभ ;

वेध माझा ऑनलाईन
येथील कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली २४ वर्षे अव्याहतपणे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी मार्गावर सुमारे १० हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार देण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा जनसागर पंढरपूरकडे जात आहे. या अध्यात्मिक यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने गेली २४ वर्षे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जात आहे. 
दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथील वारीमार्गावर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, माणगंगा कारखाना, एनकूळ, कणसेवाडी, झरे, सुपली आणि पंढरपूर याठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाकडून मोफत आरोग्य तपासणी करुन, औषधे देण्यात आली. यावेळी पायी चालण्यामुळे वारकऱ्यांना होणारे स्नायू विकार, ताप, थकवा, डोकेदुखी, पायांची सूज अशा तक्रारींसाठी तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच गरजेनुसार औषधे, मलमपट्टी व फिजिओथेरपी सुविधादेखील मोफत देण्यात आली. 
या आरोग्य वारी उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात कृष्णा हॉस्पिटलचे कॅम्प सुपरवायझर सुनील यादव, डॉ. प्रद्युम्न पोवाळकर, डॉ. निखिल पटेल, डॉ. महेश देशमुख, डॉ. अथर्व रायकर, डॉ. मयूर धामणीकर, संध्या मोरे, भाग्यश्री शिर्के, इंद्रजीत हणबर, गणपत नलवडे, शोभा दलबारे, दीपाली येडगे, रिमा मोहिते आदींसह वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 


Monday, July 7, 2025

इनरव्हील क्लब ऑफ कराडचा 36 वा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

वेध माझा ऑनलाईन।
इनरव्हील क्लब ऑफ कराडचा  2025 - 26 मधील नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नूतन अध्यक्षपदाचा कार्यभार आदिती पावसकर यांनी स्विकारला. तसेच उपाध्यक्षपदी ऋता चाफेकर ,आय पी पी नम्रता कंटक, सेक्रेटरी श्रावणी घळसासी, ट्रेझरर सीमा पाटील, आय एस ओ राजश्री रामदुर्गकर, एडिटर वैष्णवी कुंभार ,सीसी नीता सपकाळ ,सी एल सी सी संगीता पालकर व सी पी सी सी सीमा पुरोहित तसेच एक्झिक्यूटिव्ह  कमिटी मध्ये लक्ष्मी सिकची, अलका गोखले, पद्मजा इंगळे,  शितल शहा यांची निवड करण्यात आली. 

याप्रसंगी चार्टर प्रेसिडेंट रेखा काशीद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कराड क्लबच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.
ऋता चाफेकर ,नीता सपकाळ व रूपाली डांगे यांनी सूत्रसंचालन केले वैशाली पालकर यांनी नवोदित अध्यक्षा अदिती पावसकर यांची ओळख करून दिली.उपाध्यक्षा ऋता चाफेकर यांनी आभार मानले. 
याप्रसंगी कराड मधील रोटरी क्लब ऑफ कराड, इनर व्हील  क्लब ऑफ कराड संगम तसेच इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइजचे पदाधिकारी, इनरव्हील क्लब ऑफ कराडचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व सदस्यांचे कुटुंबीय
 उपस्थित होते.

Saturday, July 5, 2025

उद्या (गुरुवारी) साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव ; मोठ्या संख्येने भक्त- भाविकांनी उपस्थित रहावे- जयंत गुजर व समस्त गुजर कुटुंबियांच्या वतीने आवाहन -

वेध माझा ऑनलाईन
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरुवर्णिमा उत्सव  उद्या 10 जून रोजी (गुरुवारी) साजरा होणार असल्याची माहिती साईभक्त जयंत गुजर यांनी दिली सर्व भक्त-भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंत गुजर व समस्त गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम जुने कृष्णामाई कार्यालय येथे होणार आहे

उद्या गुरुवार दिनांक 10 रोजी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी श्रींची आरती होणार आहे, 6 वाजता अभिषेक होईल, त्यानंतर  7 वाजता सत्यनारायण पूजा होईल, 9 वाजता श्री साई स्तवनमंजिरीचे वाचन होईल, 

दुपारी 12 वाजता माध्यान आरती होईल, त्यानंतर तिर्थप्रसादाचे वाटप होईल, 
12.30 वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल तसेच संध्याकाळी 6 वाजता धुपारती आणि रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे 

दुपारी 12.30 ते 4.30 या वेळेपर्यंत  महाप्रसादाचे वाटप होणार आहे.अशी माहिती देखील जयंत गुजर यांनी दिली आहे

तरी सर्व भक्त - भाविकांनी या भक्तिमय कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित रहावे व आरती आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंत गुजर व समस्त गुजर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे

ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत साजरा - राज आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली ; संपूर्ण महाराष्ट्र झाला भावुक ;

वेध माझा ऑनलाईन।
संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा  आज मुंबईत साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे  आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.

आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं ; राज ठाकरेंचा फडणवीसांवर थेट वार ;

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली. यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? कोणाला विचारायचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार. पण तुमच्या हातात सत्ता असेल तरी विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्रं लिहली. नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय, ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्रं कुठून आणलं? ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं. हायकोर्टात आणि इतर सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, मग त्रिभाषा सूत्राची गरज काय? दक्षिणेत  हे त्रिभाषा सूत्र नाही, मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. पण महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं, हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.