Friday, July 11, 2025

मुंबईत ठाकरे बंधूंचा दणका - अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम ; अमराठी व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद;

वेध माझा ऑनलाईन; राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक व राजकीय वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतला आहे. मनसेकडून बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आला.
मनसेच्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द, आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं.
मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला. 

कराडच्या सोमवार पेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहर पोलिसांनी येथील सोमवार पेठेत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाख रूपये किमतीचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने शुक्रवारी ही कारवाई केली.

श्रेयस गणेश शिंदे (वय 22, रा. सोमवार पेठ, कराड) व शाहिल सुतार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सोमवार पेठेतील एका घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सुरू केला. तपासादरम्यान श्रेयस शिंदे  व शाहिल सुतार या दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी  केलेला सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अशोक भापकर, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदळकर, पोलीस नाईक सुजन जाधव, अनिल जाधव, संदीप कुंभार, शिवाजी काटे, मोईनस मोमिन, दिग्विजय सांळुके, संग्राम पाटील, अमोल देशमुख, शैलेश साळुंके, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.

Tuesday, July 8, 2025

पुढील २४ तासांत कोयना धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता !

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. दिवसाला सरासरी २ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या धरणात ७१.०० टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी स्थितीत निर्माण झाली असून त्या अनुषंगाने आज पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देशी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या आवाहन करावे, अशा सूचना दिल्या कोयना धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. दरम्यान, धरणाची गेट लेव्हल ७३.५० टीएमसी आहे. अवघ्या २.५० टीएमसी अंतरावर ही मर्यादा गाठली जाणार असल्याने पुढील २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदारयाद्यांतील गैरप्रकार काँग्रेस रोखणार !!काँग्रेसची समिती गठित - समितीच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड ; निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली ; काँग्रेसचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन
मतदार याद्यांतील गैरप्रकार कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नुकतीच एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परीक्षित वीरेंद्र जगताप हे सदस्य आहेत, तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत. मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यावर आयोगाने समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहे.
निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली पण यापुढं असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील, यावर उपाय सूचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.

डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाईन।
शिक्षण, सहकार, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडतर्फे यंदाचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुवार (दि. 10) जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे होणाऱ्या ‘गुरुगौरव’ समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समूहाने प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय, नर्सिंग, औषध निर्माण, कृषी व पशुवैद्यकीय शिक्षणसंस्था उभारून ज्ञानप्रसारात महत्त्वाचे योगदान दिले आहे. करोना काळात त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

या गौरवसमारंभात अन्य नामांकित व्यक्ती आणि संस्था यांचाही सन्मान केला जाणार असून, खालील पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत:
विद्यारत्न पुरस्कार : रयत शिक्षण संस्था, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त) कराड, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद संकपाळ, कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह कराड, आदर्श शिक्षिका पुरस्कार : डॉ. स्नेहल मकरंद राजहंस, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार : सुषमा इंदुलकर, पी.के. सावंत माध्यमिक विद्यालय, अडरे (चिपळूण), आदर्श प्राचार्य पुरस्कार : डॉ. सतीश भिसे, निवृत्त प्राचार्य, औषध निर्माण महाविद्यालय कराड, उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार : प्रकाश पागनीस, प्रवचनकार व रंगकर्मी पुणे, उत्तम शिक्षक पुरस्कार : उदय कुंभार, टिळक हायस्कूल कराड,
उत्तम शिक्षक (प्राथमिक विभाग) पुरस्कार : ज्योती ननवरे, टिळक हायस्कूल कराड, उत्तम सेवक पुरस्कार : शारदा चव्हाण, शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम शाळा कराड, आदर्श विद्यार्थी पुरस्कार : सानिका रामचंद्र गरूड, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड, सेवाव्रती पुरस्कार : अशोक रंगराव पवार, निवृत्त अभियंता, कराड नगरपरिषद, विज्ञान शिक्षक पुरस्कार : जीवन थोरात, विज्ञान शिक्षक, टिळक हायस्कूल कराड यांना जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे आणि सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले आहे.

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर ; कराडमध्ये होणार पुरस्काराचे वितरण

वेध माझा ऑनलाइन।
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्यावतीने 2025 वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, नवनियुक्त अध्यक्ष राम दाभाडे, प्रमोद तोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले की, डॉ. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठी लोक बिरादरी प्रकल्प शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरू केले आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासींमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.

कोयना धरणात किती पाणीसाठा ? जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट ! कोयना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यासह सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. आज दिवसभरात पाटण तालुक्यात पावसाने कमी हजेरी लावली. कोयना धरणात 69.04 TMC इतका पाणीसाठा झाला असून धरण 65.60 टक्के भरलं आहे. पावसाची स्थिती पाहता हवामान विभागाने आज आणि उद्या सातारा जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’ दिलेला आहे. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी काल रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे दुसरे युनिट सुरू करून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला होता. दरम्यान, आज सरासरी प्रतिसेकंद 23 हजार 415 क्यूसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत होती.

परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. सध्या कोयना धरणातील पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2128’10” तर जलपातळी 648.868 मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयनेला 17 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला 24 आणि महाबळेश्वरला सर्वाधिक 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.