Sunday, July 17, 2022

आता खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार ; उद्यापासून महागाई सर्वांना रडवणार!

वेध माझा ऑनलाइन - आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना सामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. उद्या, 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. त्यामुळे महागाई आणखी रडवणार आहे. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे.  धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. शनिवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्याच्या परिणामी बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प होते. 


या गोष्टी महागणार 
पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. त्याशिवाय, बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून  18 टक्क्यांवर केली आहे.  सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. 

आरोग्यसेवा महागणार 
रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून  अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.  त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

शैक्षणिक वस्तू महागणार
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

Saturday, July 16, 2022

आजही कराड आणि साताऱ्यात सर्वाधिक रुग्ण...जिल्ह्याची कोरोना स्थिती पहा...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 45 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 32 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 9  खंडाळा 0 खटाव 7 कोरेगांव 6 माण 3 महाबळेश्वर 0 पाटण 2 फलटण 7 सातारा 11 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 45 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 32 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध

वेध माझा ऑनलाइन -  रेठरे बुद्रुक ता. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. 

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.

या प्रक्रियेत सर्वसाधारण गटातून अतुल सुरेशराव भोसले (रेठरे बुद्रुक), शिवाजी मुरारजी पाटील (बहे), शिवाजीराव बाबुराव थोरात (कालवडे), दामाजी महादेव मोरे (रेठरे हरणाक्ष), हर्षवर्धन मोहनराव मोहिते (बेलवडे बुद्रुक), प्रमोद मारुती पाटील (वाठार), प्रकाश बापूसो पाटील (आटके), गिरीश बाबुलाल शहा (कराड), रणजीत बाळासो लाड (शिरटे), प्रदीप राजाराम थोरात (नरसिंहपूर), नामदेव खाशेराव कदम (पेठ), विजय निवासराव जगताप (वडगाव हवेली), महिला राखीव गटातून सरिता सर्जेराव निकम (शेरे), सरिता महादेव पवार (कराड), अनुसूचित जाती-जमाती गटातून अनिल विष्णू बनसोडे (खुबी), इतर मागासवर्गीय गटातून संतोष दत्तात्रय पाटील (कासारशिरंबे), विमुक्त जाती - भटक्या जमाती - विशेष मागासप्रवर्गातून नारायण भीमराव शिंगाडे (शेणोली) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 
या निवडीबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. तसेच सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल नूतन संचालक मंडळाने सर्व सभासदांचे आभार मानले आहेत. 


Friday, July 15, 2022

औषध कंपनी ग्लेनमार्कने नेझल स्प्रेची केली निर्मिती ; कोरोना रुग्णाच्या नाकात हा स्प्रे मारल्यास 99 टक्के विषाणूचा नायनाट होत असल्याचे आले दिसून...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईतील औषध निर्मिती करणारी कंपनी ग्लेनमार्कने कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत मिळून नेझल स्प्रेची निर्मिती केली आहे. हा स्प्रे नाकात मारल्यानंतर  24 तासांमध्ये कोरोना रुग्णामधील व्हायरल लोड 94 टक्के कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. तर 48 तासांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव 99 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये या औषधाच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्यातील निकाल प्रकाशित करण्यात आला आहे.  

देशातील कोरोना लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या 306 वयोवृद्ध व्यक्तींवर या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या अँटी-कोविड स्प्रेची चाचणी करण्यात आली आहे. त्यावेळी हा स्प्रे खूपच फायदेशीर असल्याचे दिसून आले. 
मुंबईमधील औषध निर्माण करणारी कंपनी ग्लेनमार्कने नासल स्प्रेची चाचणी केली आहे. या कंपनीने देशातील कोरोनासाठीचा पहिला नेझल स्प्रे लान्च केला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या स्प्रेसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात आली होती. यानंतर आता हा स्प्रे लाँच करण्यात आला आहे.   

चाचणीमध्ये कोरोना रूग्णांच्या नाकात हा स्प्रे मारून सात दिवसांच्या उपचारांचे मूल्यमापन करण्यात आले. या सात दिवसांमध्ये रूग्णाच्या प्रत्येक  नाकपुडीत दोन वेळा हा स्प्रे मारण्यात आला. दररोज सहा वेळा हा स्प्रे रूग्णाच्या नाकात मारण्यात आला. त्यावेळी 24 तासांमध्ये 94 टक्के आणि 48 तासांमध्ये 99 टक्के विणाणूचा नायनाट होत असल्याचे दिसून आले.   डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या वाढीच्या काळात हा अभ्यास करण्यात आला. संशोधनात असे आढळून आले की NONS प्राप्त करणार्‍या उच्च-जोखीम असलेल्या रूग्णांमध्ये 24 तासांच्या आत व्हायरल लोडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

“भारतात या स्प्रेची किंमत 25 मिलीच्या बाटलीसाठी 850 रूपये असणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात ही किंमत खूपच कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या आठवड्यापासूनच हा स्प्रे मेडिकलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती  ग्लेनमार्क कंपनीतील क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख आणि सीनिअर व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. मोनिका टंडन यांनी दिली आहे

राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहिर झाल्यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निवडणुकांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. पूर आणि आपात्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 ककवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/  उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी सांस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असं सहकार विभागाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या निवडणुका शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करुन निवडणुका घेण्याबाबत कार्यवाही करावी, असंदेखील सहकार विभागाने म्हटलं आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले ; आज सातारा, फलटण,कोरेगाव येथे सर्वाधिक रुग्ण ; कराडातील रुग्णसंख्येत चढ, उतार सुरूच...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 60 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 102 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 5  खंडाळा 2 खटाव 4 कोरेगांव 14 माण 3 महाबळेश्वर 0 पाटण 2 फलटण 11 सातारा 14 वाई 4 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 60 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 102 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, July 14, 2022

मोठी बातमी: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित!

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे  सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे , नंदुरबार, जळगाव अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड , उस्मानाबाद, लातूर  अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.