Saturday, January 31, 2026

Breaking! सुनेत्रा पवार यांच्यावर क्रीडा युवक कल्याण व राज्य उत्पादन शुल्कखात्यांची जबाबदारी ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

अखेर सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ - सुनेत्रा पवार ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

वेध माझा ऑनलाइन।
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, राज्यपालांनी त्यांंना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
दरम्यान आज राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.


Breaking! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा ; सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड ;

वेध माझा ऑनलाइन।
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे, आज सायंकाळी त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. यानंतर आता सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अन्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यासाठी समर्थन दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आता सुनेत्रा पवार या गटनेता असलेल्या अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत.

शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत ; रोहित पवार यांची माहिती ;

राष्ट्रवादीच्या गोटात सध्या घडामोडी सुरू असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी म्हटलं होतं, दरम्यान शरद पवार यांच्या या विधानानंतर शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.अखेर या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला जाणार नाहीयेत, शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनी त्यापूर्वी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Friday, January 30, 2026

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, तर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ! शरद पवार म्हणाले...त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेाणार आहेत. यावर आता शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार तर राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागणार असल्याचे समजते सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली जात होती आणि तशा घडामोडींना वेगही आला. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाची 2 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या 5 वाजता शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि याकरिता भाजपा देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच उपमुख्यमंत्रीपदावरून हालचाली वाढताना दिसत आहेत. 
यादरम्यानच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना शरद पवार दिसले.
पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.
त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणीतीही चर्चा न करता मुलगा पार्थ पवार याच्यासोबत सुनेत्रा पवार रात्री उशिरा मुंबईत आल्या, शिवाय त्यांनी कोणतीही चर्चा शरद पवार यांच्यासोबत केली नाही, हे शरद पवार यांनी स्वत: सांगितले. यावरून आता विविध चर्चांना उधाण आलंय.

Big Breaking ! सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक जबाबदारी, पार्थ-जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्रीपदासह सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. त्या सोबतच अजित पवारांकडे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार आपल्याकडेच ठेवणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.

शरद पवार म्हणाले...सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला कोणतीही माहिती नाही ;

वेध माझा ऑनलाइन।
सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 'सुनेत्रा पवार शपथ घेतात किंवा नाहीत, हा त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत निर्णय आहे. याबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 'अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. अजित पवार सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. आज हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ांनी (शरद पवार गट) पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'अजित पवार गेल्यानं आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. लोकांना न्याय द्यायचं काम अजित पवार करत होते. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. त्यामुळे कर्तृत्वान नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे'. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. नरेश अरोरा यांच्यावर त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'नरेश अरोरा कोण? हेही मला माहिती नाही. तसेच 'सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, याची मला काहीच माहिती नाही. प्रफुल पटेल, सुनील तटकरे या लोकांनी निर्णय घेतला असावा. हा त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत निर्णय आहे', असं देखील शरद पवार यावेळी सांगितलं आहे.