Wednesday, September 2, 2026

कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक व्यवस्थेचा ‘खेळ’ कोणाच्या जीवावर? मुख्य क्रॉसिंग बंद, गरज नसलेला मार्ग खुला;सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व नगरसेवक दादा शिंगण यांचा आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
एकीकडे वाहतुकीच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था उभारली जात असताना, कराडच्या कोल्हापूर नाक्यावर मात्र वाहतूक नियोजनाचा सावळागोंधळ नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व मलकापुचे नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

कोल्हापूर नाका हा कराड-मलकापूरला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या मार्गावर विद्यार्थी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी वाहतुकीच्या दिशांमध्ये बदल करताना सुरक्षितता, वाहनांची संख्या, पादचारी व विद्यार्थ्यांची हालचाल आणि संभाव्य अपघातस्थळांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निर्णयामुळे हे सर्व निकष तपासले गेले आहेत का, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

P87-P88 बंद... मग P86-P87 का खुला आहे हाच मुख्य प्रश्न आहे एक महत्त्वाचा क्रॉसिंग बंद करण्याची गरज निर्माण झाली असेल, तर त्याच परिसरातील दुसरा क्रॉसिंग खुला ठेवण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न विचारत P87 ते P88 दरम्यानचा मुख्य क्रॉसिंग बंद झाल्यानंतर वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह बदलणार आहे. अशा परिस्थितीत P86 ते P87 दरम्यानचा खुला क्रॉसिंग वाहनचालकांसाठी संघर्षबिंदू ठरू शकतो, 
विशेषतः विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याठिकाणी गंभीर असल्याचे भोंगाळे व शिंगण यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

मलकापूर नगरपरिषदेने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी डी. पी. जैन कंपनीला मुख्य रस्ता बंद करण्याबाबत पत्र दिले होते. या पत्राचा आधार घेत सध्याचा मुख्य क्रॉसिंग बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, २०२४ आणि २०२६ या दोन वर्षांतील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला का?
वाहनांची संख्या वाढली आहे. नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विद्यार्थ्यांची ये-जा वाढली आहे. परिसरातील वाहतूक पद्धती बदलली आहे. मग दोन वर्षांपूर्वीच्या पत्राच्या आधारे आजचा वाहतूक निर्णय घेणे कितपत योग्य आहे? हाही प्रश्न  उपस्थित केला जात आहे.जुन्या पत्राचा संदर्भ देणे सोपे आहे; परंतु आजच्या परिस्थितीचा नव्याने वाहतूक अभ्यास करून निर्णय घेणे प्रशासनाचे कर्तव्य नाही का? असा सवाल भोंगाळे व दादा शिंगण यांनी यावेळी केला

इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य क्रॉसिंग बंद करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करण्यात आली होती का?या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अद्याप समोर आलेले नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
वाहतूक व्यवस्थेचा निर्णय काही मोजक्या कार्यालयीन कागदपत्रांपुरता मर्यादित राहणार असेल, तर रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचा विचार कोण करणार? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित केला गेला.

दादा शिंगण व सतीश भोंगाळे थेट पोलिसांच्या दारात

या संपूर्ण प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.उद्या अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा आजच उपाययोजना करा’अशी भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दुर्लक्ष झाल्यास आंदोलन...

या प्रश्नाबाबत NHAI अधिकारी तसेच अदाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने फेरआढावा घेऊन सुरक्षित पर्याय निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दादा शिंगण व सतीश भोंगाळे यांनी दिला आहे.


Tuesday, September 1, 2026

वेध- माझा च्या प्रश्नावर अतुल भोसलेंचा ‘बॉम्ब’; अतुलबाबा म्हणाले... तर...उदयसिह पाटलांना भाजपकडून लढावे लागेल...अतुल भोसलेंच्या या बोलण्याचा अर्थ काय? कराड तालुक्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच कराड दक्षिणेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारीच्या चर्चेला आता थेट पक्षीय समीकरणांचा तडका मिळाला असून, आमदार अतुल भोसले यांनी आज कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अतुल भोसले?
‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तुमचे आणि ॲड. उदयसिह पाटील यांचे नाव चर्चेत आहे ’ असे वेध- माझा कडून विचारण्यात आले असता डॉ अतुल भोसले यांनी अत्यंत सूचक उत्तर देत “भाजप स्वतंत्रपणे लढणार असेल, तर उदयसिह पाटील यांना भाजपमधून उभे राहून निवडणूक लढवावी लागेल. अन्यथा पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट केले. त्यांच्या या बोलण्यामागचा अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे...

अतुल भोसले यांच्या या विधानाने अनेक राजकीय अर्थ काढले जात असून, भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या चौकटीबाहेर जाऊन स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या ॲड. उदय पाटील यांना भाजपमधून निवडणूक लढवावी लागेल, असे अतुल भोसले यांनी स्पष्टपणे सांगितल्याने महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीच्या समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला आहे.

दरम्यान ॲड. उदयसिह पाटील हे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडमधील नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी स्वतः अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदय पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले पॅनेलला मदत केली होती. त्यानंतर या राजकीय सहकार्याच्या बदल्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऍड उदय पाटील यांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचीही राजकीय चर्चा रंगली होती.
मात्र आता अतुल भोसले यांनी उदय पाटील यांनी भाजपमधून निवडणूक लढवावी, असे सूचक विधान केल्याने आता पुढे काय होणार? हाच सवाल निर्माण झाला आहे

अतुल भोसले यांनी टाकलेला हा ‘बॉम्ब’ आता केवळ कराड दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, उदयसिह पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात आणि भाजप-राष्ट्रवादीतील स्थानिक समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जयकुमार गोरे, यांच्यानंतर आता अतुल भोसले यांचा ‘सिग्नल’?
काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती.
त्यातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही या राजकीय हालचालींवर भाष्य करत, “आम्ही तुम्हाला या निवडणुकीत तुमच्याबरोबर का चालत नाही, असे दोन्ही मंत्र्यांना विचारू; मग आम्हीही गप्प बसणार नाही,” असा इशारा दिला होता.
आता अतुल भोसले यांनी उदयसिह पाटील यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखी धार आली आहे.

वेध माझा ओनलाईन।
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा सध्या जोरदार सुरू असताना अतुल भोसले यांनी याबाबत एक बाँब टाकला आहे... तुम्ही आणि ऍड उदय पाटील यांच्या नावाची होणाऱ्या जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे या वेध-माझा च्या प्रश्नावर बोलताना आमदार अतुल भोसले यांनी हा बाँब टाकला आहे...

ते म्हणाले...या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असेल तर...उदय पाटील यांना भाजपमधून उभे राहून ही निवडणूक लढवावी लागेल... अन्यथा पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्हाला काम करावे लागेल...असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत दिले का?...शिवाय 
ऍड उदय पाटील हे अजितदादा पवार राष्ट्रवादी पार्टीचे कराड दक्षिण चे नेते आहेत मात्र यांनी भाजप मधून ही निवडणूक लढावी लागेल असेही त्यांनी सांगीतले... म्हणजेच...उदय दादा महायुतीच्या माध्यमातून या आमदार अतुलबाबांनी मोठा बॉम्ब टाकून या विषयाची चर्चा घडवून आणली आहे

ऍड उदय पाटील हे राष्ट्रवादी चे कराडचे नेते आहेत त्यांनी स्व अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता 
नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान उदयदादा यांनी डॉ सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले पॅनेलला मदत केली होती...त्याबदल्यात त्यांना जिल्हा बँकेत निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासन भोसलेंनी दिले होते अशीही चर्चा होती
मात्र आज अतुलबाबांनी आज उदय दादांनी भाजपमधून या निवडणुकीत उभं रहावं अस बोलून या विषयी मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे त्यांनी टाकलेला हा बॉम्ब कराड परिसरात जोरदार चर्चेत आला आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप कडून सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगत भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत दिले होते
त्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यानीही याबाबत आपले मत व्यक्त करताना ,आम्ही या दोन्ही मंत्र्यांना विचारू... की... आम्ही तुम्हाला  या निवडणुकीत तुमच्या बरोबर का चालत नाही ? मग आम्ही पण गप्प बसणार नाही...असे सांगत त्यांनीही स्वतंत्र लढण्याचा विचार करू असे संकेत दिले होते...
या पार्श्वभूमीवर आज अतुल भोसले यांना विचारले असता त्यांनी वरील विधान करून बॉम्ब टाकून दिला आहे त्यामुळे याची जोरदार चर्चा कराड दक्षिणमध्ये सुरू झाली आहे...

Monday, August 31, 2026

कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटींचा निधी मंजूर

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; चार तालुक्यांतील शेतीला होणार मोठा लाभ

कराड, ता. ३१ : कराड तालुक्यासह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील तब्बल १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या कृष्णा कालव्याची सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी भाजपा-महायुती सरकारने १२५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीतून कृष्णा कालव्याची आवश्यक सुधारणा, बंदिस्तीकरण तसेच काँक्रीट लायनिंगची कामे करण्यात येणार आहेत.

कृष्णा कालव्याच्या दुरावस्थेचा प्रश्न कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून, त्यांनी कृष्णा कालव्याच्या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कालव्याच्या सुधारणेसाठी २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. 

विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जलसंपदा मंत्री ना. विखे-पाटील यांच्या कराड दौऱ्यादरम्यान आमदार डॉ. भोसले यांनी त्यांच्यासमवेत कृष्णा कॅनॉलची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कृष्णा कालव्याचे सिंचनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व, त्यावर अवलंबून असलेली चार तालुक्यांतील शेती, पाण्याची गळती व शेतीचे नुकसान तसेच कालवा बंदिस्त करण्यासाठी व त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या निधीची सविस्तर माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याची गांभीर्याने दखल घेत, जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, तसेच १९३ पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी १५,००० कोटींच्या दीर्घ मुदतीच्या कर्जास मान्यता दिली आहे. या माध्यमातून सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे व वितरिकांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करणे आदी कामांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत कृष्णा कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी मंजूर झालेला १२५ कोटींचा निधी कराडसह ४ तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी व नागरिकांमधून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत. 
-------------------------

चौकट

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा

कृष्णा कालव्याच्या सुधारणा व बंदिस्तीकरणामुळे पाण्याची गळती कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यांतील शेतीला अधिक नियमित व कार्यक्षम पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. 
----------------------------

प्रतिक्रिया

भाजपा-महायुती शासनाने कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा मनापासून आनंद आहे. या निधीतून कालव्याची सुधारणा, बंदिस्तीकरण आणि काँक्रीट लायनिंगची कामे होऊन पाण्याची गळती कमी होईल आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल. या निर्णयामुळे चार तालुक्यांतील १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला मोठा लाभ मिळणार असून, हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनकडून घोषणा; १२ सप्टेंबरला होणार वितरण

वेध माझा ऑनलाइन।
ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या, कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, १२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

राज्यातील सहकारी नागरी बँकांचा महासंघ असलेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांच्या कार्याची दखल घेत, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो. सन २०२५-२६ या वर्षासाठी कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०१ कोटींपेक्षा अधिक आणि १००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठा विस्तार केला आहे. बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २७ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यविस्तारास मंजुरी मिळाली आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत कृष्णा बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.

या पुरस्काराचे वितरण १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’ येथे होणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा ; सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री आणि आमदार घाबरलेत: ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा :

वेध माझा ऑनलाइन :
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरूच आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत आले होते. मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवादावरून उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली. सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ असून सर्व मंत्री आणि आमदार घाबरले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अमित शहांना सांगितलं की, साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले आहेत. सर्व जण धक्क्यात आहेत. त्यांचे साहेब म्हणाले, काय झालं? त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अस्वस्थ आहेत’. त्यावर अमित शहा म्हणाले, ‘मी आहे, टेन्शन घेऊ नका’. गेल्या महिन्यात संसदेचं अधिवेशन सुरू असताना गद्दार खासदार हे शिंदे पुत्रांसोबत अमित शहांना भेटले. तेव्हाही दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी देखील अमित शहा यांनी सर्व काही ठिक होईल, असे सांगितले. त्याची चिंता करू नका. सर्व माझ्यावर सोपवा’. देशाचं सुप्रीम कोर्ट यांच्या खिशात आहे का? उघडपणे सुप्रीम कोर्टावर भाष्य केले जात आहे. अशामुळे देशावरील न्यायव्यवस्थेचा विश्वास नष्ट होतो’.
‘अमित शहा मुंबईत येतात किंवा दिल्लीत बसतात. त्यावेळी गद्दार जाऊन भेटतात. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका, असं म्हणतात. फडणवीसही तसंच म्हणतात. राहुल नार्वेकरही सांगतात, मी जे सांगितलं, तोच निकाल. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तेच सांगत आहे. आता न्यायालयांना कळवणं, हेच आमचं कर्तव्य आहे, असे राऊतांनी पुढे सांगितले.

संजय राऊत यांनी आमचा न्यायालय आणि संविधानावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सत्य आणि धर्माचा विजय होणार असून न्यायव्यवस्था ही अधर्माच्या बाजूने जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बुडत्याचा पाय खोलात, असं काल त्यांच्याबाबतीत झाल्याची टीका राऊतांनी केली.

‘चांगभलं’चे संपादक हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ९ मान्यवरांचा मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यावतीने विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. यावेळी ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २९) येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, नासिरभाई इनामदार, दिग्विजय सूर्यवंशी, जगन्नाथ कुंभार, देवदास माने, राहुल काळोखे, सुरेश बडेकर, भास्कर तडाके, चंद्रकांत साठे, रामभाऊ दाभाडे, माणिक अवघडे, आनंदी अवघडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कारार्थींचा शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, तर प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’, एनआयएस राष्ट्रीय कोच व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, तर ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ तर 'राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार - नितीनभाऊ आवळे यांना आणि
'राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार - जगन्नाथ कुंभार यांना प्रदान करण्यात आला.